Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

आणि तिशाला शब्दच सुचत नव्हते..
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

वडिलांनी भुसावळला इंटरनेटवर निकाल बघून तिशा राज्यात मागासवर्गीयांमधून तिसरी आल्याचे

 

कळवल्यानंतरही तिचा विश्वासच बसला नाही. विमलताई तिडके कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी असलेल्या तिशा सुनील गजभिये हिला ९६.६१ टक्के गुण मिळाले असून गणित आणि संस्कृत विषयात तिला पैकी गुण आहेत. तिशाला निकाल कळला तेव्हा घरात ती, आई आणि लहान बहीण अशा तिघीजणीच होत्या. तिशाचे वडील भुसावळला महावितरणमध्ये अभियंता आणि आई रजनी गृहिणी आहे. मेरिट आल्याचा आनंद साजरा करायला तिशाचे वडील नागपुरात नसल्याने त्यांची अनुपस्थिती खूपच जाणवत होती. तिशाच्या आईला तर प्रतिक्रिया देण्यासाठी शब्दच सुचत नव्हते. मुलीवर टाकलेला विश्वास तिने सार्थ ठरवल्याचे त्यांनी सांगितले.
दररोज पाच ते सहा तासांचा अभ्यास आणि आठवडय़ातून एकदा आवडत्या छंदाला वेळ असे संतुलन साधले गेल्याने त्रास झाला नाही. पहिल्या पेपरला जाताना थोडी धाकधुक होती. नंतरचे पेपर सोपे गेले, असे तिशाने सांगितले. निकाल कळल्यानंतर तिला क्षणभर काहीच सुचले नाही. त्याचवेळी शाळेतून बोलावणे आले आणि लहान बहिणीला नातेवाईकांच्या सुपूर्द करून ती थेट शाळेत पोहोचली. मुलीचे यश तिच्यासोबत सेलिब्रेट करू शकत नसल्याची खंत तिशाच्या वडिलांनी व्यक्त केली पण, लवकरच भुसावळवरून परतल्यानंतर हे यश साजरे करू असे ते म्हणाले. तिशाच्या शिक्षिकांनीसुद्धा गेल्या पाच वर्षांत तिशाने कधी तक्रारीला जागा दिली नसल्याचे सांगितले. मैत्रिणी, शिक्षिका आणि नातेवाईकांमध्ये सालस स्वभावाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिशाला डॉक्टर व्हायचे आहे.