Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

टर्मिनेटर साल्व्हेशन; तीच ती इलेक्ट्रॉनिक आतषबाजी
माणसाने आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या सोयीसाठी (आणि आपल्या ‘अहं’ला तुष्ट करण्यासाठी) मशीन बनवले. ते तो अधिकाधिक शक्तिशाली बनवत गेला. आणि मग शक्तिशाली मशीननेच माणसाला गुलाम कधी केले किंवा ते मशीनच माणसाच्या जिवावर कधी उठले ते माणसाला कळलेच नाही. ही वस्तुस्थिती. आणि मग सुरू झालं ते माणसाचं युद्ध- ‘माणसा’चं अस्तित्व टिकवण्यासाठी. आपल्या जिवावर उठलेल्या मशीनशी युद्ध. या वस्तुस्थितीच्या केंद्रीय कल्पनेभोवती तऱ्हेतऱ्हेच्या तांत्रिक करामती आणि कल्पनांनी सजवून हॉलीवूडने चित्रपटांचं अ‍ॅक्शनपटांचं एक दालन समृद्ध केलं आहे. टर्मिनेटर, ट्रान्सफॉर्मर, आयर्नमॅन.. अशा असंख्य चित्रपटांची निर्मिती एकापाठोपाठ एक अशी होते आहे. त्यांच्या मालिकांमागून मालिका येतात.

द हँग ओव्हर; अस्ताव्यस्त
लग्नाच्या आधीची बॅचरल पार्टी साजरी करायला चार मित्र निघतात. लास वेगासला जातात. चौघांपैकी डग बिलिंग्जचं लग्न होऊ घातलंय. त्याच्यासाठी तिघा मित्रांनी हा बॅचलर पार्टीचा घाट घातलाय. त्यापैकी स्टय़ू हा डेंटिस्ट गेली तीन र्वष आपल्या मैत्रिणीला लग्नाची मागणी घालण्याचा विचार करतोय. फिल हा शाळाशिक्षक, दोन मुलांचा बाप वैवाहिक जीवनातल्या त्याच त्याचपणाला उबगलाय आणि डगचा होऊ घातलेला मेहुणा- ट्रेसीचा भाऊ अ‍ॅलन तर विक्षिप्तच आहे. चौघं हॉटेलच्या गच्चीवर दारूची पार्टी करतात आणि सकाळी हॉटेल स्यूटमध्ये जाग येते तेव्हा सगळं अस्ताव्यस्त असतं. स्टय़ूचा एक दात पडलेला असतो, अ‍ॅलन बाथरूममध्ये जातो, तर तिथे एक वाघोबा बसलेले, स्यूटभर एक कोंबडं फिरतंय, कपाटात एक लहान बाळ रडतंय आणि नवरा मुलगा डग तर गायबच आहे! डगचा शोध घेताना आणि रात्री नेमकं काय काय झालं, ते आठवण्याचे प्रयत्न करताना एकेक धमाल प्रसंग उलगडत जातात.

ऑस्करच्या स्पर्धेत भारत आता तरी येणार ?
दरवर्षी ऑस्करच्या मानांकनांच्या यादीत भारतीय चित्रपट नसल्याची खंत करण्याचे दिवस आता संपण्याची चिन्हे आहेत. अगदी भारताबाहेरून आलेल्या दिग्दर्शकांनी भारतात बनवलेले सिनेमे किंवा परदेशस्थ भारतीय दिग्दर्शकांनी त्या त्या देशांतून पाठविलेले भारतीय चित्रपट या यादीत पाहून आनंद मानण्याचे दिवसही आता गेले आहेत. कारण ऑस्कर देणाऱ्या ‘अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स’ने मानांकनांची संख्या पाचावरून १० वर नेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून प्रत्येक गटाची मानांकने दुपटीने वाढलेली असतील. म्हणजे भारताकडून कुठल्याही राजकारणाशिवाय चुकून एखादा चांगला बनलेला चित्रपट पाठविला गेलाच, तर नक्की भारतीय चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेत झळकू शकेल.

एका ब्लॉगच्या विक्रीची गोष्ट
हॉलीवूडमधील बातम्या जगभरातल्या वृत्तपत्रांना यातील कलाकारांची लफडी आणि त्यांच्या चटकदार गोष्टींसाठी उपयुक्त वाटतात. त्यामुळे अमेरिका वगळून इतर देशांप्रमाणे आपल्याकडेही हॉलीवूडचे स्वरूप लफडेबाज आणि चकचकीत छायाचित्रांइतकेच मर्यादित राहिलेले आहे. त्यापलीकडेही ही एक प्रचंड मोठी चित्रसृष्टी आहे. जिची आर्थिक आणि कलात्मक उलाढाल ही असाधारण आहे. या उलाढालींच्या खऱ्या-खुऱ्या बातम्यांसाठी ब्लॉगची मदत घ्यायला गेल्यास सर्वाधिक वाचला जाणारा आणि नवख्या नेट वाचकालाही सहज सापडणारा ब्लॉग म्हणून ‘निक्की फिन्केज डेडलाईन हॉलीवूड डेली’ या ब्लॉगची ओळख आहे. हॉलीवूडच्या बातम्या वार्ताकन करणाऱ्या निकी फिन्के यांनी सुरुवातीला आपल्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी या ब्लॉगची निर्मिती केली.