Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विदर्भातील १२ शेतकऱ्यांना कृषीरत्न
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या कृषीरत्न पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यात

 

विदर्भातील बारा शेतकऱ्यांचा समावेश आहे.
वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कारासाठी वाशीम जिल्ह्य़ातील जांभरूणचे दत्ता लोनसुने व चंद्रपूर जिल्ह्य़ातील चारगाव बुद्रुक येथील मधुकर भलमे यांची निवड झाली आहे. राज्यातील एकूण दहा शेतकऱ्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जिजामाता कृषीभूषण पुरस्कारांसाठी निवड झालेल्या राज्यातील सात शेतकऱ्यांमध्ये अमरावती जिल्ह्य़ातील तळेगाव ठाकूर येथील सुनंदा जयकृष्ण दिवे यांचा समावेश आहे. नागपूरचे जगदीश जयंत बनसोड यांची वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कारासाठी निवड झाली आहे. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कारांमध्ये सर्वसाधारण गटातून १९ शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यात विदर्भातील चौघांचा समावेश आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्य़ातील महागाव तालुक्यातील वाकद येथील सीताराम जाधव, रातचांदणा येथील अरविंद बेंडे, भंडारा जिल्ह्य़ातील पवनी तालुक्यातील भेंडाळा येथील यादव मेंढे, भंडारा जिल्ह्य़ातील मोहाडी तालुक्यातील जांब येथील नरेन्द्र भुसारी यांचा समावेश आहे. उद्यान पंडित पुरस्कारांसाठी १६ शेतकऱ्यांची निवड झाली असून त्यात चार वैदर्भीय आहेत. यात बुलडाणा जिल्ह्य़ातील मेहकर तालुक्यातील जानेफळचे प्रवीण गट्टाणी, अकोला जिल्ह्य़ातील अकोट तालुक्यातील पणज येथील रमेश आकोटकर, नागपूर जिल्ह्य़ातील काटोलचे मनोज जवंजाळ व कळमेश्वर तालुक्यातील केतापारचे किशोर कन्हेरे यांचा समावेश आहे. कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी कृषी पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात येते. २००८ च्या पुरस्कारांसाठी नावे निश्चित करण्यासाठी मुंबई येथे कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.