Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

चॅनेलवाल्यांच्या ‘पळवापळवी’ ने गुणवंत भांबावले
नागपूर, २५ जून /प्रतिनिधी

सध्याचे युग माहिती तंत्रज्ञानाचे आणि जीवघेण्या स्पर्धेचे आहे असे सर्वत्र बोलले जाते. त्याचीच

 

प्रचिती आज दहावीच्या निकालाच्या निमित्ताने आली. आज निकाल जाहीर होणार हे माहीत असल्याने प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या मुलाखती, त्यांची छायाचित्रे आदींचे शेडय़ूल तयार करून ठेवले होते. सकाळी ११ वाजता निकाल जाहीर होताच कोण सर्वात आधी गुणवंतांपर्यंत पोहोचतो, यासाठी चढाओढ सुरू झाली. मोबाईलद्वारे संपर्क सुरू झाला. चॅनेलवाल्यांच्या या पळवापळवीने गुणवंत मात्र भांबावून गेले होते.
गुणवंतांना गाठण्यासाठी चॅनेलवाल्यांनी आधीच तयारी केली होती. बारावीच्या निकालाच्यावेळी इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांसाठी मंडळाने एक तास आधी निकाल घोषित केला होता. परिणामी मंडळावर वर्तमानपत्रांमधून ताशेरे ओढण्यात आले होते. त्यामुळे आज मंडळाच्या अध्यक्षांनी सकाळी ११ वाजता निकाल जाहीर करताच गुणवंतांच्या मुलाखतीचे लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी चॅनेलच्या प्रतिनिधींची धावपळ सुरू झाली आणि यातूनच गुणवंतांची अक्षरश: पळवापळवी करण्यात आली. एका चॅनेलशी बोलण्यासाठी एक गुणवंत राजी झाला आणि ऐनवेळी दुसऱ्या चॅनेलवाल्याने मोटारीत बसवल्याने तोसुद्धा भांबावला. या पळवापळवीमुळे अभ्यासू गुणवंतही चक्रावले आणि भविष्यातील स्पर्धेची जाणीवही कदाचित त्यांना झाली. अलीकडे वृत्तवाहिन्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आपोआपच त्याच प्रमाणात स्पर्धाही वाढली.
दहावीचा गुरुवारी निकाल जाहीर होणार असल्याचे समजताच चॅनलवाले कामाला लागले होते. शहरातील विविध महाविद्यालये तसेच प्राचार्याचे दूरध्वनी तसेच मोबाईल क्रमांक कार्यालयाला कळवण्यात आले होते. एखाद्या महाविद्यालयाचा विद्यार्थी विभागातून प्रथम आला म्हणजे त्यांच्याशी लगेच संपर्क करण्याची ही तयारी होती. ते मोबाईलवर संपर्क साधणार आणि येथील प्रतिनिधीने लगेच त्याला कॅमेऱ्यासमोर ओढण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावण्यात आली होती.
गुणवत्ता यादीच जाहीर केली जात नसल्यामुळे आता मंडळाच्या विभागीय कार्यालयात फारशी गर्दी होत नाही. निकाल जाहीर होण्याची वेळ ही ११ ची असली तरी चॅनलचे प्रतिनिधी मात्र दीड तास आधी मंडळात येऊन निकालाच्या प्रतीक्षेत होते. सोर्स वापरून लवकरात लवकर निकालाची पुस्तिका मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते पण, मंडळाने नियोजित वेळेत सर्वाना निकालाची प्रत देऊन निकाल घोषित केला.