Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

इंटरनेटने घेतली खडतर परीक्षा
नागपूर, २५ जून/प्रतिनिधी

दहावीच्या निकालाचे ‘बुकलेट’ न देता निकाल थेट मंडळाच्या संकेतस्थळावर टाकण्याच्या नव्या

 

पद्धतीचा त्रास आणि ताण दहावीचे परीक्षार्थी आणि पालकांना सहन करावा लागला. निकाल पाहण्यासाठी इंटरनेट सेवेचा राज्यभरात वापर सुरू असल्याने इंटरनेट सेवा विस्कळीत झाली. परिणामी निकालासाठी अनेकांना बरीच प्रतीक्षा करावी लागली. निकालाच्या निमित्ताने इंटरनेट कॅफे मालकांना मात्र चांगली कमाई करून दिली.
राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने दहावी-बारावी परीक्षांची गुणवत्ता यादी आणि निकाल पुस्तिका प्रसिद्ध करणे बंद केलेले आहे. हायटेक तंत्रज्ञानाचा बोलबाला असल्यामुळे परीक्षा मंडळाने दहावीचा निकाल पाहण्यासाठी यंदा चार संकेतस्थळे जाहीर केली होती. सकाळी ११ वाजता या संकेतस्थळावर दहावीचे निकाल उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थी, पालक आणि परीक्षार्थीच्या नातेवाईकांनी जवळचे नेटकॅफे तसेच जेथे इंटरनेट सेवा उपलब्ध आहे त्या प्रत्येक ठिकाणी फिल्डिंग लावून ठेवली होती. निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळांसाठी एकाच वेळी हजारोंच्या संख्येने ‘क्लिक’ करणे सुरू झाल्याने बराचवेळ संकेतस्थळांकडून प्रतिसादच मिळत नसल्याचा अनुभव आला. गुणवंतांचा कौतुक समारंभ बहुतेक शाळांनी दुपारी ठेवल्यामुळे परीक्षार्थी आणि पालकांना निकाल बघण्यासाठी इंटरनेटची खडतर परीक्षा द्यावी लागली.
काही वर्षांपूर्वी दहावी-बारावी निकाल पुस्तिका आदल्या दिवशीच वृत्तपत्रांच्या कार्यालयात पाठवण्यात येत होती. गेल्या काही वर्षांत हायटेक तंत्रज्ञाने सर्वच क्षेत्रात क्रांती केली असल्याने परीक्षा आणि निकाल ऑन लाईन झाले आहे. हायटेक तंत्रज्ञानावरील ताण वाढला तर त्याचा तापही होतो, याचा अनुभव आज नागपूरकरांनी घेतला.