Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

वाहतूक पोलिसांची आजपासून धडक मोहीम
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर तसेच क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या

 

बस सोडून इतर वाहनांवर उद्या, शुक्रवारपासून वाहतूक पोलिसांची धडक कारवाई सुरू होणार आहे.
उन्हाळ्याची सुटी संपून उद्या, शुक्रवारपासून शहरातील सर्व शाळा सुरू होत आहेत. अपघातांना आळा घालण्याच्या दृष्टीने शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवसापासून पोलिसांनी खबरदारी घेणे सुरू केले आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रिक्षा किंवा ऑटो रिक्षात कोंबून नेले जाते. आतातर चारचाकी कारमधूनही विद्यार्थ्यांची ने-आण सुरू झाली आहे. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे आणि क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांंची ने-आण करणे अपघातांना आमंत्रणे देणारी असल्याचे पोलीस वारंवार सांगतात. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अल्पवयीन मुलांना शाळेत दुचाकी आणू देऊ नका तसेच क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ऑटो रिक्षात बसवू नका, अशा सूचना शिक्षण खात्यामार्फत सर्व शाळांना आधीच कळवण्यात आल्या आहेत. आता वाहतूक पोलीस उद्यापासून सक्तीने कारवाई सुरू करणार आहेत. ऑटो रिक्षात अथवा सायकल रिक्षात पाचपेक्षा जास्त विद्यार्थी दिसल्यास दंड केला जाणार असून ते वाहन जप्त केले जाणार आहे.
चारचाकी वाहन तसेच शालेय बसमधूनही क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी दिसल्यास कारवाई केली जाईल, असे वाहतूक पोलिसांनी कळवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याची काळजी पालकांनी घेण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.