Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मेयोच्या आधुनिकीकरणासाठी निविदा मागवणार
वैद्यकीय शिक्षण मंत्री टोपे यांची नासुप्रच्या अधिकाऱ्यांशी चर्चा
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (मेयो) आधुनिकीकरणासाठी

 

येत्या एक महिन्यात जागतिक पातळीवर निविदा आमंत्रित करण्यात येणार आहे. सुमारे ४०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी मुंबईत एका बैठकीत नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण सचिव भूषण गगराणी, प्रन्यासचे सभापती डॉ. संजय मुखर्जी, प्रन्यासचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. वासुदेव तायडे आणि मेयोचे अधिष्ठाता डॉ. आनंद डोंगरे उपस्थित होते.
रुग्णालयाच्या आधुनिकीकरणात येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन देऊन निविदा आमंत्रित करण्यासाठी प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिले.
मेयो रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाची योजना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तत्कालीन सभापती मनुकुमार श्रीवास्तव यांनी या योजनेची घोषणा केली होती. मात्र, अद्याप त्यासाठी मुहूर्त निघालेला नाही. प्रन्यासचे सभापती डॉ. संजय मुखर्जी यांनी आता परत पुढाकार घेऊन शासन दरबारी त्याचा पाठपुरावा केला आहे. मध्यंतरी सत्यम समूहाशी संबंधितमेटास कंपनीला मेयोच्या आधुनिकीकरणाचे काम देण्यात आले होते. परंतु, या कंपन्यांमधील घोटाळा उघडकीस आल्याने त्यांच्याशी प्रन्यासचा असलेला करार शासनाने रद्द केला. आता नव्याने प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.
मेयोबाबत प्रन्यासने दिलेले बहुतेक सर्व प्रस्ताव राज्य शासनाने स्वीकारले आहेत. यात केंद्र सरकारद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या ११ आर्थिक व्यवहार सल्लागारापैकी एक सल्लागार प्रन्यास नियुक्त करणार आहे. तसेच या प्रकल्पात एशिअन डेव्हलप्मेंट बँकेचे अजय सक्सेना यांची मदत घेण्यात येणार आहे, असे डॉ. संजय मुखर्जी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
मेयो रुग्णालयाची जागा सुमारे ३९ एकर आहे. यातील २५ एकर जागेवर अत्याधुनिक सोयी, सुविधांसह भव्य रुग्णालय उभारण्याची योजना आहे. उर्वरित जागा व्यावसायिक वापरासाठी देण्यात येणार आहे. याशिवाय अजनीजवळील पाच एकर जागाही निवासी संकुलासाठी देण्यात येणार आहे.
अजनीच्या जमिनीवर डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. ही संपूर्ण योजना बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. जागतिक पातळीवरील निविदांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जा सल्लागार नियुक्त करण्यात येतील. वैद्यकीय शिक्षण विभागाकडे रुग्णालयाचे सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला आहे. तसेच, महाविद्यालयात सध्या १०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. मात्र, १६० विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार ही योजना आहे. यासाठी विभागाला कोणती माहिती लागते व त्याला किती दिवसात मंजुरी मिळते यावर निविदा प्रक्रिया अवलंबून राहील, असेही डॉ. मुखर्जी यांनी स्पष्ट केले.