Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सिलेंडरचा भडका उडाल्याने चौघे भाजले
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

स्वयंपाक करताना सिलेंडरचा भडका उडाल्याने चौघे भाजले. या घटनेमुळे निवासी भागात

 

सिलेंडरचा साठा केल्याचे उघडकीस आले असून एका गॅस एजन्सीच्या मालकाला अजनी पोलिसांनी अटक केली.
दक्षिण नागपुरातील द्वारकापुरी भागात बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या परिसरात भाडय़ाने घेतलेल्या मोठय़ा खोलीत काहीजण स्वयंपाक करीत होते. हा स्वयंपाक करीत असताना अचानक सिलेंडरमधून भडका उडाला. या घटनेत चौघे भाजले. सुमेर लादुराम चौधरीसह, नैनाराम भगुताराम चौधरी, अशोक शिवलाल चौधरी व भोलाराम खिलाराम चौधरी हे भाजले. सुमेरला मेडिकल रुग्णालयात तर, इतरांना मानेवाडा मार्गावरील वैरागडे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे द्वारकापुरी भागात धावपळ उडाली. घटनेची माहिती समजताच अजनी पोलीस तेथे पोहोचले. एका मोठय़ा जागेत १०५ सिलेंडर होते. त्यापैकी ८२ सिलेंडरमध्ये गॅस होता. सुयोग नगरातील धुर्वे गॅस एजंसीचे चार कर्मचारी या जागेत राहतात. मूळचे राजस्थानचे ते रहिवासी आहेत. एजंसित येणारे गॅस सिलेंडर या राहत्या जागेत ठेवले जात होते आणि येथूनच ते ग्राहकांकडे वितरित केले जात होते. निवासी वस्त्यांमध्ये हे अवैध गोदाम होते. तेथे सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजनाही करण्यात आल्या नव्हत्या. अजनी पोलिसांनी याची गंभीर दखल घेत गॅस एजंसीचा मालक आरोपी नीलमणी ज्योतीराम धुर्वे (रा. लक्ष्मी नगर) याला अटक केली. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामिनावर सुटका केली.