Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

व्यक्तिवेध

हापूस आंब्याचे नाव आता परदेशापर्यंत पोहोचले आहे. मात्र १९३२ च्या सुमारास मुंबईत घरोघर फिरून हापूस आंबा म्हणजे काय हे सांगत तो विकण्यास सुरुवात करणाऱ्या रघुनाथराव देसाई यांनी आंबाविक्रीचे रोपटे लावले. त्या रोपटय़ाचा महावृक्ष केला तो वसंतराव देसाई यांनी. आता देसाई बंधू आंबेवाले हे नाव सातासमुद्रापलीकडे पोहोचले आहेच आणि नुकतीच कोलकाता येथील देशपातळीवरील प्रदर्शनात तब्बल बारा बक्षिसे मिळवून त्यावर राजमान्यतेची मोहोर पुन्हा एकदा उमटली आहे. रत्नागिरीच्या हापूस आंब्याला नावारूपाला आणण्यात खस्ता खाल्ल्या आहेत त्या रघुनाथराव देसाई यांनी. मुंबईत १९३२ ते १९३५ या वर्षांत त्यांनी आंबाविक्री केली. त्यानंतर ते

 

कराचीला गेले. तेथे १९३८ पर्यंत आंबाविक्री केल्यावर पुन्हा मायदेशी परतले. पुण्यात १९३८ ते ४५ या काळात आंबे विकल्यानंतर त्यांनी ‘देसाई यांची आंब्याची वखार’ उघडली. रत्नागिरीजवळ बागेत आंब्याची कलमे लावायची आणि त्या झाडांचे आंबे विकण्यासाठी पुण्यात आणायचे, असा क्रम चालू झाला. दरवर्षी किमान पाचशे तरी नवी कलमे लावली पाहिजेत, असा त्यांचा नियम होता. आता सातशे एकर जागेमध्ये तब्बल बारा हजार झाडे आहेत. फळांचा दर्जाही उच्च आहे. झाडांसाठी शेणखतासारख्या नैसर्गिक खतांचाच वापर करायचा हा रघुनाथरावांचा कटाक्ष होता. आंब्याचा गर केशरीच असला पाहिजे, त्याची कोय छोटीच हवी, आंब्याचा सुगंध तो धरणाऱ्या हातालाही यायला पाहिजे, असे ते सांगत. झाडांना त्यांनी अगदी लहान मुलांप्रमाणेच वाढवले. रघुनाथराव १९९८ मध्ये स्वर्गवासी झाले; हयातीच्या अगदी शेवटच्या दिवशीही त्यांनी आंबा विकला होता. त्यांच्या हयातीतच त्यांचे चिरंजीव वसंतराव देसाई यांनी पुण्यातील व्यापार पाहाण्यास सुरुवात केली होती. पुण्यातील व्यापार वसंतरावांनी पाहायचा आणि कोकणात आंबा लागवड रघुनाथराव, तसेच त्यांचे दुसरे चिरंजीव जयंत व विजय यांनी पाहायची, अशी कामे वाटली होती. वसंतराव देसाई यांनी व्यापार वाढविला. देसाईंच्या बागेतील हापूसचा आंबा घरोघर जाऊ लागला. रसासाठी पायरी आंबाही त्यांनी वाढविला. त्यातूनच देशपातळीवरील प्रदर्शनांमध्ये बक्षिसे मिळू लागली. कोलकात्यामध्ये नुकत्याच भरलेल्या प्रदर्शनात महाराष्ट्राप्रमाणेच हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांतून सुमारे एक हजार प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील विविध गटांमध्ये बारा बक्षिसे देसाई यांच्या बागेतील आंब्यांनी, तसेच विविध उत्पादनांनी मिळविली. हापूस आंब्याला पहिले बक्षीस तर मिळालेच; पण केशर, अमृतपायरी, रत्ना, तोतापुरी आंब्यांना दुसरे आणि उत्पादनांमध्ये अमर मँगो पल्प, आंबा वडी, आंबा ज्यूसला पहिले, तर आंबा लोणच्याला दुसरे बक्षीस मिळाले. वर्षभरात कधीही आंबा खावासा वाटला तर मॅँगो स्लाइस हा खाद्यप्रकार गेल्या दोन वर्षांपासून उत्पादित करण्यात येत आहे. त्यानेही बक्षीस पटकावले. रघुनाथरावांनी १९६० मध्येही प्रदर्शनांमध्ये बक्षिसे मिळविल्याची आठवण वसंतराव देसाई काढतात. महाराष्ट्रीय माणसाला आंबा प्रिय असला तरी आता नोकरीधंद्याच्या निमित्ताने लाखो मराठी माणसे राज्यापासून दूर गेली आहेत. त्यांना, तसेच इतर कोणालाही रत्नागिरीचा अस्सल हापूस घरपोच देण्याची योजना वसंतराव देसाई यांनी सुरू केली. एक हजार रुपयांत दोन डझन आंबे बंगलोर, हैदराबादसारख्या राज्यांमध्ये जातो. दिल्लीमध्ये तर साडेसातशे ते आठशे रुपयांमध्ये दोन डझन आंबे देणे परवडू शकते. देशातील सेलिब्रिटींमध्येही देसाई यांचा आंबा प्रसिद्ध आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांनी त्या काळी या आंब्याची स्तुती करणारी पत्रे दिली होती. पंडित भीमसेन जोशी यांनी तर ‘सुमधुर व गोड फळे मला द्या, म्हणजे माझा आवाजही तसाच राहील,’ असे उद्गार देसाई यांच्याशी बोलताना काढले होते. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सोनिया गांधी, अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे अशा अनेकांना देसाई यांच्या बागेतील आंब्याने वर्षांनुवर्षे तृप्त केले आहे. देसाई यांची पुढची पिढीही आपल्या या पिढीजात व्यवसायात चांगले योगदान देते आहे. वसंतरावांचे चिरंजीव मंदार, योगेश, नरेंद्र, तसेच त्यांचे चुलतबंधू आनंद आणि अमर देसाई यांनीही व्यवसाय वाढविला आहे. अमेरिकेला आंबा निर्यात करण्याच्या योजनेची चर्चा खूप झाली, पण तांत्रिक चाचण्यांमुळे ते शक्य झाले नाही. मात्र जपानमध्ये आंबा निर्यातीस सुरुवात झाली आहे.