Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

नाउमेद होऊ नका, मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

दहावीत अनुत्तीर्ण झालेल्या किंवा अपेक्षित गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद होऊ नये. तसेच

 

पालकांनीही त्यांच्यावर कुठेलही दडपण आणू नये, असा सल्ला बालरोग व मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.
आज दहावीचा निकाल लागला. त्यात यशस्वी होणाऱ्यांप्रमाणेच अपेक्षित गुण न मिळालेल्यांची तसेच अनुत्तीर्ण होणारेही बरेच आहे. त्यांच्यावर पालकांनी दडपण आणू नये तर, गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी उदोउदो करू नये. तसेच, अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी धीर देण्याची गरज असल्याचा सल्ला ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ श्रीकांत चोरघडे यांनी दिला आहे.
अपेक्षा ठेवली आणि त्यात यश आले नाही तर अपेक्षा भंग होणारच, असा प्रश्न उपस्थित करून दीर्घकालीन नियोजन आखून त्यावर अंमल केल्यास यश निश्चितच मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. विशेषत: अनुत्तीर्ण झालेल्या किंवा गुण कमी मिळालेल्या विद्यार्थ्यांवर पालकांचे अधिक दडपण येते. त्यांच्या पालकांनी त्यांना आणखी बरेच काही करायचे आहे. तू फक्त अभ्यास कर. आम्ही तुमच्या पाठीशी आहे, असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करण्याची खरी गरज आहे. दहावीची परीक्षा म्हणजे सर्वकाही नव्हे. यानंतर अनेक परीक्षा देऊन अपेक्षित यश मिळवता येते. तसेच, करिअरचे अनेक ऑप्शन असताना घाबरू नये, असा सल्ला बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव मोहता यांनी दिला. अपेक्षित यश मिळाले नाही, म्हणून त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नका. असे केल्यास मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. त्यांना योग्य सल्ला दिल्यास तो पुढील परीक्षेत यश प्राप्त करू शकतो, असे मत बालरोग तज्ज्ञ डॉ. निशिकांत कोतवाल यांनी व्यक्त केले.