Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

क्रीडा

भारत-विंडीजमध्ये आज सलामी
किंग्स्टन, २५ जून/ पीटीआय

ट्वेन्टी-२० विश्वचषकात झालेला दारूण पराभव भारतीय संघाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. ‘सुपर एट’ मधील वेस्ट इंडिजने केलेला पराभवही ‘टीम इंडिया’ विसरलेली नाही. वेस्ट इंडिजविरूद्धच्या ‘कॅरिबियन वॉर’ला उद्यापासून सुरूवात होत असून चार एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ‘त्या’ पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ आतूर असेल. तर ट्वेन्टी-२० विश्वचषकाची उपान्त्य फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडिजला मायदेशात भारताला नमविण्याची संधी असेल.

भारताविरूद्ध विजय हवाच -गेल
किंग्स्टन : ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला पराभूत केले असले तरी मायदेशात त्यांच्याविरूद्ध होणाऱ्या सामन्यात आम्हाला विजय हवाच आहे. विश्वचषकातील उपान्त्य फेरीत झालेल्या चुकांवर योग्य तोडगा काढण्यात आम्हाला सरावादरम्यान यश आलेले आहे, असे मत वेस्ट इंडिजचा कर्णधार ख्रिस गेल याने सरावानंतर व्यक्त केले आहे. विश्वचषकात संघाने केलेल्या कामगिरीबद्दल मी आनंदी आहे. भारतीय संघ यावेळी पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत असला तरी आम्हीदेखील मालिका जिंकण्याच्याच ईर्षेनेच मैदानात उतरू, असे गेलने यावेळी सांगितले.
हरभजनकडून धोका -सरवान
किंग्स्टन : हरभजन सिंग हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज असून त्याच्याकडूनच वेस्ट इंडिजच्या संघाला सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीचा सामना करताना आम्ही सावधगिरी बाळगू, असे मत वेस्ट इंडिजचा अनुभवी फलंदाज रामनरेश सरवान याने व्यक्त केले आहे. भारतीय संघातील हरभजन हा एक गुणी खेळाडू असून त्याच्याकडे दांडगा अनुभवसुद्धा आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर आम्ही सकारात्मक खेळ करण्याची प्रयत्न करणार आहेत. एकेरी-दुहेरी धावा काढून हरभजनवर दडपण वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, असे सरवानने यावेळी सांगितले.
‘टीम इंडिया’ पुनरागमन करेल -गांगुली
कोलकाता : दुसऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीची ‘यंग ब्रिगेड’ अपयशी ठरलेली असली तरी त्याचा परिणाम आगामी स्पर्धेमध्ये होणार नाही. वेस्ट इंडिजविरूद्धच्या चार एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ‘टीम इंडिया’ दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केला आहे. विश्वचषकाचा अपवाद वगळता या वर्षभरातील भारताची कामगिरी वाईट झालेली नाही. काही खेळाडू या मालिकेला मुकणार असले तरी या संघात मालिका जिंकण्याची धमक आहे, असे गांगुलीने यावेळी सांगितले.

विंडीजच्या कामगिरीबाबत होल्डिंग साशंक!
किंग्स्टन : ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती ख्रिस गेल याच्या संघाला उद्यापासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत करता येईल की नाही या बद्दल शंकाच आहे, असे मत वेस्ट इंडिजचे निवृत्त वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी व्यक्त केले आहे.

व्हीनस, कुझ्नोत्सोवा तिसऱ्या फेरीत
महिला दुहेरीत सानियाची आगेकूच
विम्बल्डन, २५ जून/पीटीआय
फ्रेंच खुली विजेती स्वेतलाना कुझ्नोत्सोवा, माजी विजेती व्हीनस विल्यम्स यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत आज महिलांच्या गटात तिसरी फेरी गाठली. महिला दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झा हिने शानदार प्रारंभ केला.
पाचव्या मानांकित कुझ्नोत्सोवाने फ्रान्सच्या पॉलिन पॅरेंमेटीयर हिच्यावर ६-१, ६-३ असा सफाईदार विजय नोंदविला. रशियाच्या या खेळाडूने दुसऱ्या फेरीच्या या लढतीतील पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. दुसऱ्या सेटमध्येही तिने पॉलिनची सव्‍‌र्हिस तोडण्यात यश मिळविले. तिने फोरहँड परतीच्या फटक्यांचा बहारदार खेळ केला, तसेच नेटजवळून प्लेसिंगचा कल्पकतेने उपयोग केला.

आय. सी. सी.च्या हॉल ऑफ फेममध्ये कॉलिन काऊड्री
मुंबई, २५ जून / क्री. प्र.

इंग्लंडचे माजी कसोटीपटू कॉलिन काऊड्री यांचा आय. सी. सी.च्या हॉल ऑफ फेम यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत समावेश होणारे ते १९ वे क्रिकेटपटू आहेत. २१ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत (१९५४ ते १९७५) कॉलिन काऊड्री यांनी ११४ कसोटीत ७,६२४ धावा २२ शतके व ३८ अर्धशतकांच्या सहाय्याने काढल्या होत्या. कसोटी क्रिकेट खेळण्याचे शतक पूर्ण करणारे ते पहिले कसोटीपटू होते. २७ कसोटीत त्यांनी इंग्लंड संघाचे नेतृत्व केले होते. एम. सी. सी. व आय. सी. सी.चे चेअरमनपदही त्यांनी भूषविले होते. भारतात बंगलोर येथे जन्मलेल्या कॉलिन काऊड्री यांची क्रिकेट कारकीर्द मात्र इंग्लंडमध्येच फुलली.

१६ व्या एशियाडसाठी चायना सदर्न एअरलाइन्स अधिकृत वाहक
मुंबई, २५ जून / क्री. प्र.

चीनचे फुलांचे शहर, अशी ओळख असणाऱ्या गाँगझू येथे १२ ते २७ नोव्हेंबर २०१० या कालावधीत १६ व्या ‘एशियाड’ क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची अधिकृत विमान वाहतूक कंपनी म्हणून आज चायना सदर्न एअरलाइन्सची निवड करण्यात आली. ४२ क्रीडा प्रकारात ४५ देशांचे स्पर्धक या स्पर्धेत खेळताना पाहावयास मिळतील. ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनानंतर चीनला एशियाड स्पर्धेच्या निमित्ताने आपले वर्चस्व दाखविण्याची पुन्हा संधी मिळणार आहे.

ऑक्टोबरपासून रेफरल सिस्टीम लागू करण्याचा आयसीसीचा निर्णय
लंडन, २५ जून / वृत्तसंस्था
पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याची पद्धत (अंपायर रेफरल सिस्टीम) येत्या ऑक्टोबरपासून कसोटी सामन्यांमध्ये लागू करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आय.सी.सी.) घेतला आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

सायनाची घोडदौड उपान्त्यपूर्व फेरीत मजल
मलेशियन ओपन ग्रां.प्रि. बॅडमिंटन
जोहोर बाहरू, २५ जून / पीटीआय
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपली स्वप्नवत विजयी घोडदौड कायम राखताना मलेशियन ओपन ग्रां.प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेच्या उपान्त्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. गुरुवारी सायनाने तीन गेममध्ये रंगलेल्या रोमहर्षक लढतीत थायलंडच्या इन्टानोन रॅचानोकला धूळ चारली.

चेतन चौहाण यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये उद्या क्रीडा भारतीचा परिसंवाद
नाशिक, २५ जून / प्रतिनिधी
माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू चेतन चौहाण यांच्या अध्यक्षतेखाली येथे २७ जून रोजी अखिल भारतीय क्रीडा भारतीची परिसंवाद सभा होणार आहे. नाशिक क्रीडा भारतीच्या वतीने ही सभा होणार आहे.

रविवारी अखिल भारतीय कबड्डी पंच परीक्षा
मुंबई, २५ जून/ क्री. प्र.

अखिल भारतीय हौशी कबड्डी संघटनेच्यावतीने रविवार दि. २८ जून रोजी अखिल भारतीय पंच परीक्षेचे आयोजन महाराष्ट्रातील तीन केंद्रांमध्ये करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रामध्ये रोहा, कोल्हापूर आणि परभणी या तीन केंद्रावर सकाळी दहा वाजता लेखी परिक्षेला सुरूवात होणार आहे. त्यानंतर तोंडी परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी रायगड केंद्र-: मेहंदळे हायस्कूल, रोहा, जिल्हा राडगड या पत्यावर अथवा शरद कदम यांच्याशी (९४२२०९५७२०) संपर्क साधावा. कोल्हापूर केंद्राजवळच्या विद्यार्थ्यांनी शाहू कॉलेज, सदर बाजार, कदमवाडी रोड, कोल्हापूर या पत्यावर अथवा प्रा. संभाजी पाटील (९४२२०४९००६), तर परभणी केंद्रा जवळच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती विद्यालय, पाथ्ररी रोड, परभणी या पत्यावर अथवा मंगल पांडे (९४२३४४२९९९) यांच्याशी संपर्क साधावा.

काव्या भांडेकरला विक्रमासह सुवर्णपदक
राष्ट्रीय जलतरण
जयपूर २५ जून/पीटीआय

महाराष्ट्राच्या काव्या भांडेकर हिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेतील मुलींच्या १४ वर्षांखालील गटात ५० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत विक्रम नोंदवीत सुवर्णपदकाचा वेध घेतला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आज चार सुवर्णपदकांची कमाई करीत आपले वर्चस्व राखले.भांडेकर हिने ५० मीटर बॅकस्ट्रोक शर्यत ३२.३८ सेंकंदात पार करीत स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला. याच शर्यतीत महाराष्ट्राच्याच अनन्या पाणिग्रही हिने ब्रॉंझपदक पटकाविले. तिने हे अंतर ३४.४६ सेकंदात पार केले.