Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

अग्रलेख

मायकेल : मॅजिकल थ्रिलर

 

मायकेल जॅक्सन नावाचे एक भन्नाट आणि बेभान, चित्तथरारक आणि अचाट तुफान गुरुवारी पूर्णपणे शांत झाले. तसे पाहिले तर ते तुफान सुमारे १५ वर्षांपूर्वीच निपचित होऊ लागले होते; पण ज्यांच्या मनात आणि तनात १९८० ते १९९५ या काळात ते तुफान घोंघावले, ते त्याच तुफानी लाटेच्या स्मरणरंजनावर अजूनही तरंगत होते. पुन्हा तशी बेभान लाट येणे वा निर्माण करणे अशक्य आहे, असे वाटत असतानाच, जॅक्सनच्या चाहत्यांनी लंडनमध्ये त्याचे झपाटलेले ‘साँग-डान्स कॉन्सर्टस्’ आयोजित केले होते. त्या सर्वाची तिकिटे केव्हाच संपली होती. मायकेल जॅक्सनचे दुसरे पर्व सुरू होणार असे मानणाऱ्यांची ती श्रद्धा, ‘रिसरेक्शन’ची ज्यांना खात्री आहे, तितकीच तीव्र होती. मायकेल जॅक्सनमध्ये अशी काय ‘मॅजिक’ होती, असे काय गूढ होते, की ज्यामुळे प्रभुदेवा, मिथुन चक्रवर्तीपासून राज ठाकरेंपर्यंत आणि युरोपपासून जपानपर्यंत, जवळजवळ जगभरचे तत्कालीन तरुण-तरुणी त्याच्या संमोहनाच्या प्रभावाखाली आले होते? मायकेल जॅक्सनची विलक्षण ऊर्जा? त्याचा झपाटा? त्याच्या ‘साँग-डान्स’मधील इलेक्ट्रिकल चार्ज? त्याचा आवाज? गाण्याच्या ओळी? मायकेल नावाची मॅजिक जगभर पसरली ती त्याच्या १९८३च्या ‘थ्रिलर’ या थरारक अल्बमनंतर. त्याच्या लाखो चाहत्यांना त्याच्या गाण्यांमधले शब्द व त्यांचे संदर्भ समजतही नसत. परंतु असेही कित्येक कोटी तरुण होते, की जे त्याची गाणी, नृत्य, हावभाव आणि वैचित्र्यपूर्ण भासणारे पदन्यास या सर्वाचे सहीसही अनुकरण करायचा प्रयत्न करीत असत. मायकेल जॅक्सन अजिबात न आवडणाऱ्यांचाही एक मोठा वर्ग होता. पण साधारणपणे तो वर्ग तेव्हा पन्नाशीच्या आसपास वा पलीकडे गेला होता. तरुण वर्गातही थोडेफार ‘अ‍ॅण्टी-जॅक्सन’ होते, पण चाहत्यांचा दबदबा (आणि दहशत!) इतकी प्रचंड होती, की त्या ‘विरोधकांचा’ आवाज त्या अफलातून आणि कान भेदून जाणाऱ्या तडाखेबंद ड्रम्सच्या ध्वनी-प्रतिध्वनींमध्ये पूर्णपणे बुडून जात असे. मायकेल जॅक्सनच्या आकस्मिक आणि अकाली मृत्यूची बातमी लॉस एंजेलिस येथील मेडिकल सेंटरमधून प्रसृत होताच, अक्षरश: काही क्षणात ट्विटर, फेसबुक, ऑर्कुट, मोबाइल फोन्स, एसएमएस आणि ई-मेल व ब्लॉग्सद्वारे जगभर पसरली आणि त्या बातमीबरोबर सर्वत्र शोकाकुल वातावरणही. ज्यांना ‘जॅक्सन फिनॉमिनन’ने कधीच संमोहित केलेले नव्हते, त्यांना त्याची ‘मॅजिक’ही उमजली नव्हती आणि आता सुरू झालेले ‘ग्लोबल मोर्निग’ ही उमजलेले नाही. मायकेल जॅक्सन ही अगदी चपखल असे ‘अमेरिकन फिनॉमिनन’ होते. त्याच्या अगोदर असेच तुफान एल्विस प्रिस्ले या नावाने अमेरिकेत आणि मग जगभर पसरले होते; पण प्रिस्लेच्या काळात टेलिव्हिजन आणि खासगी वाहिन्या आजच्यासारख्या जगभर फोफावल्या नव्हत्या. कम्प्युटर आणि इंटरनेट क्रांतीच्या दोन दशके अगोदर एल्विसचे पर्व होते. त्या दोघांच्या ‘ब्रॅण्ड’चा बाज जरी वेगळा असला तरी एक पर्व संपले आणि काही वर्षांतच दुसरे पर्व सुरू झाले असे म्हणण्यासारखी स्थिती होती. विशेष म्हणजे आज जगभर अमेरिका ओळखली जाते ती केवळ त्यांच्या व्हिएतनाम-अफगाणिस्तान-इराक येथील हिंस्र कारवायांमुळे नव्हे; तर हॉलिवूड-एल्विस- मायकेल जॅक्सन अशा ‘मॅजिक मेकर्स’मुळे अमेरिकेत निर्माण होणारी अशी तुफाने झपाटय़ाने ‘लेजंड्स्’ होतात. हा हा म्हणता ती ‘लेजंड्स्’ जगभरच्या लोकांच्या मनाचा कब्जा घेतात. त्यांचे वर्णन योग्य-अयोग्य, चूक-बरोबर, नैतिक-अनैतिक अशा निकषांवर करणे म्हणजे तो हंगामा, ते ‘फिनॉमिनन’, ते अनोखे चैतन्य न समजून घेण्यासारखे आहे. अमेरिकेतील अशी ‘फिनॉमिना’ झपाटय़ाने कॉर्पोरेट रूप धारण करतात. हा हा म्हणता ती ‘ग्लोबल कॉर्पोरेट्स्’ बनतात. एकदा अशी ‘लेजंड्स्’ जागतिक कॉर्पोरेट झाली, की त्यात अब्जावधी डॉलर्स गुंतवले जातात, कोटय़वधी लोक त्यांचे ग्राहक होतात, त्या संशोधनातून एक सामूहिक झिंग तयार होते; मग ती झिंग मार्केट केली जाते, सीडी-डिव्हीडीज्, कॅसेट्स्, टी. व्ही. चॅनल्सच्या माध्यमातून ती झिंग घराघरात पोहोचते- लहान मुले आणि तरुण-तरुणी त्यात इतके दंग होतात, की त्यांच्या पालकांना हे कळेनासे होते, की ‘या पिढीला कशाने झपाटले आहे?’ भुताने झपाटल्यावरही माणूस (म्हणजे तरुण-तरुणी) जसे वागणार नाही तसे वर्तन पाहून काही पालक भयभीत होतात. तेही स्वाभाविकच म्हणावे लागेल. मायकेल जॅक्सनच्या (आणि इतरही ‘डान्स-साँग शोज्’च्या) वेळेस ज्या प्रकारच्या आर्त किंकाळ्या, अश्रूपात, छाती बडवून घेत त्याबरोबरच होणारा अक्षरश: लाखो चाहत्यांचा भन्नाट नाच हे सर्व वरकरणी वेताळाने झपाटल्यासारखेच वाटते/ दिसते. ‘कॉर्पोरेट मार्केटिंग’कडे पाहून अमेरिकेतील अशा ‘फिनॉमिनन’चे विश्लेषण करणे योग्य होणार नाही. मायकेल जॅक्सन नावाचा चैतन्याचा झंझावात समजून घ्यायचा असेल तर अमेरिकेकडे पारंपरिक दृष्टिकोनातून पाहून चालणार नाही. अमेरिकेतील कोणतीच गोष्ट तथाकथित नैतिक-पारंपरिक-सांस्कृतिक चौकटीत बसविता येणार नाही. मग ते डिस्नेलॅण्ड असो वा नासा, हॉलीवूड असो वा त्यांचे अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड्स, मॅक्डोनाल्ड असो वा स्टारबक्स कॉफी, पिझा हट असो वा डोनट चेन्स, मायक्रोसॉफ्ट असो वा त्यापूर्वी आयबीएम, कोकाकोला-पेप्सी, मोटारी व हायवेज्, नॅशनल जिऑग्राफिक वा डिस्कव्हरी, टाइम वा न्यूयॉर्क टाइम्स- या व अशा अनेक ‘लेजंड्स’ अमेरिकेने तयार करून जगभर ‘मार्केट’ केल्या आहेत. कट्टर अ‍ॅण्टी अमेरिकनांना हे लक्षातही येत नाही, की अशा ‘लेजंड्स्’ वा असे ‘फिनॉमिना’ इतर देश जागतिक स्तरावर त्या प्रमाणात का ‘मार्केट’ करू शकत नाहीत. अजूनही इंग्लंडला शेक्सपिअर, ऑक्स्फर्ड- केंब्रिज आणि स्कॉच व्हिस्कीच्या प्रतिकांवर व प्रतिमांवरच आपल्या देशातला ‘ब्रॅण्ड’ जगासमोर ठेवता येतो. जर्मनीला तर त्यांची तेजस्वी सांस्कृतिक व वैचारिक परंपरा बाजूला ठेवून हिटलर आणि स्वस्तिकच ‘सिम्बॉल’ प्राप्त करून देते. बहुसंख्य जर्मन लोकांच्या मनात हिटलरबद्दल कमालीचा तिरस्कार असूनही ते भूत त्यांच्या मानगुटीवरून जात नाही. फ्रान्सला त्यांची वाइन, चीज, भाषा आणि नेपोलियन व त्यापूर्वीची फ्रेंच क्रांती यापलीकडे सिम्बॉल्स मिळत नाहीत. आपण आपल्या संस्कृतीचे गोडवे तारस्वरात गातो; पण रामायण-महाभारत-गंगा- साधू- वेदान्त या पलीकडे आपण सांस्कृतिकदृष्टय़ा जगावर ठसा उमटवू शकत नाही. चीनलाही एका बाजूला माओ आणि दुसऱ्या बाजूला मार्केटिंग यापलीकडे फारशी प्रतिके रुजविता आली नाहीत. हाँगकाँग-तैवानला तर ब्रुस ली आणि जॅकी चॅन हीच प्रतिके उरली आहेत असे वाटेल. रशियाने जवळजवळ ७४ वर्षांच्या ‘सोव्हिएत कम्युनिझम’च्या काळात जगावर ठसा उमटविणारी किती प्रतिके निर्माण केली? जी त्यांची प्रतिके टिकून राहिली तीसुद्धा अमेरिकेने ‘मार्केटिंग’ करून पसरविली. अतिशय विषारी आणि हिंस्र असा कम्युनिस्टविरोध करतानाच खुद्द अमेरिकेत जेवढे कम्युनिस्ट साहित्य उपलब्ध झाले तेवढे रशियातही झाले नाही! लेनिनपासून चे गव्हेरापर्यंत आणि माओ, हो चि मिन्हपासून कॅस्ट्रोपर्यंत, अगदी सद्दाम व बिन लादेन यांचेही ‘निगेटिव्ह आयकॉन्स’ जागतिक स्तरावर पसरवताना त्या ‘मार्केटिंग’चा लाभ त्यांच्या अनुयायांनाच झाला. हा विचित्र विरोधाभास खराच; परंतु जोपर्यंत आपल्याला अमेरिकन समाजाची, अमेरिकन भांडवलशाहीची, अमेरिकन इतिहासाची, अमेरिकन ‘कॅटॅक्टर’ची ओळख होत नाही तोपर्यंत आपल्याला मायकेल जॅक्सनच काय ओबामाही समजणार नाही. मायकेल जॅक्सन ‘ब्लॅक’ होता. एल्विस प्रिस्ले ‘व्हाइट’ असूनही तो ‘ब्लॅक’ असल्याचा त्याच्याबद्दलचा गैरसमज दीर्घ काळ प्रचलित होता. मायकेल जॅक्सनवर ‘विकृत’ असल्याचे आरोप होते; तो ‘इस्लामी’ झाला म्हणून त्याच्यावर टीका होती; त्याने ‘स्किन सर्जरी’ केली म्हणूनही त्याच्यावर मीडियाकडून आघात होत; तो गर्दच्या आहारी गेल्याचेही बोलले जात असे. आता त्याच्या मरणानंतरही तो ‘पेनकिलर’ घेऊन मरण पावला, की हृदयविकाराच्या झटक्याने यावर वादंग सुरू झाला आहे. एक मात्र आता वास्तव आहे ते हे, की १९८० ते १९९० या काळात चिरंतन वाटणारा मायकेल जॅक्सन आता त्या चिरंतन तत्त्वात विलीन झाला आहे!