Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

लोकमानस

‘सुमनसुगंध’मध्ये चुकीचे उल्लेख
अलीकडेच सुमनताई कल्याणपूर यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘सुमन सुगंध’ हे सौ. मंगला खाडिलकर यांनी लिहिलेलं पुस्तक वाचनात आलं. यात माझ्या कवितेच्या बाबतीत काही संदर्भ चुकीचे आहेत व त्या बाबतीत लेखिकेने माझ्याशी चर्चा केलेली नाही, याचा खेद वाटतो.
पान १०५ वरती सुमनताईंनी, मला ‘झिमझिम’ हा शब्द अभिप्रेत होता, असे म्हटल्याचे लिहिले आहे. मात्र ते चूक आहे.
‘रिमझिम झरती श्रावणधारा
धरतीच्या कलशात
प्रियाविण उदास वाटे रात।।’

 


हे गीत मी १९५७ साली लिहिले, त्या वेळी नुकताच विवाह झाल्याने मी नाशिकला होतो व तेथील सुप्रसिद्ध संगीतकार कै. बाळ भाटे यांनी माझ्याकडून एक भावगीत लिहून मागितले कारण त्यांच्या घरी श्री. गजानन वाटवे येणार होते व त्यांना काही नवीन भावगीते ऐकवावी, असे भाटे यांच्या मनात होते. मी त्यांना तासाभराने येण्यास सांगतिले व तेवढय़ा वेळात मी ‘रिमझिम झरती..’ ही विरहिणी लिहिली व त्यांना दिली.
नंतर मी मुंबईस निघून आल्याने संबंधित कार्यक्रमाचे काय झाले हे मला समजले नाही. पण त्याच काळात (१९५९-६०) दशरथ पुजारी यांच्या वाचनात माझे ते गीत आले. त्यांना मुखडा फारच आवडला व त्यांनी ते गीत मागून घेतले. ‘झिमझिम’ हा शब्द मी कुठेही लिहिलेला नाही.
तसेच १७८ पानावर ‘प्रीतीचा पारिजात फुलला.. सुगंध त्याचा तुझ्या नि माझ्या हृदयी दरवळला’ हे ‘सप्तपदी’ चित्रपटातील माझे गीत श्री. कालेलकर यांच्या नावावर छापले आहे.
‘सुमन सुगंध’ या पुस्तकाच्या संदर्भात सौ. मंगला खाडिलकर यांनी माझ्याशी समक्ष चर्चा केलेली नाही, टेलिफोनपेक्षा समक्ष चर्चा केली असती तर अनेक गोष्टींचा उलगडा झाला असता कारण दशरथ पुजारींच्या संगीतांतर्गत सुमन कल्याणपूर यांनी माझी जास्तीत जास्त गाणी गायली आहेत व रसिकांना ती आवडली आहेत. पुस्तकात माझी गाणी छापली असूनही पुस्तकाच्या प्रकाशनकार्यक्रमाचे मला आमंत्रण नव्हते. गैरसमज होऊ नये व कवींच्या रचनांचे मूळ शब्द कृपया कोणीही बदलू नयेत म्हणून हा पत्रप्रपचं. कलावंताच्या अनिष्ट कृतीने कलेच्या वास्तूला तडा जाऊ नये एवढीच इच्छा.
मधुकर जोशी