Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २६ जून २००९

विविध

कोणाही संशयिताला भारताकडे सोपविणार नाही
२६/११ हल्ला : भारत वा इंटरपोलकडून अधिकृत विनंतिपत्र मिळाले नसल्याचा पाकचा पवित्रा
इस्लामाबाद, २५ जून/पी.टी.आय.

मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील बावीस संशयित आरोपींना भारताच्या हवाली करण्याबाबत भारत वा इंटरपोलकडून कोणतेही औपचारिक विनंतिपत्र आले नसल्याचे पाकिस्तानने आज म्हटले आहे. आमच्या देशातील आरोपींवर या देशातच खटला चालविण्यात येईल असेही पाकने म्हटले आहे.
२६/११ हल्लाप्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयाने जमात-उद-दवाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद व लष्कर-ए-तोयबाचा झकिउर रहमान लखवी यांच्यासह २२ पाकिस्तानी संशयितांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी पाकिस्तानने ही प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रवक्ते अब्दुल बसित यांनी सांगितले, की २२ संशयितांना सोपविण्याच्या संदर्भात पाकिस्तानला भारत वा इंटरपोलकडून अद्याप कोणतीही अधिकृत विनंती करण्यात आलेली नाही. मात्र, भारताच्या कायदेशीर प्रक्रियेबाबत आपण कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. आम्ही आमची कार्यपद्धती अवलंबू, असेही ते म्हणाले. मुंबई हल्ल्याच्या वेळी हाती लागलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब आणि इतर नऊजणांना वरील २२ जणांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण दिल्याचा आरोप मुंबईच्या विशेष न्यायालयात सरकार पक्षातर्फे करण्यात आला. त्यानंतर न्यायाधीश एम. एल. ताहिलियानी यांनी या २२ जणांविरुद्ध गेल्या मंगळवारी वॉरंट जारी केले होते. या वॉरंटच्या प्रती इंटरपोलकडे पाठविण्यात येतील व इंटरपोल ते संबंधित देशांना पाठवेल, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटले होते.
आरोपींना भारताकडे सोपविणार नाही- पाक
दरम्यान, पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री रहमान मलिक यांना या वॉरंटविषयी प्रतिक्रिया विचारली असता केवळ अशा वॉरंटच्या आधारावर पाकिस्तान कोणाही व्यक्तीला भारताच्या स्वाधीन करणार नाही, असे त्यांनी सांगितले. परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मलिक आमद खान यांनीदेखील कोणाही पाकिस्तानी नागरिकाला भारताकडे सोपविण्याची शक्यता फेटाळली आहे. ते म्हणाले, की भारताने आणखी पुरावे सादर केले तर मुंबई हल्ल्यातील आरोपींना आम्ही शिक्षा करू, मात्र आमच्या देशात खटला चालवूनच.

बगदादमध्ये स्फोटात ६९ ठार; १५० जखमी
बगदाद, २५ जून/पी.टी.आय.

बगदादमधील सर्वात गजबजलेल्या बाजार परिसरात काल झालेल्या बॉम्बस्फोटात ६९ ठार, तर १५० जण जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. साद्र शहरातील मरिडी बाजारात हा भीषण स्फोट झाला. बाजारात उभ्या असणाऱ्या एका मोटार सायकलमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता, असे ‘डीपीए’ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हा स्फोट इतका मोठा होता, की बाजारातील काही दुकाने आणि वाहनतळावर उभी असलेली वाहने जळून खाक झाली. इराकी पोलिसांनी या परिसराला वेढा घातला असून बचाव पथक वेगाने कार्यरत झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. इराकचे अध्यक्ष जलाल तालाबानी यांनी या स्फोटाचा तीव्र शब्दात निषेध केला असून गेल्या आठवडय़ातही झालेल्या स्फोटात ६५ नागरिक ठार झाले होते.

माओवाद्यांचा ओरिसात हैदोस..
भुवनेश्वर, २५ जून/पी.टी.आय.

ओरिसाला भेट देण्यासाठी येणारे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांच्या आगमनाआधी काही तास आधी येथील माओवाद्यांनी कोरापत जिल्ह्यातील काकिरीगुमा रेल्वे स्थानकाला आग लावली तसेच तेथील बीएसएनएलचा संपर्क टॉवरही उद्ध्वस्त केला. नारायणपटना येथील पंचायत समितीचे कार्यालयही माओवाद्यांनी लुटले असून ओरिसा राज्यातील माओवाद्यांचा हैदोस हा केंद्राने प. बंगालमध्ये चालू केलेल्या कारवाईच्या तसेच भाकप माओवादी संघटनेवर घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ आहे हे आता उघड होत आहे. नारायणपटना येथील पंचायत समितीच्या कार्यालयातील दोन संगणकांची माओवाद्यांनी मोडतोड केली असून तेथे ठेवण्यात आलेल्या ४२ सायकलीही पळवून नेल्या आहेत.

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सहा जणांना चीनमध्ये फाशी
बीजिंग, २५ जून/पी.टी.आय.

म्यानमार येथून हशीश खरेदी केल्यानंतर त्यांची चीनमध्ये तस्करी करणाऱ्या सहा जणांना चीनने गुरुवारी सकाळी फासावर चढविले. संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पाश्र्वभूमीवर चीनने ही कारवाई करून तस्करांना जणू कडक इशाराच दिला आहे. तस्करीच्या चार प्रकरणांमध्ये हे सहा तस्कर गुन्हेगार सिध्द झाले.