Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विहारावरील इतर धर्मीयांचे वर्चस्व चिंताजनक -भंते आर्यवंसो
२८ जूनला नागपुरात धम्मसभा
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

बुद्धगयेतील महाबोधी विहारावर इतर धर्मियांचे वर्चस्व चिंताजनक बाब असली तरी, भारतीयांनी

 

स्वत: दबाव निर्माण करून या समस्येचे समाधान शोधले पाहिजे, असे मत थायलंडचे भंते आर्यवंसो यांनी येथे व्यक्त केले. ते तीन दिवसांच्या विदर्भ भेटीवर आले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भात धम्मसभा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील माहिती देण्यासाठी रविभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बुद्धाची शिकवण लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. महाबोधी विहारासंदर्भात ते म्हणाली की, ही समस्या गंभीर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही यासंदर्भात चर्चा होते. मात्र, महाबोधी विहारावर कुणाचे वर्चस्व राहावे ही भारताची अंतर्गत बाब असल्याने येथील लोकांनीच दबावगट निर्माण करून महाबोधी विहार बौद्धांना परत मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवे.
भंते आर्यवंसो यांची जगभरात ‘धूतांगवाशी आरण्यक’ अशी ख्याती आहे. आरण्यक बौद्ध भिक्षू ध्यान साधनेत निपूण असतात. त्यांच्या स्थायी प्रचंड ऊर्जा आणि प्रज्ञा समाधीतून तसेच आचरणातून निर्माण झालेली असते. भंते आर्यवंसो केवळ धार्मीक विधींमध्येच भाग घेत नाहीत तर, थायलंडवासीयांच्या समाजजीवनाशी निगडित दैनंदिन कामकाजाशी ते जोडले गेले आहेत. ध्यानसाधना या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. प्रत्येक आठवडय़ाला थाई रेडिओवर ते धम्म या विषयावर बोलत असतात. एकमेकांविषयी बंधुता, प्रेम, करुणेचे वातावरण विकसित होऊन देशांतर्गत कटुता दूर व्हावी, या उद्देशाने त्यांचे धम्म कार्यक्रम जगभर सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून विदर्भात ते तीन धम्मसभांना उपस्थित राहणार आहेत. प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठानच्यावतीने उद्या, २६ जूनला भंडारा येथे, अमरावती येथे २७ जूनला समता पर्व प्रतिष्ठानच्यावतीने तर, नागपुरात २७ जूनला वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी १ ते ४ या वेळेत भंते आर्यवंसो यांची धम्मसभा आयोजित करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला भंते आर्यवंसो यांच्यासोबत त्यांचे इतर सहकारी तसेच दुभाषी विनोद रंगारी, नगरसेवक डॉ. मिलिन्द माने उपस्थित होते.