Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कारच्या दारावर आदळल्याने एकाचा मृत्यू
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

कार चालकाने अचानक दार उघडल्याने त्यावर दुचाकी धडकल्याने ‘महाबँक’ कर्मचाऱ्याचा मृत्यू

 

झाला. धंतोली उद्यानाजवळ बुधवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या सीताबर्डी विभागीय कार्यालयातील कर्मचारी सतीश ऊर्फ यशवंत मधुसूदन मोहरीर (रा. धरमपेठ सोसायटी जयप्रकाश नगर) हे होंडा अ‍ॅक्टिव्हाने (एमएच/३१/केआर/९७५७) जनता चौकाकडून बँकेत जात होते. धंतोली उद्यानाजवळून ते जात असताना समोर उभ्या इन्होवा कारच्या (एमएच/३१/सीएम/६९८३) चालकाने अचानक दार उघडल्याने त्यावर दुचाकी धडकली. या अपघातात सतीश मोहरीर गंभीर जखमी झाल़े त्यांना गेटवेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री साडेनऊ वाजता त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या कार चालकाविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सतीश मोहरीर यांच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे. महाबँकेच्या कला व क्रीडा मंडळाच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप, मागास भागातील शाळांना आवश्यक वस्तूंचे वाटप आदी उपक्रम घेतले जात. या सर्व कार्यक्रमात सतीश मोहरीर यांचा सक्रिय सहभाग असायचा. भारतीय मजदूर संघ प्रणीत बँक कर्मचारी संघटनेचे ते कार्यकर्ते होते. सहकार नगर घाटावर त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिल दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत सतीश मोहरीर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी नगरसेवक मामा मोहरीर, बँक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक अशोक राजदेरकर तसेच महाबँक व बीएसएनलचे अनेक कर्मचारी उपस्थित होते.