Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

दहावीतही ‘गर्ल्स शायनिंग’
बुलढाण्याची श्रुती सुरुशे विदर्भात पहिली
अश्विनी मराठे नागपूर विभागात पहिली
अमरावती विभाग
निकाल ८५.४४ टक्के
नागपूर विभाग
निकाल ८०.६९ टक्के
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत बुलढाण्याच्या भारत विद्यालयाची श्रुती अशोक सुरुशे ही विद्यार्थिनी ६३५ (९७.६९ टक्के) गुण मिळवून विदर्भात व अमरावती विभागात पहिली आणि राज्यातून दुसरी आली आहे. नागपूर विभागातून सर्वप्रथम येण्याचा मान सोमलवार हायस्कूल रामदासपेठची विद्यार्थिनी अश्विनी संजय मराठे हिला मिळाला आहे. नागपूर विभागाचा निकाल ८०.६९ टक्के तर अमरावती विभागाचा निकाल ८५.४४ टक्के, लागला आहे. निकालाच्या टक्केवारीत अमरावती विभाग राज्यातील आठ शिक्षण मंडळांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर, तर नागपूर विभाग शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मेयोच्या आधुनिकीकरणासाठी निविदा मागवणार
वैद्यकीय शिक्षण मंत्री टोपे यांची नासुप्रच्या अधिकाऱ्यांशी चर्चा

नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (मेयो) आधुनिकीकरणासाठी येत्या एक महिन्यात जागतिक पातळीवर निविदा आमंत्रित करण्यात येणार आहे. सुमारे ४०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी मुंबईत एका बैठकीत नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण सचिव भूषण गगराणी, प्रन्यासचे सभापती डॉ. संजय मुखर्जी, प्रन्यासचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. वासुदेव तायडे आणि मेयोचे अधिष्ठाता डॉ. आनंद डोंगरे उपस्थित होते.

कुलगुरूपदासाठीच्या सुधारित निकषांवर नाराजी
नागपूर, २५ जून/ प्रतिनिधी
विविध विद्यापीठांमधील कुलगुरूपदासाठी नव्या नव्याने निश्चित करण्यात आलेल्या पात्रता निकषांमुळे शैक्षणिक क्षेत्रात नाराजी व्यक्त करण्यात येत असली तरी आजच्या घडीला तटस्थ आणि कणखर भूमिका घेणाऱ्या कुलगुरूंची विद्यापीठाला नितांत आवश्यकता असल्याचा दुसरा सूरही कानावर पडतो आहे. कुलगुरू पदासाठी नवीन पात्रता निकष प्राचार्य आणि विभागप्रमुखांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. याउलट प्रशासकीय व्यक्ती, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यासाठी हे सुधारित निकष त्रासदायक ठरणार असल्याने त्याविषयी दोन मतप्रवाह समाजात दिसून येतात.

अकरावी प्रवेश; पहिल्याच दिवशी ७१५४ अर्जाची विक्री
नागपूर, २५ जून/ प्रतिनिधी
दहावीचा निकाल जाहीर झाल्याच्या पहिल्याच दिवशी अकरावीच्या ७,१५४ अर्जाची विक्री झाली. अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून हे प्रवेश दिले जात असून आज प्रवेश अर्ज वाटपाचा पहिलाच दिवस होता. त्यामध्ये बायफोकलचे एकूण २२६८ अर्जाचे वाटप करण्यात आले. विज्ञान शाखेमध्ये इंग्रजी माध्यमाचे ३,९५६ तर उर्दूच्या ३६ अर्जाचे वाटप करण्यात आले. वाणिज्य शाखेत इंग्रजी माध्यमाचे ६९०, मराठी- १२६, हिंदी- ७७ आणि उर्दू माध्यमाचा केवळ ०१ असे एकूण ७९४ अर्जाचे वाटप वाणिज्य शाखेत करण्यात आले. विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे एकूण ७,१५४ अर्जाचे वाटप झाले.

एमबीएची प्रवेश प्रक्रिया सुरू
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एमबीए अभ्यासक्रम दोन वर्ष मुदतीचा असून प्रथम वर्षांच्या अभ्यासक्रमात दहा विषयांचा समावेश आहे. एमबीए प्रवेशाकरता रविवार, १९ जुलैला प्रवेश परीक्षा होईल. किमान ४५ टक्के गुण असणाऱ्या पदवीधारकास प्रवेश परीक्षेला बसता येईल. आरक्षित वर्गासाठी किमान ४० टक्के गुण आवश्यक आहेत. नागपूर आणि वर्धा शहरातील विविध अभ्यासकेंद्रामध्ये प्रवेश अर्ज विक्रीकरता उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज शनिवार, १८ जुलैपर्यंत अभ्यास केंद्रावर जमा करावे. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीए प्रथम वर्षांला प्रवेश दिला जाईल. एमबीए प्रथम वर्षांचे प्रवेश शुल्क ९,५५० असून यामध्ये अध्ययन साहित्याच्या किमतीचा समावेश आहे.

अनाथ मुलांसाठी नि:शुल्क व्यवस्था
विदर्भ सहाय्यता समितीच्यावतीने पोलीस लाईन टाकळी चौकात बालसदन नावाने अनाथ मुलांसाठी राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही संस्था अनाथ मुलांचे संगोपन करत आहे. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ही संस्था मदत करत असते. ज्या मुलांना आईवडील नाही अथवा आईची परिस्थिती हलाखीची आहे किंवा आईवडील असूनही आर्थिक परिस्थितीमुळे ते मुलांना शिकवू शकत नाही, अशा मुलांना संस्थेत प्रवेश दिला जातो.

एचआयव्ही लोकजागृतीसाठी सहकार चळवळ उपयोगी -रमेश मंत्री
नागपूर, २५ जून/प्रतिनिधी

सहकार चळवळीची पाळेमुळे ग्रामीण व आदिवासी विभागापर्यंत पोहोचली असून समाजाला एड्स/एचआयव्ही सारख्या महाप्रलयापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार चळवळ मोठे योगदान देऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक रमेश मंत्री यांनी येथे केले. धनंजय गाडगीळ सहकारी व्यवस्थापन संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघाच्या मदतीने एडस/एचआयव्ही विषयावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत मंत्री बोलत होते. आंतरराष्ट्रीय सहकारी संघाच्या सल्लागार सावित्री सिंग, भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचे उपनिदेशक गणेश मांगलिक यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यशाळेत राज्यातील ४० अधिकारी सहभागी झाले. सवित्री सिंग आणि शासकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची यावेळी भाषणे झाली. संस्थेचे प्राचार्य जगदीश किल्लोळ यांनी कार्यशाळेचा उद्देश समाजावून सांगितला.

सहाय्यक आयुक्त अशोक पाटील यांनी सूत्रे स्वीकारली
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

महापालिकेच्या आशीनगर झोनच्या सहाय्यक आयुक्तपदी अशोक पाटील यांची नियुक्ती करण्याचे आदेश नुकतेच उच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्यांनी १७ जूनला पदाची सूत्रे स्वीकारली. पदग्रहण समारंभापूर्वी या झोनचे नवनियुक्त सभापती प्रल्हाद दुर्गे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार घातला. त्यानंतर त्यांनी सहाय्यक आयुक्त पाटील यांना शुभेच्छा दिल्या. पदग्रहण समारंभाला नगरसेवक संदीप सहारे, अस्लम खान, डॉ. मिलिंद माने, प्रकाश गोंडाने, राजू बाबरा, मनोज सांगोळे आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल भंडारा-गोंदिया दौऱ्यावर
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे तीन दिवसांच्या भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ांच्या दौऱ्यावर उद्या, शुक्रवारी आगमन होत आहे. नागपूरच्या विमानतळावर सकाळी आगमन झाल्यानंतर ते लगेच कारने पवनीला रवाना होतील. यानंतर लाखांदूर, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी आणि आमगाव येथील कार्यक्रमास उपस्थित राहतील. प्रफुल्ल पटेल यांचे दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ११ वाजतापासून तिरोडा, शिरोळा, नाका डोंगरी, माहाडी, भंडारा, लाखणी, साकोली येथे कार्यक्रम आहेत. रविवारी सकाळी गोंदियातील कार्यक्रमांना उपस्थित राहून दुपारी ३ वाजता ते बंगळुरूला रवाना होतील.

विजेच्या धक्क्याने चार गायी व बैल ठार
कार्गो हबग्रस्त शिवणगाव परिसरात आज सकाळी विजेचा धक्का लागून चार गायींसह एक बैल जागीच ठार झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गुराख्याने गावातील गायी व म्हशींना नेहमीप्रमाणे चरण्यासाठी नेले. बुधवारी रात्री आलेल्या वादळाने विजेच्या तारा तुटल्या त्यातील वीज प्रवाह सुरूच होत्या. गायींना तारांचा स्पर्श होताच त्या जागीच गत्प्राण झाल्या. गुराख्याने आरडोओरड केल्याने गावकऱ्यांना ही माहिती कळली. यानंतर गावकऱ्यांनी मदतीसाठी धावपळ केली. यामुळे इतर पशुंचे रक्षण करता आले. श्रीपाद काळे यांच्या चार गायी आणि तिवारी यांचा एक बैल होता.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची आज निदर्शने
नागपूर शहर व ग्रामीण भागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत अधिकाऱ्यांच्या उदासिनतेविरुद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे उद्या, शुक्रवारी दुपारी ३ वाजता आकाशवाणी चौकात निदर्शने करण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अधिकारी त्याकडे लक्ष देत नाहीत. यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. धिकाऱ्यांच्या उदासिनतेचे वाभाडे काढण्यासाठी निदर्शने करण्यात येत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश कार्याध्यक्ष रंगराव मानकर, विभागीय अध्यक्ष दीपक गोखले, नागोराव गाणार, पांडुरंग काकडे, सुदाम काकपुरे, महिला आघाडी प्रमुख चित्रा मजुमदार करणार आहेत. यात शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शहर अध्यक्षा पूजा चौधरी, सचिव योगेश बन, जिल्हाध्यक्ष वासुदेव निघोट, सचिव सुधीर पाटील यांनी केले आहे.

योग आणि प्राणायाममुळे प्रतिकार शक्तीत वाढ -अ‍ॅड. फटिंग
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

योग आणि प्राणायाममुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे मनुष्य स्वत:चा रोगांपासून बचाव करू शकतो, असे प्रतिपादन पतंजली योग समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नामदेव फटिंग यांनी केले. रविनगरातील आरबीआय वसाहतीत आयोजित योग शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. सात दिवसीय नि:शुल्क योग शिबिराचे उद्घाटन श्रीधर बेहरा यांनी केले. यावेळी अभिराम जेना, विकास रंगारी, ज्योती गर्गे, हंसराज मिश्रा, शशिकांत जोशी, छाजूराम शर्मा, डॉ. जिवेश पंचभाई, डॉ. निशिगंधा खंडाळकर प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाचे संचालन यामिनी महाजन यांनी केले. एस.डी. सोनवने यांनी आभार मानले.

प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे रुजू
आदिवासींच्या सर्वागीण विकासाठी प्रयत्न करणारे गिरीश सरोदे नागपूरला प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू झाले. सरोदे यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर २० जूनला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमित कोवे यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला. याप्रसंगी संघाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. रमेश कोठाळे, उपाध्यक्ष रवींद्र कानफाडे, गोविंद मोंढे, सुनील देशमुख, सारंग फाये आदी उपस्थित होते.

जुन्या वैमनस्यावरून तरुणाला मारहाण
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

जुन्या वैमनस्यावरून तिघांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना अमरावती मार्गावरील नवनीत नगरात बुधवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. शशीरंजन कृष्णकुमार मिश्रा (रा. नवनीत नगर) याला आरोपी प्रकाश रामकृष्ण गायकवाड (रा. नवनीतनगर) व इतर दोन इसमांनी दुचाकीवर बसवून नेले व मारहाण केल्याची तक्रार शशीरंजनने वाडी पोलिसांकडे केली. पोलिसांनी आरोपी प्रकाशला अटक केली़

तरुणाची आत्महत्या
आजारपणाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी धम्मानंद नगरात घडली. रवींद्र विकास अडाकणे याने त्याच्या घरी लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ तो सहा महिन्यांपासून आजारी होता़ यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. वर्षां अशोक काथवते (रा. सुरेंद्रगड) हिने गुरुवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास तिच्या घरी छताच्या लाकडी खांबाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

भाजलेल्या मुलाचा मृत्यू
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

कचरा वेचताना भाजलेल्या मुलाचा मृत्यू झाला. भांडेवाडी कचरा डंिपग यार्डात मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील कचरा रोज गोळा करून तो पूर्व नागपुरातील भांडेवाडीत असलेल्या डंपिंग यार्डात टाकून तो पेटवला जातो. कचऱ्यातून टाकाऊ वस्तू शोधणाऱ्यांची तेथे गर्दी असते. रोजच्या प्रमाणे वेदप्रकाश अमरचंद शाहू (रा़ तुळशीनगर झोपडपट्टी) हा बारा वर्षांचा मुलगा कचरा वेचत होता. त्याचा पाय घसरल्याने तो जळत्या कचऱ्यात पडल्याने जळाला होता़ त्याला लोकांनी बाहेर काढले आणि मेडिकल रुग्णालयात दाखल केले. तेथील चार क्रमांकाच्या वॉर्डात त्याच्यावर उपचार सुरू होते. काल बुधवारी रात्री साडेनऊ वाजता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आतकस्मिक मृत्यूची नोंद केली.

प्रवाशाचे ३० हजार लांबवले
बसमधील प्रवाशाचे ३० हजार रुपये चोरटय़ांनी लांबवले. कोंढाळी बस स्थानकावर बुधवारी सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विजयकुमार रामकुमार जैस (रा. प्रशात विहार दिल्ली) हा काल अमरावतीहून बसने नागपूरला येत होता. कोंढाळीला बस थांबली असता पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी तो बसखाली उतरला. तेवढी संधी साधून चोरटय़ांनी त्याची सुटकेस लांबवली. त्यात कपडय़ांसह तीस हजार रुपये होते. त्याच्या तक्रारीवरून कोंढाळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वीज कोसळल्याने महिलेचा मृत्यू
वीज कोसळल्याने एका महिला शेत मजुराचा मृत्यू झाला. पारशिवनीपासून नऊ किलोमीटर अंतरावरील सोनेगाव येथे ही घटना घडली. रेशा अशोक शिंदे (रा. सोनेगाव) ही महिला दुपारी शेतात काम करीत होती. साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पारशिवनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

नियमित अभ्यासाचे फळ - रोहन
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

शाळेत होणाऱ्या अभ्यासक्रमाची नियमित उजळणी केली तरी चांगले यश मिळू शकते, असे मत आर.एस. मुंडले शाळेच्या रोहन धकिते या विद्यार्थ्यांने व्यक्त केले. मागासवर्गीयातून राज्यातून तिसरा आणि नागपूर विभागातून पहिला आलेला रोहन धकितेला ६२८ गुण आहेत. रोहनचे वडील सदानंद एस.बी.सी.टी. महाविद्यालयात प्राध्यापक तर आई ममता धनवटे नगर विद्यालयात शिक्षिका आहे.
शिकवणी मीही लावली होती पण, त्यावर अवलंबून नव्हतो. सुरुवातीपासूनच जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिल्यामुळे परीक्षेच्यावेळी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. निवडक विषयांचीच शिकवणी लावली पाहिजे, असेही रोहनने सांगितले. मला इंजिनियर व्हायचे आहे. अभ्यास केला तर सर्व विषय सोपे असतात. गणित हा रोहनचा सर्वात आवडता विषय. दहावीचे वर्ष असल्याने तो टीव्हीवर बातम्यांव्यतिरिक्त काही पाहत नव्हता.