Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

नवी मुंबईतून भारती विद्यापीठाची जयश्री खांडेकर प्रथम
बेलापूर/वार्ताहर

माध्यमिक शालांत परीक्षेत नवी मुंबईतून भारती विद्यापीठ प्रशाळेची जयश्री खांडेकर ही विद्यार्थिनी ९५.३८ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. जयश्रीने मुंबई विभागात मागासवर्गीयांमध्ये दुसरा येण्याचा मान पटकाविला आहे. नवी मुंबईतून यंदा दहावीसाठी १० हजार ५६७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी नऊ हजार ८२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये पाच हजार २२२ मुले तर चार हजार ६०२ मुलींचा समावेश आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण एक टक्क्याने जास्त आहे. नवी मुंबईत एकूण १०१ शाळा असून त्यापैकी३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला .
पालिका शाळा चमकल्या
नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ व ऐरोली येथील शाळांचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक लागल्याने खाजगी शाळांच्या स्पर्धेत आपणही कमी नसल्याचे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. महापालिका शाळांकडे बघण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन बदलणारे हे यश असल्याची प्रतिक्रिया शिक्षण मंडळ सभापती रवी अय्यर यांनी व्यक्त केली. नेरुळ येथील शाळेचा निकाल ९४ टक्के लागला असून, सुप्रिया यादव (९०.१५ टक्के) विशाल ताकवले ८० टक्के, तर ऐरोली शाळेतील प्रतीक भिसे ८४.४६ टक्के, अजय साबळे ८२.३० टक्के इतका निकाल लागला आहे.

उरण तालुक्यात उत्कर्षा कदम प्रथम
उरण/वार्ताहर : तु. ह. वाजेकर फुंडे विद्यालयाची उत्कर्षा कदम ही विद्यार्थिनी ९५.५६ टक्के गुण मिळवून उरण तालुक्यातून पहिली आली. उरण तालुक्यातील २५ शाळांमधून ७१.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती जिल्हा शिक्षण अधिकारी विनायक जाधव यांनी दिली. या शाळांमधून तु. ह. वाजेकर (फुंडे) विद्यालयातील उत्कर्षा कदम ही विद्यार्थिनी ९५.५६ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आली आहे. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अकरावी प्रवेशासाठी भाजपची ११ मदत केंद्रे
बेलापूर/वार्ताहर: अकरावी प्रवेशासाठी नवी मुंबई भाजपच्या वतीने ११ मदतकेंद्रांचे उद्घाटन भाजप प्रदेश नेते सुरेश हावरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी हावरे म्हणाले, सर्वाकडे नेटची व्यवस्था असेलच असे नाही. त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांना मदतीचा हात भाजपने पुढे केला आहे. या मदतकेंद्रांवर विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी कागदपत्रे अटेस्टेड करून दिली जाणार आहेत. २५ जून ते ५ जुलैपर्यंत ही मदत केंद्रे कार्यान्वित राहणार आहेत. विवेकानंदनगरमधील भाजप जनसंपर्क कार्यालय, सीवूड येथील नगरसेवक भरत जाधव यांचे कार्यालय, नेरुळ फेज- १ मधील भाजप कार्यालय, तुर्भेगाव, वाशी येथील भाजपचे मध्यवर्ती कार्यालय, सानपाडा आदी ११ ठिकाणी ही मदतकेंद्रे आज सुरू करण्यात आली.

ओंकार पाटील पनवेलमध्ये प्रथम
पनवेल/प्रतिनिधी - गुरुवारी घोषित झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालात नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयाचा ओंकार नितीन पाटील हा विद्यार्थी पनवेल तालुक्यात प्रथम आणि जिल्ह्यात दुसरा आला. त्याला ६५० पैकी ६१८ गुण (९५.०७ टक्के) मिळाले.

क्षुल्लक कारणावरून दोन मुलांसह महिलेने जाळून घेतले
बेलापूर,/वार्ताहर: क्षुल्लक कारणावरून आईने दोन मुलांसह स्वत:स जाळून घेतल्याची घटना तुर्भे स्टोअर येथे बुधवारी सकाळी घडली. यामध्ये राजनंदिनी सुरवसे (३) या बालिकेचा दुर्दैवी अंत झाला. राजनंदिनीची आई अनिता ही ७० टक्के भाजली असून पृथ्वी हा तिचा दोन वर्षांचा मुलगा किरकोळ भाजला आहे. बुधवारी सकाळी अनिताने रागाच्या भरात घराबाहेर खेळत असलेल्या राजनंदिनी व पृथ्वीला घरात नेले व स्वत:सह मुलांवर रॉकेल ओतून जाळून घेतल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. मुलांची आरडाओरड व आगीच्या ज्वाळा पाहून शेजारच्यांनी सुरवसेंच्या घराचा दरवाजा तोडून आग विझविली व जखमींना तातडीने रुग्णालयात नेले. घटना घडून आठ तास उलटले तरी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तसेच त्वरित तक्रार करूनही हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस चौकीतून एकाही पोलीस कर्मचाऱ्याने घटनास्थळी येण्याची तसदी घेतली नाही.