Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी दरवर्षी दोन हजार कोटी रूपये द्या - आ. रोहिदास पाटील
धुळे / वार्ताहर

खान्देशसह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पुढील तीन वर्षांसाठी प्रत्येक वर्षी दोन हजार कोटी रुपये देण्याची मागणी आपण वेळोवेळी केली असून खान्देशचा विकास भरून काढण्यासाठी तुटपुंजा निधी मिळाला तर तो चार जिल्ह्य़ांमध्ये वाटप होऊन निधीची कमतरता भासत राहील, अशी शक्यता आ. रोहिदास पाटील यांनी व्यक्त केली आहे.

बालकामगार निर्मूलन कायद्याविषयी जनजागृती आवश्यक - न्या. ढवळे
नंदुरबार / वार्ताहर

देशातील बालकामगारांसारखा बिकट प्रश्न सोडविण्यासाठी बालकामगार निर्मूलन कायद्याविषयक जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश (वरिष्ठस्तर) ए. एम. ढवळे यांनी बालकामगार प्रतिबंधक सप्ताहानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले.

धुळे बाजार समितीत शेतकऱ्यास हमालांची मारहाण
धुळे / वार्ताहर

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेंगा विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला हमालांकडून बेदम मारहाण करण्यात आल्यानंतर तक्रार करूनही बाजार समितीने हमालांवर कारवाई न करता उलट लोणखेडी गावाहून आलेल्या शेतकऱ्याचा माल मोजून घेण्यासाठी टाळाटाळ करण्याचा प्रकार घडला. बाजार समितीच्या बोटचेपे धोरणाच्या शेतकऱ्यांनी निषेध केला असून शेतकऱ्यांना मारहाण होण्याची घटना म्हणजे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे.

धुळे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील - खा. सोनवणे
धुळे / वार्ताहर

शिवसेना आणि भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर आपण निवडून आलो आहोत. जिल्हा परिषद, पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता असल्याने ग्रामीण भागातील चाळीस वषार्ंचा विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी आपण खासदार या नात्याने डोळसपणे काम करू, अशी ग्वाही खा. प्रतापदादा सोनवणे यांनी दिली. वरखेडे ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नेते प्रा. शरद पाटील हे होते.

इगतपुरीतील ३९ ग्रामपंचायतींची जुलैमध्ये निवडणूक
इगतपुरी / वार्ताहर

तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २६ जुलै रोजी ही निवडणूक होणार असल्याची माहिती तहसीलदार रवींद्र सपकाळे यांनी दिली. तालुक्यातील घोटी, वाडिवऱ्हे, गोंदे, मुकणे, वाघेरे, कुऱ्हेगाव आदी प्रतिष्ठित ग्रामपंचायतींचा समावेशही यामध्ये आहे. याशिवाय जानोरी, त्रिंगलवाडी, टाकेद खुर्द, भावली खुर्द, मानवेढे, पिंपळगाव डुकरा, पिंपळगाव धाडगा, बोरली, खेड, रोनित, खंबाळे, माणिखांब, बेलगाव तऱ्हाळे, भरवीर खुर्द, अडसरे, साकुर, घोटी खुर्द, बलायदुरी, शिरसाठे, वाळविहीर, चिचलेखैरे, आवळखेडे, आंबेवाडी, कुरूंगवाडी, धामणगाव, तळोशी, पिंप्रीसदो, शेनवड या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ६ ते ११ जुलै दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे, १३ जुलै अर्जांची छाननी, १५ जुलै अर्ज माघार घेणे, २६ जुलै मतदान, तर २७ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

धुळे येथे सामाजिक न्याय दिनानिमित्त आज दिंडी
धुळे / वार्ताहर

छत्रपती शाहु महाराज यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र शासनातर्फे सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त २६ जून रोजी येथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुधीर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिन मादक पदार्थ सेवन व अवैध व्यापार विरोधी दिन म्हणूनही साजरा करण्यात येत असल्याने व्यसनाच्या पुतळ्याचे दहन व पथनाटय़ाचे आयोजनही करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता समता दिंडी काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कोल्हे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतीश वळवी, वरिष्ठ समाजकल्याण अधिकारी विलास कर्डक यांनी केले आहे