Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दहावीतही ‘गर्ल्स शायनिंग’
बुलढाण्याची श्रुती सुरुशे विदर्भात पहिली
अश्विनी मराठे नागपूर विभागात पहिली
अमरावती विभाग
निकाल ८५.४४ टक्के
नागपूर विभाग
निकाल ८०.६९ टक्के
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत बुलढाण्याच्या भारत विद्यालयाची श्रुती अशोक सुरुशे ही विद्यार्थिनी ६३५ (९७.६९ टक्के) गुण मिळवून विदर्भात व

 

अमरावती विभागात पहिली आणि राज्यातून दुसरी आली आहे. नागपूर विभागातून सर्वप्रथम येण्याचा मान सोमलवार हायस्कूल रामदासपेठची विद्यार्थिनी अश्विनी संजय मराठे हिला मिळाला आहे. नागपूर विभागाचा निकाल ८०.६९ टक्के तर अमरावती विभागाचा निकाल ८५.४४ टक्के, लागला आहे. निकालाच्या टक्केवारीत अमरावती विभाग राज्यातील आठ शिक्षण मंडळांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर, तर नागपूर विभाग शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे.
नागपूर विभागात बारावीप्रमाणेच दहावीतही मुली गुणवत्तेत तसेच उत्तीर्णतेच्या प्रमाणात मुलांपेक्षा वरचढ ठरल्या आहेत. पहिल्या तीन क्रमांकावरील विद्यार्थी सोमलवार हायस्कूल रामदासपेठचे आहेत. अश्विनी संजय मराठे ही ९७.५३ टक्के (६३४) गुण मिळवून पहिली, तर अश्मिका सुभाष ढबाले ही ९७.२३ टक्के (६३२) गुणांसह दुसरी आली आहे. याच शाळेचे मिहिर कमलाकर महाकाळकर आणि इंद्राणी जीवन मधुगिरी हे दोघेही ९७.०७ टक्के (६३१) गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये विमलताई तिडके कॉन्व्हेंटची तिशा सुनील गजभिये व आर.एस. मुंडले इंग्लिश स्कूलचा रोहन सदानंद धकिते हे दोघे ९६.६१ टक्के गुणांसह पहिले आले आहेत. हडस हायस्कूलचा अभिषेक अजय चन्न्ोवार याने ९६.४६ टक्के गुणांसह दुसरा, तर सोमलवार हायस्कूलची संचिता अनिल बमनोटे हिने ९६.३० टक्के गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला आहे. रात्रशाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये शिवाजी नाईट हायस्कूलचा रमीझ आझाद बक्षी हा ७८.४६ टक्के गुण मिळवून सर्वप्रथम आला आहे, तर अपंग विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा मान सोमलवार हायस्कूल निकालस शाखेचा प्रीतेश प्रशांत मातुरकर याने ९५.३८ टक्के गुणांसह मिळवला आहे.
नागपूर विभागातून यंदा १ लाख ७८ हजार विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ४३ हजार ६२४, म्हणजे ८०.६९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यापैकी भंडारा जिल्ह्य़ाची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे ८५.५१ टक्के आहे. याखालोखाल गोंदिया जिल्ह्य़ाचा निकाल ८३.७८ टक्के, गडचिरोली जिल्ह्य़ाचा ८१.३२ टक्के, नागपूर जिल्ह्य़ाचा ८१.१९ टक्के, चंद्रपूर जिल्ह्य़ाचा ७८.८५ टक्के, तर वर्धा जिल्ह्य़ाचा निकाल सर्वात कमी, म्हणजे ७२.६५ टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलांचे प्रमाण ७९.९९ टक्के (७० हजार ३१६), तर मुलींचे प्रमाण ८१.३७ टक्के (७३ हजार ३०८) आहे. भंडारा जिल्ह्य़ात उत्तीर्ण मुला-मुलींची टक्केवारी जवळजवळ सारखी असून, गडचिरोली वगळता इतर चार जिल्ह्य़ांमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षीच्या ७८.८४ टक्क्यांच्या तुलनेत यावर्षीचा निकाल १.८५ टक्क्यांनी जास्त आहे.
यावर्षीच्या परीक्षेत १९० शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, तीन शाळांचा निकाल शून्य टक्के आहे. विभागातील एकूण २ हजार ३७७ शाळांपैकी २७ शाळांचा निकाल शून्य ते ३० टक्के या गटात आहे. यावर्षी नागपूर विभागातून २६ हजार ७२५ पुनर्परीक्षार्थी (रिपीटर) विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १३ हजार ७०५, म्हणजे ५१.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मध्येच शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने सुरू केलेल्या खाजगी विद्यार्थी थेट अर्ज योजनेंतर्गत यावर्षी ३ हजार ३६५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८९७, म्हणजे ५६.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विषयनिहाय विचार करता, प्रथम भाषा मराठी विषयाचा निकाल ८९.०२ टक्के लागला आहे. हिंदीत ९१.३९ टक्के, तर इंग्रजीत ९८.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. द्वितीय व तृतीय भाषा म्हणून मराठीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ९३.५५ टक्के, हिंदीत ९०.५८ टक्के, तर इंग्रजीत ८५.४७ टक्के असे आहे. संस्कृत विषय घेऊन ९९.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गणितात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ७९.८७, विज्ञान विषयाची ९१.८३, तर सामाजिक शास्त्र विषयाची ९४.२६ इतकी आहे.
दहावीच्या परीक्षेत यावर्षी व यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी येत्या ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत अर्ज सादर करण्याची मुदत ६ जुलै ही आहे. विलंब शुल्कासह १६ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील. गुणपडताळणीसाठी अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख ६ जुलै ही आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाकरिता २० रुपये शुल्क मुख्याध्यापकांकडे जमा करावे. गुणपडताळणी अर्जासोबत गुणपत्रिकेची प्रमाणित केलेली सत्यप्रत किंवा छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेवरील नाव, विषय, माध्यम आणि पूर्वी सूट मिळालेले विषय इत्यादी माहिती काळजीपूर्वक (स्पेलिंगसह) तपासून घ्यावी. यात काही चूक आढळल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत तत्काळ विभागीय मंडळाकडे अर्ज सादर करावा, असे मंडळाने कळवले आहे.
अमरावती विभागात टॉपर विद्यार्थ्यांमध्ये मुलींचेच वर्चस्व आहे. दुसऱ्या स्थानावर अकोल्याच्या छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाची सानिका राजेंद्र मेंडकी, तर अमरावती जिल्ह्य़ातील अचलपूरच्या सिटी हायस्कूलची ऋचा पुरुषोत्तम पाटस्कर आणि दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाची स्वाती दिगंबर जामनिक या दोघी संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आल्या आहेत. सानिका मेंडकीला ९७.२३ तसेच ऋचा पाटस्कर आणि स्वाती जामनिकला ९६.४६ टक्के गुण मिळाले आहेत. स्वाती जामनिकला विभागात मागासवर्गीयांमधून प्रथम स्थान मिळाले आहे. अपंगांमधून अकोल्याच्या मुंगीलाल बाजोरिया हायस्कूलचा प्रकाश भिकूलाल तोष्णीवाल हा ९२.३० टक्के गुण मिळवून अव्वल आला आहे. रात्रकालीन शाळेतून अकोल्याच्या जागृती नाईट हायस्कूलची प्रीती गुलाबराव शेगावकर ही विभागातून प्रथम आली आहे.
अमरावती विभागातून १ लाख ५५ हजार ३११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ३३ हजार ६९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलीच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.३४ तर मुलांची ८४.६५ आहे. विभागात निकालाच्या टक्केवारीत वाशीम जिल्ह्य़ाने आघाडी घेतली असून वाशीमचा निकाल ८८.५४ टक्के एवढा लागला आहे. त्याखालोखाल बुलढाणा ८७.९३, अकोला ८६.९१, अमरावती ८५ आणि यवतमाळ जिल्ह्य़ाचा निकाल ८०.९५ टक्क लागला आहे. निकालाच्या टक्केवारीत विभागात तब्बल २२३ शाळांनी १०० टक्के निकालाचे बिरूद प्राप्त केले आहे. एकही विद्यार्थी उत्तीर्ण न झालेल्या तीन शाळा आहेत. तीन शाळांचा निकाल २० टक्क्यांहून कमी लागला आहे. ५६ शाळा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकल्या आणि १९६७ शाळांचे निकाल ५० ते ९९ टक्क्यांदरम्यान लागले आहेत.
अकोल्याच्या भारत विद्यालयाची नेहा बोरकर ही मागासवर्गीयांमधून दुसरी तर अमरावतीच्या मणिबाई गुजराथी माध्यमिक शाळेचा अक्षय अनिल घरडे हा तिसरा आला आहे. रात्रकालीन शाळेतून अमरावतीच्या गौरी हायस्कूलची जयश्री सरवटकर दुसरी तर अकोल्याच्या जागृती नाईट स्कूलची पल्लवी शिंदे ही तिसरी आली आहे. दहावीच्या परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या विद्यार्थ्यांची ९८३ प्रकरणे आढळून आली. त्यापैकी ८८१ प्रकरणांमध्ये विद्यार्थी दोषी आढळून आले आहेत. परीक्षेच्या काळात कॉपी करणाऱ्या तब्बल ८६८ विद्यार्थ्यांचे निकाल मंडळाने रोखून ठेवले आहेत. गैरप्रकारांचे शेकडा प्रमाण ०.९८ टक्के एवढे आहे.
राज्यातील आठ विभागीय मंडळांमध्ये निकालाच्या टक्केवारीत अमरावती विभागाने तिसरे स्थान मिळवले आहे. अमरावती विभागात नियमित आणि पुनर्परीक्षार्थी अशा एकूण १ लाख ६८ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ४० हजार २५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल ८५ टक्के एवढा आहे.