Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

ठाणेकरांवर सरस्वती प्रसन्न
ठाणे/प्रतिनिधी

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मुंबई विभागात बाजी मारण्याची परंपरा ठाणेकरांनी यंदाही कायम राखली आहे. एक- दोन नव्हे, तब्बल तीन मुलींनी मुंबई विभाग आणि जिल्ह्यातही पहिले तीन क्रमांक पटकावल्याने शैक्षणिक वर्तुळात आनंदाच्या सरीवर सरी कोसळल्या. बोर्डाचा निकाल ११ वाजता जाहीर होणार असल्याने आणि गुणवत्ता यादीत चमकणाऱ्या मुलांना पूर्वकल्पना देण्याची पद्धत यावर्षीपासून मोडीत निघाल्याने सगळ्यांच्या नजरा नेटकडे लागल्या होत्या.

‘यशस्वी भव’मुळे
मिळाले यश‘लोकसत्ता’च्या ‘यशस्वी भव’ या उपक्रमाचा अभ्यासात चांगला फायदा झाला. सकाळी पेपर वाचताना यशस्वी भवमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सूचना वाचायला मिळायच्या, त्याला अभ्यासात फायदाच झाला. त्यामुळे आपल्या यशाचा ‘लोकसत्ता’ही भागीदार असल्याचे धनश्री गणपत नाईक हिने सांगितले.नौपाडय़ातील सरस्वती सेकंडरी शाळेतून ९४.७६ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्या धनश्रीने आपल्या यशाचे श्रेय आईवडील आणि शाळेतील शिक्षकांच्या मेहनतीला दिले.

ठाणे परिवहन ऑक्सिजनवर
ठाणे/ प्रतिनिधी

एकीकडे जुनाट झालेल्या कधीही बंद पडणाऱ्या बसेस..कर्मचाऱ्यांची लाखो रुपयांची देणी अद्याप द्यायची आहेत..दिवसाला होत असलेला तीन लाखांचा तोटा..अशा चक्रव्यूहात अडकलेल्या ठाणे परिवहन सेवेला बाहेर काढण्यासाठी खंबीर अभिमन्यूची गरज आहे. ठाणे परिवहनच्या कारभाराची आर्थिक स्थिती पाहता कोणीही जबाबदार अधिकारी ठाणे परिवहनला वाचवण्यासाठी पुढे येत नाही ही वस्तुस्थिती आहे.

कल्याण-नगर-विशाखापट्टणम रेल्वेमार्गासाठी भाजपतर्फे रेल्वे परिषदेचे कल्याणमध्ये आयोजन
कल्याण/प्रतिनिधी

कल्याण-नगर-बीड-विशाखापट्टणम या प्रस्तावित रेल्वेमार्गाचा विषय मार्गी लावण्यासाठी कल्याणमध्ये कल्याण जिल्हा भाजपतर्फे शनिवार, २७ जून रोजी रेल्वे परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपचे ठाणे विभाग अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

धनश्री आणि प्रियांका मागासवर्गीयांमध्ये तिसऱ्या
बदलापूर/वार्ताहर : अंबरनाथ येथील भाऊसाहेब परांजपे विद्यालयाची धनश्री ज्ञानेश्वर गोसावी आणि बदलापूर येथील आदर्श विद्यालयाची प्रियांका प्रमोद दिवेकर या विद्यार्थिनींनी ६१८ (९५.०७ टक्के) गुण मिळवून गुणवत्तायादीत मागासवर्गीयांमध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे.

काराव येथील देशमुख बंधूंची बाग पर्यटनस्थळ म्हणून घोषित
बदलापूर/वार्ताहर : सुमारे ५० एकर जमिनीमध्ये विविध प्रकारच्या फळ आणि फुलझाडांची लागवड करणाऱ्या काराव येथील चंद्रकांत आणि रमेश देशमुख या शेतकरी बंधूंच्या बागेस महाराष्ट्र स्टेट अ‍ॅग्री अ‍ॅण्ड रुरल टुरिझम को- ऑप. फेडरेशन लि. अर्थात मार्ट यांनी पर्यटन केंद्राचा दर्जा दिला आहे. धकाधकीच्या जीवनात काही क्षण पर्यटनाचा आनंद लुटता यावा, यासाठी विक-एण्डला निसर्गरम्य ठिकाण अथवा फार्म हाऊसच्या शोधात असणाऱ्या हौशी पर्यटकांना पर्यटनाच्या आनंदाबरोबरच शेतीविषयक माहिती उपलब्ध करून देण्याची सोय बदलापूरजवळील काराव या ठिकाणच्या शेतकरी बंधूंनी उपलब्ध करून दिली आहे.

२७ हजार ५०५ विद्यार्थ्यांसमोर अकरावी प्रवेशाचा प्रश्न
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शालान्त परीक्षेत १ लाख १२ हजार ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळा आणि महाविद्यालयांमधील विविध शाखांमध्ये अकरावीच्या अवघ्या ८४ हजार ५०० जागा आहेत. त्यामुळे २७ हजार ५०५ विद्यार्थ्यांंसमोर प्रवेशाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

मयत सविता काळेंच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये देण्याचे ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार मंचाचे आदेश
भगवान मंडलिक

कल्याण/प्रतिनिधी - गॅस सिलिंडरच्या स्फोटात मरण पावलेल्या कल्याणमधील रहिवासी सविता सुनील काळे यांच्या कुटुंबियांना हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. नवी मुंबई, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, इंद्रजित एजन्सीचे मालक शांतीलाल जैन व न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स कंपनी या चारही प्रतिवादींनी संयुक्तरीत्या किंवा वैयक्तिक विमा पॉलिसी तक्त्याच्या सेक्शन आठ (आय)(ई) प्रमाणे शारीरिक, मानसिक व न्यायिक खर्चापोटी दहा लाख रुपये द्यावेत, असा आदेश ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य पी. एन. शिरसाठ यांनी नुकताच दिला आहे.

बालकामगारांची सुटका करून ११ मालकांना अटक
कल्याण/वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत बालकामगारांचे आर्थिक शोषण मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने या विरोधात कामगार विबागाने जोरदार मोहीम उघडली असून शहरातील स्वीट मार्ट हॉटेल आणि गॅरेजमध्ये काम करणाऱ्या बालकामगारांची सुटका करून कल्याण-डोंबिवलीमधील ११ मालकांना अटक करण्यात आली आहे.

कवाड लघु नळपाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भिवंडी/वार्ताहर

तालुक्यातील कवाडवासीयांना भेडसावणारी पाणी समस्या दूर करण्यासाठी समाज कल्याण खात्यातर्फे मंजूर करण्यात आलेल्या तीन लाख ७८ हजार खर्चाच्या लघु नळपाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ पंचायत समिती सभापती अशोक शेरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. कवाड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दलित वस्ती साठी राबविण्यात येणाऱ्या नळपाणीपुरवठा योजनेस समाज कल्याण खात्याकडून तीन लाख ७८ हजार ६६९ रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली. या नळपाणीपुरवठा योजनेमुळे कवाडवासीयांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. आज या योजनेचा पंचायत समिती सभापती शेरेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी मधुकर सवादकर, ग्रामसेवक व सदस्य उपस्थित होते.

आदर्श शाळेचा ९८ टक्के निकाल
बदलापूर/वार्ताहर : येथील आदर्श हायस्कूलचा शालान्त परीक्षेचा निकाल ९८.२१ टक्के लागला. उल्केष चौधरी (९५.६९ टक्के) प्रथम, तेजस नेहते (९५.०७), तेजल शिरसाट (९५.०७), कोमल चौधरी (९५.०७)द्वितीय, तर प्रगती जोशीने (९४.७६) तृतीय क्रमांक पटकावला.
ग्रामीण भागात असलेल्या शिवभक्त या शाळेचा निकाल ८८.०१ टक्के लागला, अशी माहिती वामन म्हात्रे यांनी दिली. मांजर्ली येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयाचा निकाल ९१.०६ टक्के लागला. शाळेतून जयेश पाटील (९३.३) आणि पूनम चासकर (९१.५९ ) यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयाचा निकाल ८१.४२ टक्के लागला. राजश्री यणपुरे ही विद्यार्थिनी ९२.४६ टक्के गुण मिळवून शाळेतून पहिली आली, तसेच काजल कडव हिनेही ९२.४६ टक्के गुण प्रश्नप्त केले.