Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कुलगुरूपदासाठीच्या सुधारित निकषांवर नाराजी
नागपूर, २५ जून/ प्रतिनिधी
विविध विद्यापीठांमधील कुलगुरूपदासाठी नव्या नव्याने निश्चित करण्यात आलेल्या पात्रता

 

निकषांमुळे शैक्षणिक क्षेत्रात नाराजी व्यक्त करण्यात येत असली तरी आजच्या घडीला तटस्थ आणि कणखर भूमिका घेणाऱ्या कुलगुरूंची विद्यापीठाला नितांत आवश्यकता असल्याचा दुसरा सूरही कानावर पडतो आहे. कुलगुरू पदासाठी नवीन पात्रता निकष प्राचार्य आणि विभागप्रमुखांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. याउलट प्रशासकीय व्यक्ती, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यासाठी हे सुधारित निकष त्रासदायक ठरणार असल्याने त्याविषयी दोन मतप्रवाह समाजात दिसून येतात.
कुलगुरू पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारासाठी पात्रता निकषांमध्ये बदल करण्यात आला आहे. उमेदवार कोणत्याही शाखेतील डॉक्टरेट आणि शैक्षणिक क्षेत्रातील चांगले चरित्र असलेला असावा. विद्यापीठ स्तरावर किंवा नावाजलेल्या संस्थेमध्ये पदवीपूर्व व पदव्युत्तर पातळीवर किमान १५ वषार्ंचा अध्यापन आणि संशोधनाचा अनुभव असावा. पीएचडीनंतर आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये किमान पाच संशोधन प्रंबंध प्रकाशित झालेले असावेत. प्राध्यापकापेक्षा कमी दर्जा नसलेला आणि विद्यापीठातील विभाग प्रमुख, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, आंतरराष्ट्रीय अ‍ॅडव्हान्स लर्निग संस्थांचे प्रमुख म्हणून किमान पाच वर्षांचा प्रशासकीय अनुभव असावा. उमेदवाराने किमान एका महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पावर काम केलेले असावे. आंतरराष्ट्रीय संस्था किंवा संघटना यांच्या देशाबाहेरील कार्यशाळा, चर्चासत्र किंवा परिषदांमध्ये सहभाग असावा. या प्रमुख अटी कुलगुरू पदाच्या पात्रतेसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.
तंत्रज्ञानात्मक कौशल्य, व्यवस्थापकीय कौशल्य, नेतृत्त्व क्षमता इत्यादी गुण ऐच्छिक करण्यात आले आहेत. त्यामुळे पात्रतेचे निकष विद्यापीठांमध्ये कार्यरत असलेल्या विविध विभागप्रमुख तसेच महाविद्यालयांतील प्राचार्याना झुकते माप देणारे असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक, विद्यापीठांची घडी नीट बसविण्यासाठी शैक्षणिक, संशोधनात्मक ज्ञानाबरोबरच प्रशासकीय अनुभव असलेल्या कुलगुरूंची गरज आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व, स्वच्छ प्रतिमा व कर्तव्यकठोर अशा कुलगुरूंची विद्यापीठांना आवश्यकता आहे. विद्यापीठातील विभागप्रमुख व प्राचार्य यांच्याकडे केवळ शैक्षणिक व संशोधनाचे मर्यादित ज्ञान असते. बहुतांशी विभागप्रमुख व प्राचार्य गटातटाच्या राजकारणात सक्रिय असतात. चांगले शैक्षणिक उपक्रम राबवण्याच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्या विभागप्रमुखांची व प्राचार्याची संख्या मोठी आहे. शिवाय, त्यांचे राजकीय लागेबंधेही असतात. त्यामुळे अशा व्यक्तींची कुलगुरू पदावर नेमणूक झाल्यास विद्यापीठाची प्रगती होण्याऐवजी अधोगती झाल्याचे प्रकार वर्तमानकाळात दिसून येतात. शासनाच्या नवीन पात्रता निकषांमुळे त्यात काही सकारात्मक बदल होऊ शकतील, अशी आशा आहे.