Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

(सविस्तर वृत्त)

धुळे बाजार समितीत शेतकऱ्यास हमालांची मारहाण
धुळे / वार्ताहर
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेंगा विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला हमालांकडून बेदम

 

मारहाण करण्यात आल्यानंतर तक्रार करूनही बाजार समितीने हमालांवर कारवाई न करता उलट लोणखेडी गावाहून आलेल्या शेतकऱ्याचा माल मोजून घेण्यासाठी टाळाटाळ करण्याचा प्रकार घडला. बाजार समितीच्या बोटचेपे धोरणाच्या शेतकऱ्यांनी निषेध केला असून शेतकऱ्यांना मारहाण होण्याची घटना म्हणजे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे.
लोणखेडी येथील शेतकरी निंबा श्रीकांत पाटील हे १८ जून रोजी धुळे बाजार समितीत शेंगा विकण्यासाठी आले होते. अरूण चितोडकर या आडतदाराच्या माध्यमातून त्यांनी माल विक्रीस ठेवला. मालाचा लिलाव झाल्यानंतर अंधार पडेपर्यंत हमालांनी माल मोजण्यास टाळाटाळ केली. पाटील यांनी हमालांना विनंती केली असता त्यांनी अरेरावीचे उत्तर दिले. ‘तु अरूण कोंडु कडे का माल लावला?’ असे त्यांनी दरडावले. पाटील यांनी ‘तुमच्या भानगडीत आम्हाला का ओढता ?’ असे सांगण्याचा प्रयत्न करताच चार हमालांपैकी योगेंद्र सुगमचंद यांच्या टोळीतील हमालांनी पाटील यांना बेदम मारहाण केली. याबाबत त्यांनी सभापतींकडे तक्रार करूनही त्यांनी हमालावर कारवाई केली नाही.
या घटनेची प्रतिक्रिया म्हणून लोणखेडीचे भय्या वसंत पाटील व इतर तीन शेतकऱ्यांनी अरूण कोंडु यांच्याकडे माल लावला असता ते लोणखेडीचे रहिवासी असल्याने तो माल मोजून घेण्यात आला नाही. त्यांना रात्रभर आपला माल सांभाळत बसावे लागले. अशा प्रकारे आकसपूर्ण भावनेने व राजकीय हेतूने प्रेरित होऊन बाजार समिती काम करीत असेल तर धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांनी माल विक्रीस का आणावा, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी पत्रकान्वये केला आहे. या बाबत संबंधीत शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून मारहाण करणाऱ्या हमालावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. निवेदनावर निंबा पाटील, भय्या पाटील, किशोर पाटील, राजेंद्र पाटील, शांताराम पाटील, योगेश पाटील, जितेंद्र नेरकर आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.