Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

बालकामगार निर्मूलन कायद्याविषयी जनजागृती आवश्यक - न्या. ढवळे
नंदुरबार / वार्ताहर
देशातील बालकामगारांसारखा बिकट प्रश्न सोडविण्यासाठी बालकामगार निर्मूलन कायद्याविषयक

 

जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश (वरिष्ठस्तर) ए. एम. ढवळे यांनी बालकामगार प्रतिबंधक सप्ताहानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघटना यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षपदावरून न्या. ढवळे बोलत होते. प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा न्या. ए. सी. चाफळे, दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी ए. के. काळे, न्या. पी. ए. साने, न्या. व्ही. जी. चव्हाण, वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश रघुवंशी, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी एम. पी. तांबोळी, धुळ्याचे कामगार अधिकारी बी. टी. रामोळे, वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. किशोर चौधरी आदी उपस्थित होते.
गरिबीमुळे देशात बालकामगारांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे बालकांचे शोषण होते. परिणामी बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास खुंटतो याचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बालकामगार, निर्मूलनाचा कायदा निर्माण झाला आहे, असेही ढवळे यांनी सांगितले. बालकामगारांपासून मुक्त होणाऱ्या बालकांना विविध माध्यमाने मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय योजनांची प्रभावी अमलबजावणी होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. तांबोळी यांनी महिला बालविकासाच्या योजनांची माहिती दिली. कामगार अधिकारी राजोळे यांनी बालकामगारांची सुटका करून त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्ह्य़ात २५ शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले. अ‍ॅड. किशोर चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्तविकात प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्या. ए. सी. चाफळे यांनी बालकामगार प्रतिबंधक सप्ताह साजरा करण्याचा हेतू स्पष्ट केला. सूत्रसंचालन अ‍ॅड. तुषार कापडिया यांनी केले.