Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांना निवेदन
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्यावतीने पदाधिकारी व अधिकारी यांच्यात विविध मागण्यांसाठी

 

बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून भूमी अभिलेख विभागात कर्मचारी कमी असल्यामुळे इतरांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. प्रशासनाच्या या कर्मचारी विरोधी धोरणामुळे मोठय़ा प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. यावेळी सादर केलेल्या निवेदनात भूमी अभिलेख कार्यालयातंर्गत नगर भुमापन आणि विशेष तालुका निरीक्षक, भूमि अभिलेख (गावठाण) कार्यालय महापालिकेच्या इमारतीत आहे. या इमारती अतिशय जीर्ण झाल्या असल्याने ही सर्व कार्यालय सर्व सोयींनी सज्ज असलेल्या इमारतीत स्थानांतरित करावी, कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देण्यात यावे, मोजणी कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच वर्षांपासून थकित असलेले प्रवास भत्ते देण्यात यावे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रस्ताव वेळीच पाठवण्यात यावे, कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल २-३ वर्ष पुरवण्यात येत नाही ते नियमितपणे पुरवण्यात यावे, ४५ वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांनाही औरंगाबाद प्रशिक्षण केंद्रात पाठवून प्रशिक्षण देण्यात यावे, नागपूर विभागातील उपसंचालक, भूमिअभिलेख पद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे, ते त्वरित भरण्यात यावे, पदोन्नतीने व बदलीमुळे झालेली रिक्त पदे तातडीने भरून कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोझा कमी करण्यात यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देयके त्वरित देण्यात यावी, या आणि इतर अनेक मागण्यांचा समावेश आहे.
या मागण्यांवर येत्या १५ दिवसात काही विचार न झाल्यास भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयापुढे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला.