Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मिळालेल्या यशाने संतुष्ट -अश्विनी मराठे
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

केवळ सात गुणांनी राज्यातून पहिली येण्याचा मान हुकला असला, तरी याची अजिबात खंत नाही.

 

मिळालेल्या यशाने संतुष्ट आहे, अशी प्रतिक्रिया अश्विनी मराठे हिने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. विभागातून पहिले आणि राज्यातून तिसरे येण्याची कधी कल्पनाही केली नव्हती त्यामुळे ज्यावेळी सकाळी वृत्त वाहिन्यांवर बातमी कळली तेव्हा असं खरंच घडलं आहे यावर विश्वासच बसत नव्हता, अशी प्रांजळ कबुलीही तिने दिली.
सोमलवार हायस्कूलच्या रामदासपेठ शाखेची विद्यार्थिनी अश्विनी संजय मराठे हिने राज्यातून तिसरी आणि नागपूर विभागातून प्रथम येण्याच मान पटकावला. तिला ९७.५३ टक्के गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे अश्विनीने ९० ते ९२ टक्यांपेक्षा अधिक गुण मिळतील, अशी अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे राज्यात तिसरी आणि विभागात प्रथम येऊ, असे तिला वाटले नव्हते.
अगदी सर्वसाधारण मराठी कुटुंबातील अश्विनी एक उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू आहे. मात्र, दहावीमध्ये अभ्यासामुळे तिला खेळ सोडावा लागला. पण, तरीही अवांतर वाचन, पेंटिगचा छंद तिने जोपासलेला आहे. अभ्यासाचे असे विशेष कधी टेन्शन आले नाही. मात्र, निकालाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसे थोडे दडपण जाणवू लागले होते. सकाळी भावाला इंटरनेट कॅफेमध्ये निकाल पाहण्यासाठी पाठवले होते. मात्र, त्याआधीच टी.व्हीवर बातमी झळकल्याने आश्चर्याचा धक्काच बसला, असे अश्विनीने सांगितले.
दहावीमध्ये सर्वच विषयांचा नियमित अभ्यास केला. परंतु, मराठी विषयाची भीती वाटत असल्याने या विषयाला वेगळा वेळ दिला. याचे कारण सांगताना अश्विनी म्हणाली, मराठी चांगले वाचता आणि बोलता येते तरीही लिहिताना अनेकदा शब्द सुचत नसल्याने भीती वाटत होती. मात्र, नियमित अभ्यासाने ही अडचण दूर झाली. गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन आवडते विषय असून यात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. जीवशास्त्र विषयाशी आवड नसल्याने भविष्यात इलेक्ट्रॉनिक्स किवा संगणक विषयात अभियांत्रिकीला प्रवेश घेणार असल्याचे अश्विनीने सांगितले. अभ्यासाचे विशेष नियोजन केलेले नव्हते. पहाटे उठून अभ्यास केल्यास नक्कीच चांगला अभ्यास होतो, असा विश्वास होता, त्यामुळे दररोज पहाटे उठून नियमितपणे अभ्यास करण्यात वर्षभर कुठेही खंड पडू दिला नाही. शिवाय शिक्षकांनी शिकवणी वर्गातही गणित, विज्ञान यासारख्या विषयांचा चांगला सराव करून घेतल्याने याचा मोठय़ा प्रमाणात फायदा झाला. त्यामुळे कुठल्या एकामुळे यश मिळाले, असे म्हणणे योग्य होणार नाही.
निकाल जाहीर झाल्यापासून अश्विनीच्या सुरेंद्र नगरातील घरी आज सकाळपासूनच आनंदाचे वातावरण होते. अभिनंदन करणारे फोन सकाळी दहा वाजेपासून खणखणत होते. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी झाल्याने अश्विनीचे कुटुंबीय इंटरव्ह्य़ू देण्यात व्यस्त होते. अश्विनी साऱ्यांच्या प्रश्नांना आत्मविश्वासाने सामोरे जात होती. अश्विनीचे वडील संजय मराठे यांचे काँग्रेसनगरात किराण्याचे दुकान असून आई अनिता गृहिणी आहे. अश्विनीचा मोठा भाऊ अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षांला शिकत आहे.