Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

निवडीला आव्हान देणारी याचिका रद्दबातल करा; महापौर इवनातेंची न्यायालयाला विनंती
नागपूर, २५ जून/ प्रतिनिधी

आपले अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र खरे असल्याने आपल्या निवडीला आव्हान देणारी याचिका

 

रद्दबातल ठरवावी, अशी विनंती महापौर माया इवनाते यांनी न्यायालयाला केली आहे.
अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या वॉर्डातून नगरसेविका म्हणून माया इवनाते व पुष्पा पराते महापालिकेवर निवडून आलेल्या आहेत. मात्र, त्यांनी सादर केलेले गोंड जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याने त्यांची निवड रद्दबातल ठरवावी, तसेच माया इवनाते यांचे महापौरपदही रद्द करावे, अशी मागणी श्रावण भनारकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोरील याचिकेत केली आहे. या याचिकेत सादर केलेल्या उत्तरात इवनाते यांनी ही विनंती केली आहे.
माझ्या जात प्रमाणपत्राची अनुसूचित जाती-जमाती प्रमाणपत्र कायद्याच्या कलम ७ अन्वये याआधीच पूर्ण चौकशी झाली आहे. १९४४ सालचे आजोबांचे गोंड जातीचे हे प्रमाणपत्र समितीने वैध मानले असल्याचा इवनाते यांनी उल्लेख केला आहे. मात्र संबंधित तहसीलदाराने निवृत्तीनंतर ९ वर्षांनी, प्रमाणपत्रावरील स्वाक्षरी त्याची नसावी अशी शक्यता समितीकडे व्यक्त केल्याने त्यांचे जुने प्रमाणपत्र बोगस होते, असे सांगून भानारकर यांनी त्याला आव्हान दिले आहे.
मी अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आली नसून, खुल्या वॉर्डातून निवडून आली आहे. नंतर महापौरपद अनुसूचित जमातींसाठी राखीव झाल्याने माझी त्यावर निवड झाली, याकडेही इवनाते यांनी लक्ष वेधले आहे. भानारकर यांनी यापूर्वीही माझ्याविरुद्ध अशीच याचिका केली होती आणि त्यात न्यायालयाने जात प्रमाणपत्र समितीला या प्रमाणपत्राच्या चौकशीबाबत पूर्ण मोकळीक दिली होती याचा त्यांनी उल्लेख केला आहे.
पडताळणी समितीचा प्रमाणपत्राबाबतचा आदेश विस्तृत असून त्यांनी हे प्रमाणपत्र वैध ठरवले आहे असे त्यांचे म्हणणे आहे. या याचिकेतील इतर प्रतिवादींनी त्यांचे उत्तर याआधीच सादर केले आहे. याचिकेवरील पुढील सुनावणीसाठी न्या. सिन्हा व न्या. भंगाळे यांच्या खंडपीठाने १८ जुलै ही तारीख निश्चित केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे किशोर आंबिलवादे, महापालिकेतर्फे सुधीर पुराणिक, तर इवनाते यांच्यातर्फे एस.एस. सन्याल या वकिलांनी काम पाहिले.