Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

दहावीतही ‘गर्ल्स शायनिंग’ बुलढाण्याची श्रुती सुरुशे विदर्भात पहिली
अश्विनी मराठे नागपूर विभागात पहिली

नागपूर/अमरावती, २५ जून / प्रतिनिधी

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत बुलढाण्याच्या भारत विद्यालयाची श्रुती अशोक सुरुशे ही विद्यार्थिनी ६३५ (९७.६९ टक्के) गुण मिळवून विदर्भात व अमरावती विभागात पहिली आणि राज्यातून दुसरी आली आहे. नागपूर विभागातून सर्वप्रथम येण्याचा मान सोमलवार हायस्कूल रामदासपेठची विद्यार्थिनी अश्विनी संजय मराठे हिला मिळाला आहे. अमरावती विभागाचा निकाल ८५.४४ टक्के, तर नागपूर विभागाचा निकाल ८०.६९ टक्के लागला आहे. निकालाच्या टक्केवारीत अमरावती विभाग राज्यातील आठ शिक्षण मंडळांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर, तर नागपूर विभाग शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मतदारसंघाचा सर्वागीण विकास
बाळ गजभिये

ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अतुल देशकर सुसंस्कृत, समंजस आणि सर्वसमावेशक असे व्यक्तिमत्त्व. सौजन्यशील वागण्याने विरोधकांनादेखील आपलेसे करण्याची हातोटी त्यांना साधली आहे. संघटन कौशल्याने पक्षाची पाळेमुळे गावखेडय़ापर्यंत रुजवून मतदारसंघाचा विकास हेच ध्येय ठेवले आहे. मतदारसंघ धानाचे कोठार असल्याने आमदार देशकरांनी सिंचनाला प्रश्नधान्य दिले. धानाला मुबलक पाणी मिळावे म्हणून त्यांनी ११ कोल्हापुरी बंधारे व २६ सिमेंट बंधाऱ्याच्या माध्यमातून सिंचन सोयी उपलब्ध करून दिल्या. ‘मामा’ तलावाची दुरुस्ती केली. मुडझा, कसरला, मरेगाव, बल्लारपूर व खानाबाद येथील मोठय़ा तलावांची दुरुस्ती केली. नाली-बांधकामांची दुरुस्ती करून कालव्यांची वेगळी रचना करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी जाईल यासाठी प्रयत्न केले. आसोलामेंढा व घोडाझरी या तलावांच्या दुरुस्तीवर विशेष भर दिला. सिंचनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

गोंदिया जिल्ह्य़ातील सिंचन प्रकल्प कोरडे
गोंदिया, २५ जून / वार्ताहर

‘तलावांचा जिल्हा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्य़ातील धरणे, मोठे व मध्यम प्रकल्प, मालगुजारी तलाव कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्य़ात गेल्यावर्षी झालेले पावसाचे अत्यल्प प्रमाण, अद्यापपर्यंत सूर्य ओकत असलेल्या उन्हाच्या प्रचंड तीव्रतेमुळे झालेले पाण्याचे बाष्पीभवन व पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी गेल्या चाळीस वर्षात प्रथमच ही परिस्थिती ओढ़ळली आहे.

श्रुतीला व्हायचेय काíडओ सर्जन
बुलढाणा, २५ जून / प्रतिनिधी

राज्यातून दुसरी व विदर्भातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवणाऱ्या श्रृती सुरुशेची काíडओ सर्जन होण्याची इच्छा असून लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेणार असल्याचे श्रुतीने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे टपरीधारकांवर गदा
बुलढाणा, २५ जून / प्रतिनिधी

बुलढाणा जिल्हा न्यायालयाच्या शताब्दी महोत्सवाकरिता राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या दौऱ्यामुळे न्यायालय परिसरातील ९१ लघु व्यावसायिकांवर गदा आली आहे. या ९१ टपरीधारकांची दुकाने जिल्हा प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने नोटीस देऊन उठवल्याचे आदेश काढले आहे. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम झाल्याने असंतोष व्यक्त होत आहे.बुलढाणा जिल्हा न्यायालयास २००८ सालीच १०० वर्षे पूर्ण झाली.

वनअधिकारी-कर्मचाऱ्यांना हत्यारांचे प्रशिक्षण
बुलढाणा, २५ जून / प्रतिनिधी

वनसंपत्तीचे संरक्षण करताना जीविताला धोका होऊ नये म्हणून वनअधिकारी, कर्मचाऱ्यांना हत्याराचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय व्याघ्र कक्षच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक हिंमतराव देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी उपवनसंरक्षक ओ.एम. चंद्रमोरे, विभागीय अधिकारी दक्षता जी.आर. शेंद्रे, विजय गोडबोले, जे.एस. लटपटे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते आदी सदस्य या बैठकीस उपस्थित होते.

पंढरपूर यात्रेसाठी अकोल्यातून १६० बसेस
अकोला, २५ जून/प्रतिनिधी

पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाने १६० बसेस सोडल्या आहेत. ७ जुलैपर्यंत पंढरपूर यात्रेचा कालावधी असून यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. त्यामध्ये अकोला आगार क्र मांक एकच्या नऊ बस, आगार दोनच्या ४२ बस, आकोट ७, कारंजा ११, मंगरुळपीर १२, वाशीम ४८, रिसोड २५ तेल्हारा ६ याप्रमाणे बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. यात्रेकरिता जाणारे ५० भाविक एकाच गावातील असतील तर त्यासाठी विशेष यात्रा बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पंढरपूर येथे महामंडळाच्या अकोला विभागाचे स्थानक उभारण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन
दारव्हा, २५ जून / वार्ताहर

नगराध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल हरिभाऊ गुल्हाने यांचे ज्येष्ठ नागरिक मंडळाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शहर सौंदर्यीकरण स्वच्छता, रहदारी नियंत्रण, नवीन नगर वसाहतीसंबंधी त्यांना निवेदन सदार करण्यात आले. शहर विकासाबद्दल शुभेच्छा दिल्या. दारव्हा नगरात बगिच्याची सुविधा उपलब्ध व्हावी, गोळीबार चौकात रहदारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना आखणी आदी मागण्या ज्येष्ठ नागरिक मंडळाच्यावतीने निवेदनातून करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी अ‍ॅड. गरुड, बापूराव तायडे, प्रकाश मुथा, ना.म. जवळकर, प्रश्न. ठाकूर उपस्थित होते.

विद्युत दाब वाढल्याने शेकडो उपकरणे जळाली
बुलढाणा, २५ जून / प्रतिनिधी
अचानक विद्युत दाब वाढल्याने देऊळगावराजाच्या बालाजी फरस भागातील शेकडो दूरचित्रवाणी संचासह विजेवर चालणारी उपकरणे जळाली. एका घराला अचानक आग लागून हजारोंचे नुकसान झाले. शहरातील बालाजी फारस भागामध्ये एका ठिकाणी नवीन बांधकाम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू असलेल्या वायरवर लाकूड पडले. वायरचे घर्षण होऊन ‘शॉर्ट सर्कीट’ झाले. त्यामुळे विजेचा दाब वाढून या भागात सुरू असलेले दूरचित्रवाणी संच तसेच पंखे जळाले. संगणक, इस्त्री, टेबल फॅन आदी विजेवर चालणाऱ्या वस्तू जळाल्या. बालाजी मंदिरामागे असलेल्या बबन चांदूरकर यांच्या घरातील टी.व्ही. जळाल्याने घर पेटले.

संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या पोलीस तपासाबद्दल असंतोष
भंडारा, २५ जून / वार्ताहर

येथील संदीप अशोक मेश्राम या युवकाच्या मृत्यू प्रकरणात भंडारा पोलिसांच्या तपासाबाबत आंबेडकरी समाजात असंतोष असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे कार्याध्यक्ष जयप्रकाश भावसार व विदर्भ अध्यक्ष म.दा. भोवते यांनी केली कळवले आहे.

अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची दुसरी तुकडी रवाना
गोंदिया, २४ जून / वार्ताहर

अमरनाथ येथील हिमशिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गोंदियातील भाविकांची दुसरी तुकडी ‘राजधानी एक्सप्रेस’ने अमरनाथला रवाना झाली. या यात्रेकरूंचा बाबा अमरनाथ सेवा समितीच्या वतीने सत्कार करून निरोप देण्यात आला. या प्रसंगी डॉ. हरिनारायण चौरसिया, नगरसेवक व्यंकट पाथरू, शशी तिवारी, संजय टाह, आनंद रघुवंशी, माधव आंबेडारे, चंद्रेश माधवानी, सुब्बाराव, महेश उरकुडे, शैलेश गौर, पन्नालाल मचाडे, रामकुमार आतकर, कमल चौरागडे, दिलीप चौरागडे, किशोर हालानी, कैलाश मराठे, दिनेश मिश्रा, रतन गोपलानी, घनश्याम सोलंकी, सुशील वर्मा, उपस्थित होते. या यात्रेकरूंमध्ये सुसेनजीत शाह, विनायक खैरे, विकेश सोनछात्रा, अजय अग्रवाल, भरत क्षत्रीय आदींचा समावेश आहे.

‘एनटीआर’चा मयूर महाजन अव्वल
वरूड, २५ जून / वार्ताहर

वरूडच्या नामदेव तुकाराम रडके विद्यालयाने निकालात बाजी मारली. या विद्यालयाचा मयूर महाजन ९४ टक्के गुणासह तालुक्यात अव्वल स्थानी राहिला. तालुक्याचा निकाल समाधानकारक लागला आहे. एन.टी.आर. विद्यालयाचा निकाल ९८.४० टक्के लागला. सागर वसुले याला ९२.७६, पूजा पंचभाई, ९२.७५, अनुजा बेलसरे ९२.५४, केतकी ओहळे हिला ९१.५३ टक्के गुण मिळाले. जरूडच्या उत्क्रांती शिक्षण संस्थेचा निकाल ८०.८९ टक्के लागला. येथील जागृत विद्यालयाचा निकाल ८२.८२ टक्के लागला. प्रश्नजक्ता मोहनराव बेलसरे हिला ९२.४१ टक्के, अंकिता लीलाधर घाटोळे ९२.३० टक्के गुण मिळाले. प्रसन्न अशोक गडवे ९१.३८, तेजस आनंदराव ढगे ९१ टक्के तर मयूरी प्रभाकर बहुरूपी हिला ९०.४१ टक्के गुण मिळाले. न्यू इंग्लिश हायस्कूलचा निकाल केवळ ५०.२५ टक्के लागला.

वर्धा जिल्ह्य़ात अरुंधती शिंदे अव्वल
वर्धा, २५ जून / प्रतिनिधी

येथील अग्रगामी विद्यालयाची विद्यार्थिनी अरुंधती मनोज शिंदे ही शालांत परीक्षेत ९६ टक्के गुण घेऊन जिल्ह्य़ात प्रथम आली आहे. १०० टक्के निकाल देणाऱ्या ‘अग्रगामी’ शाळेचे नाव अरुंधतीमुळे परत झळकले आहे. केवळ जिल्ह्य़ातच नव्हे नागपूर मंडळात प्रथम येण्याची खात्री अरुंधतीला होती परंतु, हे यशसुद्धा सुखवह आहे, अशी प्रतिक्रिया तिने दिली. यापुढील शिक्षण ‘सीबीएससी’ पद्धतीने ती नागपुरात घेणार असून तंत्रशिक्षणात पदवी शिक्षण घेण्याचा मानस तिने व्यक्त केला. आई-वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे ती म्हणाली. तिचे वडील मनोज शिंदे हे ‘हाऊसफिन’चे जिल्हा अधिकारी असून आई गृहिणी आहे. ६५० पैकी ६२१ गुण मिळवणाऱ्या अरुंधतीने गणितात १०० पैकी १०० गुण पटकावले.

सामाजिक न्याय दिवस आज
बुलढाणा, २५ जून/ प्रतिनिधी

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती २६ जूनला सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत विशेष समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन विशेष समाज कल्याण अधिकारी छाया गाडेकर यांनी केले आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मागासवर्गीय मुलामुलींसाठी वसतिगृह योजना, यासारख्या अनेक योजना विशेष जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे