Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सोमलवारचा भर विद्यार्थ्यांचे ‘बेसिक’ पक्के करण्यावर -राणे
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेत १३९ विद्यार्थ्यांना ९० टक्यांहून अधिक गुण मिळणे शाळेसाठी खरोखरच

 

अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांचे ‘बेसिक’ पक्के करून प्रत्येकावर घेतलेली मेहनत हेच सोमलवार रामदासपेठ शाळेच्या विद्यार्थ्यांच्या यशाचे गमक असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक सी.एल. राणे यांनी ‘लोकसत्ता’शी सांगितले. मेरिटच्या विद्यार्थ्यांंची खाण म्हणून परिचित असलेल्या सोमलवार संस्थेच्या तिन्ही शाळांच्या एकूण २४६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकाविण्यात यश मिळाले आहे.
अलीकडे दहावी व बारावीमध्ये शिकवणी वर्ग लावण्यावर विद्यार्थ्यांचा विशेष भर असतो. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांनी शिकवणी वर्ग लावले असतील, तरीही शिक्षकांकडून त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यात येते. दहावीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रत्येक वर्षी शाळेचे व्यवस्थापन मंडळ व शिक्षकांकडून वर्षभराचे नियोजन करण्यात येते. तसेच वर्षभर विद्यार्थ्यांना कुठल्याही अडचणी येणार नाहीत याची शाळेकडून पूर्ण काळजी घेण्यात येते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दहावीमध्ये शाळेचे विद्यार्थी सतत गुणवत्ता यादीत झळकत असल्याचे राणे म्हणाले. दहावीमध्ये विद्यार्थी शिकवणी वर्ग लावत असले, तरी शाळेतील शिक्षकांना शिकवणी वर्ग घेण्याची परवानगी नाही. त्यामुळे शिक्षक १०० टक्के योगदान देऊ शकतात.
वर्षभराचे नियोजन करून त्यानुसार शिकवणे हे फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नाही, इतर वर्गासाठी याच प्रकारचे नियोजन करण्यात येते. जेणेकरून विद्यार्थ्यांना संपूर्ण विकास होईल शकेल यावर शाळेचा अधिक भर असतो. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांचे ‘बेसिक’ पक्के असेल, तर त्याला दहावीची परीक्षा उत्तीर्ण करताना कुठलीही अडचण होत नाही. त्यामुळे यावर पहिल्या वर्गापासूनच भर देण्यात येतो, असेही राणे यांनी सांगितले. यंदा सोमलवारच्या रामदासपेठ शाखेच्या ३०९ विद्यार्थ्यांपैकी ३०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.