Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

कोणत्याही शिकवणीविना रमीझ रात्रशाळेत अव्वल
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

गेल्यावर्षी दहावीची परीक्षा तोंडावर असताना प्रकृती अस्वस्थामुळे परीक्षा देऊ शकलो नव्हतो.

 

त्यामुळे घरच्या लोकांच्या आग्रहाखातर रात्रशाळेत प्रवेश घेऊन कुठलीही शिकवणी न लावता अभ्यास करून यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया रात्र शाळेतून राज्यातून दुसरा आणि नागपूर विभागातून प्रथम आलेला रमीझ आझाद बक्षी या विद्यार्थ्यांने व्यक्त केली.
शिवाजी नाईट स्कूल शाळेच्या रमीझ आझाद बक्षीला ५१० गुण (७८. ४४ टक्के)आहेत. आसी नागर भागात राहणारा रमीझ म्हणाला, गेल्यावर्षीपर्यंत सिंधी हिंदी शाळेत होतो. दहावीची परीक्षा असताना प्रकृती बिघडली त्यामुळे एकही पेपर देऊ शकलो नाही त्यामुळे वाईट वाटले होते. माझ्यासोबतचे मित्र गेल्यावर्षी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. वडिलांनी रात्र शाळेत प्रवेश घेण्यास सांगितल्यामुळे शिवाजी नाईट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. शाळेत होणाऱ्या अभ्यासाची घरी उजळणी करत होतो त्यामुळे शिकवणी वर्गाची गरज भासली नाही. घरच्यांना मी इंजिनियर व्हावे, असे वाटते. परंतु, मला वैज्ञानिक व्हायचे आहे. रात्र शाळेत प्रवेश घेण्यामागे कुठलाही उद्देश नव्हता. अनेक विद्यार्थी दिवसभर मोलमजुरी करत रात्र शाळेत शिक्षण घेत असतात त्यामुळे आपणही काही काम करून शिक्षण घ्यावे असे वाटत होते. पण, घरच्यांनी विरोध केल्यामुळे शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले, असे रमीझने सांगितले. रमीझचे वडील असद बक्षी एस.टी. महामंडळात कर्मचारी आहेत.