Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

विशिष्ट वातावरणात अभ्यास करण्यावर विश्वास नाही - मिहीर
नागपूर, २५ जून / प्रतिनिधी

अभ्यास कसा करायचा यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा, ज्या वातावरणात अभ्यास चांगला होत

 

आहे, असे वाटत असेल त्या वातावरणातच अभ्यास करावा. त्यामुळे दहावीला असे काही विशिष्ट वातावरण तयार करून अभ्यास करण्यावर कधीच विश्वास नसल्याची प्रतिक्रिया मिहीर महाकाळकरने व्यक्त केली.
सोमलवार रामदासपेठ शाळेतून ९७.०७ टक्के गुण मिळवून नागपूर विभागात तिसरा आलेल्या मिहीरला दहावीत चांगल्या यशाची अपेक्षा होती. त्यासाठी सुरूवातीपासूनच अभ्यास केला. आई-वडील दोघेही डॉक्टर असले तरी अभियंता व्हायचे असल्याने दहावीनंतर इलेक्ट्रॉॅनिक्स विषय घेऊन पुढे त्यातच करिअर करण्याची इच्छा आहे. घरात वैद्यकीय क्षेत्राचे वातावरण असताना अभियांत्रिकीकडे कल का? असे विचारले असता मिहीर म्हणाला, इलेक्ट्रॉनिक्स, गणितात विशेष रुची असल्याने भविष्यात अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेण्याची इच्छा असल्याचे मिहीर म्हणाला.
मिहीरला त्याच्या यशाचे गमक विचारले असता, दहावीसाठी कुठलेही विशिष्ट प्रकारचे नियोजन केले नाही, मात्र, नियमित अभ्यास केला. एकीकडे दहावी व बारावीत पाल्य असताना घरात अभ्यासाचे वातावरण राहावे यासाठी पालकांकडून वातावरण निर्मितीसाठी काही प्रयत्न करण्यात येतात, मात्र, मिहीरने याबद्दल साफ असहमती दर्शवित असे कुठल्याही पद्धतीवर त्याचा विश्वास नसल्याचे सांगितले. पण, एखाद्याला ज्या वातावरणात आपला अभ्यास होतो असे वाटत असेल, त्याने तो त्याचप्रकारे ‘कंटिन्यू’ करावा त्यात कुठलाही बदल करू नये असे आपल्याला नेहमी वाटते. मग, ती मित्रांबरोबर ग्रुप स्टडी असो, किवा अजून कुठल्या प्रकारचे केलेला अभ्यास असो. अभ्यास होणे हे अत्यंत महत्वाचे असल्याचे मिहीर म्हणाला.
आई वडील डॉक्टर असले, तरी त्यांच्याकडून कधीच वैद्यकीय क्षेत्रातच करिअर करण्यासाठी दबाव आला नाही. करिअर निवडीसाठी घरातून पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे मिहीरने सांगितले. शिकवणी वर्गाबाबत विचारले असता मिहीर म्हणाला, गणित, विज्ञान आणि संस्कृत विषयासाठी शिकवणी वर्ग लावले असले, तरी शाळेतील शिक्षकांनी सर्वच विषयांकडे लक्ष देऊन चांगल्या प्रकारे अभ्यास करवून घेतला. मिहीरची बहीण सोनल महाकाळकर हीसुद्धा दहावीत गुणवत्ता यादीत झळकली होती.