Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

जीवन दर्शन
ग्रंथहत्या

जगात नरसंहाराप्रमाणेच लोकांनी संस्कृती आणि सभ्यता संहारही घडवून आणले आहेत. त्यात अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे इराकला बेचिराख करण्याचा पाश्चिमात्य राष्ट्रांचा संघटित कट होय. इराकच्या संग्रहालयातून व ग्रंथालयांतून मागील सात हजार वर्षांपासून जोपासण्यात आलेला

 

मौल्यवान सांस्कृतिक वारसा एका मिसाईलच्या इशाऱ्याने जळून खाक झाला आणि बेबिलॉनच्या सर्वात प्राचीन संस्कृतीचे अवशेष इतिहासजमा झाले. जी माणसे आपल्या छातीत हृदय बाळगतात त्यांनाच या दुर्दैवी घटनेची जाणीव होऊ शकते. जे हृदयाच्या ठिकाणी बर्फाची लादी घेऊन हिंडतात ते कधीही या क्रूर हत्येची कल्पना करू शकणार नाहीत.
मुस्लीम साहित्यकारांची लिखाणशक्ती जगप्रसिद्ध आहे. आपल्या शासनकाळात आणि एरवीही त्यांनी आपल्या लिखाणाने ग्रंथालये भरून टाकली. परंतु जेव्हा त्यांचे राज्य संपुष्टात आले तेव्हा त्यांच्या मुलखात दाखल होणाऱ्या इतरधर्मीयांनी जाणीवपूर्वक त्यांच्या ग्रंथालयाला आगी लावून टाकल्या. त्यांच्या पुस्तकांना नदीत टाकून उभे जलस्नान दिले गेले. हे केवळ वैमनस्य आणि जातिवादातून करण्यात आले. स्पेनमध्ये पंधराव्या शतकात जेव्हा बादशहा अब्दुल्लाहने किंग फर्डिनांड आणि राणी इजाबेलाची शरणागती स्वीकारली तेव्हा त्या दोघांच्या एक संयुक्त आदेशाद्वारे एका विशेष खात्याची स्थापना झाली आणि त्यावर एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. ज्याच्यावर स्पेनमधील मुसलमानांची सर्व ग्रंथालये उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कामावर सरकारचे लाखो रुपये व पन्नास वर्षे खर्च झाली. असेच काही इजिप्तमध्येही घडले. ग्रंथ जाळल्याने संस्कृती संपुष्टात येत नाही. आज स्पेनच्या विद्यापीठातून सर्वात जास्त अभ्यासला जाणारा विषय इस्लाम आहे आणि स्पेनचा पहिला विजेता तारिम्क बिन ज़ियाद (इ.स. ७११)चे पुतळे उभारण्याला दिशा मिळाली आहे.
अनीस चिश्ती

कुतूहल
ओल्बेरचा विरोधाभास
ओल्बेरचा विरोधाभास म्हणजे काय?

तुम्हाला कोणी विचारलं, की ‘रात्रीचं आकाश प्रकाशित का नसतं?’ तर कदाचित तुम्ही हा प्रश्न विचारणाऱ्याला वेडय़ात काढाल. पण इ.स. १८२६ साली हाच प्रश्न हाईन्रीश ओल्बेर या जर्मन खगोलशास्त्रज्ञानं उपस्थित केला होता. ओल्बेरच्या या प्रश्नाचं मूळ हे त्या काळच्या विश्वरचनेबद्दलच्या आजच्या तुलनेतील अपुऱ्या ज्ञानात होतं. त्या काळी विश्व हे अनंत मानलं गेलं होतं. विश्व जर अनंत असलं, तर ओल्बेरच्या तर्कानुसार विश्वात असंख्य तारे असायला पाहिजेत आणि ज्या दिशेला आपण पाहू त्या दिशेला एखादा तारा तरी दिसायलाच पाहिजे. म्हणजेच रात्रीसुद्धा आकाश हे पूर्णपणे उजळलेलं असलं पाहिजे. पण प्रत्यक्षात तर रात्री अंधार असतो. म्हणजे हा विरोधाभास झाला. ओल्बेरच्या या विरोधाभासानं शास्त्रज्ञांना दीडशे वर्षांहून अधिक काळ बुचकळय़ात टाकलं होतं.
खरं तर, ज्या तर्कावर ओल्बेरचा विरोधाभास आधारलेला होता ते तर्क आता कालबाहय़ झाले आहेत. ओल्बरच्या विरोधाभासाचं निरसन आधुनिक विश्वरचनाशास्त्रानं केलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपलं विश्व अनंत काळापूर्वी निर्माण झालं नसून त्याची निर्मिती ही सुमारे चौदा अब्ज वर्षांपूर्वी झाली आहे. त्यामुळे चौदा अब्ज वर्षांहून अधिक दूर असणाऱ्या ताऱ्यांचा प्रकाश हा आपल्यापर्यंत पोचलेला नाही. यामुळे आकाशातील सर्व तारे काही आपल्याला दिसू शकत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे विश्वाच्या प्रसरण पावण्यामुळे दिर्घिका या त्यातील ताऱ्यांसह आपल्यापासून दूर जात आहेत. परिणामी, या ताऱ्यांकडून येणाऱ्या प्रकाशाच्या तरंगलांबीत ताम्रसृतीमुळे मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. या ताम्रसृतीमुळे या ताऱ्यांकडून येणाऱ्या दृश्य प्रकाशाचे रूपांतर हे अतिशय मोठी तरंगलांबी असणाऱ्या प्रकाशलहरींत होते. हा प्रकाश आपले डोळे टिपू शकत नाही. यामुळेच रात्रीचे आकाश प्रकाशित नसते!
अरविंद परांजपे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दिनविशेष
सॅम्युअल क्रॉम्प्टन
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपात विशेषत: इंग्लंडमध्ये उत्पादनाच्या साधनात बदल झाला, तिला ‘औद्योगिक क्रांती’ असे म्हणतात. विशेषत: कापड उद्योगाचा कायापालट झाला. इंग्लंडमधील लोक आता सूत कारखान्यातून यंत्रावर कातू लागले. अशाच एका कापड गिरणीत सॅम्युअल क्रॉम्प्टन कामाला होता. त्याचा जन्म ३ डिसेंबर १७५३ रोजी इंग्लंडमध्ये फिरवूड लँकाशर येथे झाला. तो ज्या गिरणीत सूत कातत होता, त्या गिरणीतले यंत्र हारग्रीव्हजने बनवले होते. पण त्या यंत्रात एक दोष असा होता, की सूत कातताना धागा वारंवार तुटत असे. हा दोष त्याच्या लक्षात आल्यावर यापेक्षा चांगले यंत्र शोधण्याची त्याला यातून प्रेरणा मिळाली आणि तो कामाला लागला. यासाठी त्याने पाच वर्षे अथक परिश्रम घेतले. पैसा खर्च केला आणि अखेर त्याने ‘म्यूल’ नावाचे नवे यंत्र १७७९च्या सुमारास बनवले. क्रॉम्प्टन याने हारग्रीव्हज व आर्कराइट यांच्या शोधांचा संयोग घडवून हे ‘म्यूल’ नावाचे यंत्र बनवले. या यंत्राचे वैशिष्टय़ म्हणजे सूत कातले जाऊन त्याला पिळ देण्याचे कामही एकाच वेळी होत असे. या त्याच्या शोधामुळे सूत इतके निघू लागले, की विणकरांना आता सूत पाहिजे तितके स्वस्तात मिळू लागले. कॉम्प्टनच्या या नव्या यंत्राला चांगलीच मागणी वाढली. पण गरिबीमुळे यंत्राचे पेटंट त्याला घेता आले नाही, तेव्हा या यंत्राचे रहस्य त्याने अनेकांपाशी पैशाच्या आशेने उघड केले. पण त्यात त्याची फसगत झाली. कारण त्याला फक्त ६० पौंड मिळाले. अखेर गिरणीमालकांनी माणुसकी दाखवून त्याला ५००० पौंडाची देणगी देऊन त्याची गरिबी दूर करण्याचा प्रयत्न केला. या पैशातून त्याने कापड रंगवण्याचा व्यवसाय सुरू केला, पण तो चालला नाही. एवढा मोठा संशोधक, पण आयुष्याचा उत्तरार्ध त्याला मित्रांच्या मदतीवर कंठावा लागला. २६ जून १८२७ रोजी इंग्लंडमधील बोल्टन येथे त्याचा मृत्यू झाला.
संजय शा. वझरेकर

गोष्ट डॉट कॉम
पन्नास रुपयांची नोट

आशा आईला काही वस्तू आणून द्यायला शिल्पा बाजारात आली होती. सगळय़ा वस्तू घेऊन झाल्या. लेलेंच्या दुकानातून मटार करंज्या घ्यायच्या राहिल्या होत्या. सहा करंज्या घेऊन तिने शंभर रुपयांची नोट दिली. दुकानात बरीच गर्दी होती. सणाचा दिवस असल्याने प्रत्येकाला निघायची घाई होती. मागणी करणारी गिऱ्हाईके आणि त्यांना पदार्थ देणारे नोकर यांचे प्रमाण फारच व्यस्त होते. पैसे घ्यायला गेल्यावर शिडशिडीत अंगकाठीचे चष्मा घातलेले चाळिशीचे एकटेच गृहस्थ होते. त्यांची तर फारच त्रेधा उडत होती. गडबडीत त्यांनी शिल्पाला एक पन्नासच्या नोटेऐवजी दोन नोटा दिल्या. ‘म्हणजे करंज्या फुकटच मिळाल्या म्हणायच्या’ म्हणत शिल्पा दुकानातून घाईने बाहेर पडली. अर्थात ही गोष्ट ती आईला सांगणार नव्हती. आईला मुळीच आवडले नसते. ती म्हणाली असती, ‘‘हा अप्रामाणिकपणा आहे. असे वागू नये. जा परत करून ये बरं त्यांना पन्नास रुपये.’’ तिला आठवलं, देवळापाशी पाच रुपयांची नोट सापडली म्हणून केवढा आनंद झाला होता तिला. पण आईनं देवाच्या पेटीत टाकून यायला लावले होते. आईला इतर सामानाचा हिशेब देऊन तिने ठरलेले पैसे परत केले. पन्नासची नोट मात्र दप्तराच्या तळाशी गुपचूप ठेवून दिली. आजचा दिवस मस्त आहे. आयते पन्नास रुपये मिळाले म्हणत ती मैत्रिणीकडे गप्पा मारायला गेली. दुसऱ्या दिवशी फिरायला जायचा बेत दोघींनी ठरवून टाकला.
सकाळी अ‍ॅडव्हान्स बुकिंगसाठी आईकडून पैसे घेऊन शिल्पा तिकिटे काढून घेऊन आली. आईला पैसे मोजून परत देताना तिच्या लक्षात आले, की पैसे कमी परत आले आहेत. तिच्या लक्षात येईना की तिकीटवाल्याकडे पैसे देताना त्याला एक नोट जास्त गेली की पैसे देताना खाली पडली. शंभराची एक नोट पर्समध्ये कमी होती एवढे मात्र खरे.
तिला रडू आले. आई म्हणाली, ‘‘जाऊ दे गं राणी, होतं असं कधीकधी. यापुढे मात्र पैशाचे व्यवहार करताना जास्त लक्ष देऊन कर.’’ आईच्या बोलण्यानं शिल्पाला जास्तच रडू आलं. तिने कालचा प्रसंग आईला सांगितला. ती डोळे पुसत म्हणाली, ‘‘माझ्याकडून पुन्हा असं होणार नाही. मी लेलेंच्या दुकानात जाऊन पैसे परत देते.’’
शिल्पाच्या मनावरचे ओझे पैसे परत केल्यावर हलके झाले.
प्रामाणिकपणामुळे येणारी ताकद मोलाची आहे. प्रामाणिक असाल तर वादात तुम्ही सबळ ठरता. तुमचे आईवडील, मित्रमैत्रिणी तुमच्यावर नेहमी विश्वास ठेवतात. प्रामाणिकपणा हा महत्त्वाचा नैतिक गुण आहे. आजचा संकल्प- मी प्रामाणिकपणे वागेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com