Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

पुणे विभागात मुलांची बाजी! अक्षय-नचिकेत प्रथम;
दहावीचा निकाल ८३.४६ टक्के
विद्येच्या माहेरघरावर नगर-सोलापूरची सरशी
पुणे, २५ जून/खास प्रतिनिधी
हडपसरच्या साधना विद्यालयाचा अक्षय भीमराव चाटे आणि अहमदनगरच्या श्री समर्थ विद्यामंदिरच्या नचिकेत विवेक मराठे यांनी ६५० पैकी ६२७ गुण (९६.४६ टक्के) मिळवून पुणे विभागात अव्वल स्थान पटकाविले आणि मुलींच्या वर्चस्वाला शह देत यंदा मुलांनी बाजी मारली! पुणे विभागाचा दहावीचा निकाल ८३.४६ टक्के लागला आहे. विद्येचे माहेरघर म्हणून गौरविण्यात येणाऱ्या पुणे जिल्ह्य़ाचा निकाल ८१.३१ टक्के लागला असून अहमदनगरने ८६.८४ टक्के व सोलापूरने ८४ टक्के निकालासह पुण्यावर बाजी मारली!!

‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, अहिल्या देवी सुपर स्टार’
पुणे, २५ जून/प्रतिनिधी

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच अहिल्यादेवी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांचा गजरात आणि ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, अहिल्या देवी सुपर स्टार’, ‘वुई आर दी विनर, वुई आर दी चँम्पियन’, ‘आवाज कुणाचा अहिल्यादेवीचा..’ अशी घोषणाबाजी करत एकच जल्लोष केला. अहिल्यादेवी प्रशालेतील पूजा पाटील हिने नुकत्याच झालेल्या दहावीच्या परीक्षेत ६५० पैकी ६२५ गुण प्राप्त करीत पुणे विभागात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तसेच पुणे विभागात दुसरा क्रमांकही पटकाविला आहे. ही वार्ता समजताच शाळेतील विद्यार्थिनींनी एकच जल्लोष करीत आपल्या सहकारी मैत्रिणीने मिळविलेल्या यशाचा आनंद व्यक्त केला. तसेच रमणबाग प्रशालेतील शैलेश केळकर यालाही ६५० पैकी ६२५ गुण प्राप्त झाल्याने विभागात दुसरा येण्याचे भाग्य लाभले.

ऐन पावसाळय़ात ६९ टँकर सुरू
वरुणराजाच्या वक्रदृष्टीने ग्रामीण जनता हवालदिल

पुणे, २५ जून/खास प्रतिनिधी

कोरडी पडत चाललेली धरणे, आटलेले पाण्याचे स्रोत, तळ उघडा पडलेल्या विहिरी आणि पावसाचा थांगपत्ताही नसल्याने ग्रामीण भागातील जनता हवालदिल झाली आहे. पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा थेंबही नसलेली जिल्ह्य़ातील ७६ गावे आणि ३३३ वाडय़ा-वस्त्यांना ऐन पावसाळ्यात टँकरवर निर्भर राहावे लागले आहे. चार वर्षांपूर्वी जिल्ह्य़ात पडलेल्या दुष्काळाची आठवण जागी करणारी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे.

पुण्यात दुसरा ‘स्वाइन फ्लू’चा रुग्ण आढळला
पुणे, २५ जून / प्रतिनिधी

अमेरिकेला शिक्षणासाठी गेलेल्या २९ वर्षांच्या तरुणास ‘स्वाइन फ्लू’ झाल्याचे आज राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिलेल्या अहवालामुळे स्पष्ट झाले असून हा राज्यातील चौथा ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत स्वाइन फ्लूच्या ५२ रुग्णांपैकी मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी दोन रुग्ण असल्याचे आढळून आले आहे.

गृहनिर्माण संस्थांसाठी पिंपरीत उद्या मेळावा
पुणे, २५ जून/प्रतिनिधी

गृहनिर्माण संस्थांच्या दैनंदिन कामकाजातील विविध समस्या, संबंधित खात्याशी निगडित प्रश्न व ते सोडविण्यामध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ, स्टेट बँक ऑफ इंडिया, दै. लोकसत्ता आणि सहकार खाते यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथे गृहनिर्माण संस्थांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दीपक मानकर यांच्याविरुद्धच्या गुन्ह्य़ांची संख्या बारा
पुणे, २५ जून / प्रतिनिधी

फरारी नगरसेवक दीपक मानकर यांच्याविरुद्ध बाणेर येथील पाच गुंठे जमीन बळकावल्याचा आणखी एक गुन्हा आज चतु:शृंगी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला. मानकर यांच्याविरुद्ध दाखल झालेला हा बारावा गुन्हा आहे. बाणेरमधील सव्‍‌र्हे क्रमांक ५२/४/१ येथील चार गुंठे जागेवर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून दोन आठवडय़ांपूर्वी (दि.११) मानकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यावर ‘लॅण्ड माफिया’ची प्रकरणे उघडकीस येण्यास सुरुवात झाली.

सेंट फेलिक्स शाळेत निकिता लाड प्रथम
पुणे, २५ जून/खास प्रतिनिधी

सेंट फेलिक्स शाळेत पहिली येण्याचा मान निकिता शशिकांत लाड हिने पटकाविला. ६५० पैकी ६१२ गुण मिळवून (९४.१५ टक्के) तिने हे यश संपादन केले. शाळेमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये तिने भाग घेतला. कॅरमच्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिने प्रतिनिधित्व केले होते. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून मुख्याध्यापिका सिस्टर अर्सुला यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक केले

शिक्षण मंडळातील शाळांचा निकाल ७७ टक्के
पुणे, २५ जून/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षामध्ये पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळातील शाळांचा निकाल ७७ टक्के लागला. महानगरपालिका शिक्षण मंडळातील डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन शुक्रवार पेठ, डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील माध्य. विद्यानिकेतन येरवडा आणि मौलाना महम्मद अली जौहर उर्दू माध्यमिक विद्यानिकेतन रविवार पेठ या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. डॉ. वसंतदादा पाटील माध्य. विद्यानिकेतन प्रशालेत अमोल मोहन धुरी व मंजुषा मुळे या विद्यार्थ्यांनी ९३.२३ टक्के गुण मिळवून महामंडळाच्या शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला. तर दीपाली बिटके हिने ९०.९२ टक्के गुण मिळवून मागासवर्गीयांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे यांनी अभिनंदन केले.

अस्मिता चित्र अ‍ॅकॅडमीतर्फे अभिनय प्रशिक्षण अभ्यासक्रम
पुणे, २५ जून/प्रतिनिधी

अस्मिता चित्र अ‍ॅकॅडमीतर्फे एक वर्षांचा अभिनय प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणे, मुंबई व या वर्षीपासून नाशिकमध्येही या अभ्यासक्रमाचे वर्ग घेतले जाणार आहेत. ठवडय़ातून शनिवार व रविवार या दोन दिवशी हे वर्ग घेतले जातील. या वर्गामध्ये लेखन, दिग्दर्शन, नृत्य, संवाद, रंगभूषा, वेशभूषा, संकलन, कॅमेरा व कला दिग्दर्शन अशा विविध विषयांचे अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवळकर ‘अस्मिता चित्र अ‍ॅकॅडमीमार्फत’ हे गर्व चालवीत असून आजपर्यंत चाळीसहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून कामाला सुरुवातही केली आहे. या वर्षीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अधिक माहितीसाठी ९८९०१८०७४३ किंवा ९८२०६२००४२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

अ‍ॅन्थोनी मोने यांचे निधन
पुणे, २५ जून/प्रतिनिधी

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ ड्रेस डिझाईनर अ‍ॅन्थोनी सॅम्युअल मोने यांचे पुण्यात आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुलगे, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. अ‍ॅन्थोनी यांनी प्रकाश मेहरा यांच्या अनेक चित्रपटांसाठी ड्रेस डिझाईन केले आहे. त्यात अमिताभ बच्चन यांचा मुकद्दर का सिकंदर, नमक हलाल या प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्यावर पुण्यातील हडपसर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भोसरीत आठ ठिकाणी ‘नो हॉकर्स झोन’
पिंपरी, २५ जून / प्रतिनिधी
पथारी व्यावसायिकांकडून होत असलेल्या अतिक्रमणांची दखल घेत िपपरी पालिकेच्या क प्रभाग कार्यालयाने भोसरी परिसरात नो हॉकर्स झोन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टीने प्रभाग कार्यालयाने आठ ठिकाणे निवडली आहेत.दापोडी येथील हॅरीस ब्रिज ते संत तुकारामनगर, नाशिकफाटा येथील हॉटेल अशोक ते मोशी, भोसरी चौक ते दिघी मॅगझीन अशा आठ रस्त्यांवर हॉकर्स झोन करण्यात येणार आहे.

उर्दू माध्यमाचा निकाल शंभर टक्के
पुणे, २५ जून/प्रतिनिधी

पुण्यातील ए.एफ.आय. एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू माध्यमाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शेख फिरदोस मेहबूब या विद्यार्थिनीने ७८ टक्के गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. गेली पाच वर्षे या शाळेचा निकाल शंभर टक्के लागत आहे.

डंपरच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
पिंपरी, २५ जून / प्रतिनिधी
बावधान पौड रोड येथील वनश्री हॉटेलजवळ बुधवारी पहाटे एका डंपरची पाठीमागून धडक बसल्याने मोटारसायकलस्वार तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी डंपरचालकावर गुन्हा दाखल केला आहे. िहजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश कृष्णकुमार कुन्नर (वय ३३, रा. रेश्मा रेसिडेन्सी, लोकमान्यनगर, कोथरुड) असे मृत्युमुखी पडलेल्या मोटारसायकलस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मामा शशांक बिंदूमाधव इनामती (वय ५०, रा. अलकानंद सोसायटी, शिवानंद गार्डन, कोथरुड) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी (एमएच १२-४३१०) या डंपरच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. डंपर चालकाने आपल्या ताब्यातील डंपर भरधाव वेगाने चालवून पौडकडून पुण्याकडे येणाऱ्या गिरीशच्या मोटारसायकलीस पाठीमागून धडक दिली. त्यात गिरीशचा जागीच मृत्यू झाला. डंपर चालक अपघातानंतर पळून गेला. पोलीस हवालदार एस. बी. ठाकूर अधिक तपास करीत आहेत.

ज्येष्ठ कीर्तनकार प्रकाश बापट यांचे निधन
पुणे, २५ जून / प्रतिनिधी
ज्येष्ठ कीर्तनकार प्रकाश शांताराम बापट (वय ६५) यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे एक चिरंजीव व दोन कन्या असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाची धडक बसून ते गंभीर जखमी झाले होते. एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. वीस वर्षांपासून ते गीताधर्म मंडळाचे काम पाहत होते. त्यांना व्यास गौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

श्रीकांत देव यांचे निधन
पुणे, २५ जून / प्रतिनिधी
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या पुणे केंद्राचे कार्यवाह श्रीकांत देव (वय २९) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. शहरातील विविध सामाजिक संघटनांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. एनएसयूआय पुणे शहर चिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.