Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अमरावती विभाग राज्यात तिसरा; नागपूर विभाग ‘सेकंड लास्ट’
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

राज्यातील आठ विभागीय शिक्षण मंडळात अमरावती विभागाचा निकाल ८३.१९ टक्के निकाल

 

लागला असून अमरावती विभागाने राज्यात तिसरे स्थान पटकावलेआहे तर, नागपूर विभागाचा निकाल ७६.२८ टक्के असून राज्यात नागपूर विभाग ‘सेंकड लास्ट’ आहे. नासिक विभाग ८५ टक्के निकाल लागून अव्वल स्थानावर आणि ७३.६५ निकाल लागून कोल्हापूर विभाग शेवटच्या स्थानावर आहे. नियमित आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची ही टक्केवारी आहे.
नागपूर विभागात २ लाख ४ हजार ७२६ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ५७ हजार ३२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हा निकाल ७६.८५ टक्के आहे. मुंबईच्या तुलनेत नागपूर फक्त १.८१ टक्के मागे आहे. अमरावती विभागात १ लाख ६८ हजार ५९९ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १ लाख ४० हजार २५९ म्हणजे ८३.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अमरावती विभागाचा निकाल पुण्यापेक्षा फक्त ०.२७ टक्के कमी आहे, हे विशेष. अलीकडच्या चार ते पाच वर्षांत नागपूर आणि अमरावतील विभागातील निकाल उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत गेले. आजची निकालाची टक्केवारी पाहता वैदर्भीय विद्यार्थी स्पर्धेत खरे उतरल्याचे दिसते. नागपूर विभागाचा निकाल गेल्यावर्षीच्या तुलनेत १.८५ टक्के वाढला आहे.
नासिक विभागात १ लाख ८३ हजार १४२ विद्यार्थापैकी १ लाख ५५ हजार ६६२ अर्थात ८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे विभागाचा निकाल ८३.४६ टक्के आहे. या विभागात २ लाख ४९ हजार ५५२ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ८ हजार २७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. लातूर विभाग चवथ्या स्थानावर असून त्यांच्या पॅटर्नचा प्रभाव कमी झाल्याचे दिसते. या विभागातून १ लाख ५ हजार ५८५ विद्यार्थ्यांपैकी ८५ हजार ९५० अर्थात ८१.४० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबादचा निकाल ८०.९० टक्के असून १ लाख ५४ हजार ७२४ विद्यार्थ्यांपैकी १ लाख २५ हजार १७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
मुंबई विभागात ३ लाख ३४ हजार ७२० विद्यार्थ्यांपैकी २ लाख ६३ हजार ३०७ अर्थात ७८.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यात सर्वात कमी निकाल कोल्हापूरचा आहे. या विभागात १ लाख ९३ हजार ६२५ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४२ हजार ६०८ अर्थात ७३.६५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
नियमित विद्यार्थ्यांच्या निकालातही नासिक विभाग आघाडीवर तर नागपूर विभाग ‘सेकंड लास्ट’ आहे. या विभागांचा निकाल अनुक्रमे ८७.९३ टक्के आणि ८०.६९ टक्के आहे. यात अमरावती विभाग ८५.४४ निकालाने चवथ्या स्थानावर आहे. मुंबईपेक्षा अमरावतीचा निकाल ०.१४ टक्के अधिक आहे.
निकालाबाबत नासिक आणि पुणे विभागात अत्यंत चुरस झाल्याचे दिसते. या दोन्ही विभागाच्या निकालात जेमतेम ०.०१ टक्के फरक आहे. पुण्याचा निकाल ८७.९२ टक्के आहे. मुंबईचा निकाल ८५.३० आहे. औरंगाबाद ८३.७१ टक्के आणि लातूर ८२.८४ टक्के निकाल लागला आहे. कोल्हापूर विभागाला सर्वात शेवटच्या स्थानावर राहून ७७.८१ टक्के निकालावर समाधान मानावे लागले.