Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

सातारा जि.प.चा शाहू जयंतीचा ‘उरक’ सोहळा
सातारा, २६ जून / प्रतिनिधी

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणाऱ्या व महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या येथील जिल्हा परिषदेत शासनाच्या परिपत्रकाच्या आदेशापुरता राजर्षी शाहू महाराज यांच्या १३० व्या जयंतीचा कार्यक्रम अक्षरश उरकण्यात आला.
निरुत्साही वातावरणात पुष्पहार अर्पण करण्यासाठी पाऊणतास उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील यांची प्रतीक्षा करावी लागली.

राजर्षीच्या नावाचा मिळालेला पुरस्कार भाग्याचा- प्रश्न. भोसले
कोल्हापूर, २६ जून / प्रतिनिधी

राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने आज मला मिळालेला पुरस्कार हे मी माझे भाग्य समजतो. कोल्हापूरकरांची दानत मोठी म्हणून त्यांनी मला हा पुरस्कार दिला आहे. शाहू महाराजांचे केवळ स्मरण करून चालणार नाही तर त्यांच्या विचाराचे आणि कृतीचे अनुकरण व्हायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रश्नचार्य शिवाजीराव भोसले यांनी आज सायंकाळी येथे बोलताना केले. येथील शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने त्यांना आज विधानसभेचे सभापती बाबासाहेब कुपेकर यांच्या हस्ते शाहू जयंतीदिनी शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.

शाहू जन्मस्थळ विकासाचा निधी लवकरच उपलब्ध- पाटील
कोल्हापूर, २६ जून / विशेष प्रतिनिधी

राजर्षी शाहू जन्मस्थळ विकासाकरिता आवश्यक असलेला निधी लवकरच उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे दिली. राजर्षी शाहूमहाराजांच्या १३५व्या जयंतीनिमित्त कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या शाहू जन्मस्थळी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत अभिवादन सोहळा झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

घुसडलेल्या ठरावांच्या तपासणीसाठी सोमवारी उपलेखापाल सांगलीत
सांगली, २६ जून / गणेश जोशी
सांगली महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत घुसडलेल्या ७८७ ऐनवेळच्या ठरावांची तपासणी करण्यासाठी सोमवार दि. २९ जून रोजी राज्याचे उपलेखापाल येत असल्याचे वृत्त समजताच महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी ते तपास करणार असल्याने आजी-माजी नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे.

दोन खूनप्रकरणातील फरारी झालेल्या वाळव्यातील दोघांना अटक
सांगली, २६ जून / प्रतिनिधी
चार खून करून १४ वर्षे फरारी असलेल्या सदाशिव महादेव सूर्यवंशी (वय ४१, रा. काळमवाडी) व दोन खून करून कारागृहातून पळून जाऊन चार वर्षे फरारी असलेला अभय जनार्दन सुतार (वय ४२, रा. साखराळे) या वाळवा तालुक्यातील दोन कुविख्यात गुन्हेगारांना सांगली पोलिसांनी वळवडे (जि. कोल्हापूर) येथे सापळा रचून अटक केली. हे दोघेही गुंड गुंग्या भोसले याच्या टोळीतील आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत व्यक्त केली.

रेल्वे इंजिनला धडकून एक ठार
मानवत, २६ जून/वार्ताहर
सांगली अर्बन बँकेतील कर्मचारी जयंत मनोहर मन्नुर (वय ४५, रा. सांगली) यांचा मानवत रस्त्याच्या क्रॉसिंगजवळ रेल्वे इंजिनला धडकल्याने मृत्यू झाला. काल सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. श्री. मन्नुर मूळचे सांगलीचे रहिवासी आहेत. मानवत शाखेत बार्शीहून बदली होती. सेलूकडून मानवत रस्त्याला येणाऱ्या रेल्वे इंजिनखाली श्री. मन्नुर रेल्वे फाटकाजव-ळील क्रॉसिंगजवळ धडकले असल्याचे रेल्वे पोलीस उत्तम आवचार, महादेव पवार आणि संतोष घुगे यांनी सांगितले.

मोफत शिक्षण मागणीसाठी सांगलीत जदचा मोर्चा
सांगली, २६ जून / प्रतिनिधी
देशातील प्रत्येक व्यक्तीला मोफत शिक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी जनता दल, हिंद मजूर सभा व समाजवादी अध्यापक संघ यांच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रश्न. शरद पाटील यांनी केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांना निवेदन देण्यात आले. त्यात खासगीकरण प्रचंड प्रमाणात वाढल्याने गरिबांना शिक्षण घेणे अवघड झाले असून, देशातील प्रत्येकाला मोफत शिक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली.

केंद्रेकरांची संभाव्य बदली रोखण्यासाठी हजारेंना साकडे
सोलापूर, २६ जून/प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील केंद्रेकर यांची बदली करण्याच्या हालचाली सुरू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर सोलापूर जिल्हा स्वयंरोजगार संस्था महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रेय खडतरे यांनी ही संभाव्य बदली रोखण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना साकडे घातले आहे. केंद्रेकर हे जिल्हा परिषदेत रुजू झाल्यापासून त्यांनी प्रशासनात शिस्त लावली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी त्यांनी केलेले कृतिशील प्रयत्न कौतुकास्पद आहेत. जिल्हा परिषदेला त्यांची आणखी एका वर्षाची गरज असताना आता अचानकपणे त्यांची बदली होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही बदली होऊ नये म्हणून खडतरे यांनी अण्णा हजारे यांना भेटून साकडे घातले. या शिष्टमंडळात भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष वसंत आपटे यांचा समावेश होता.

ऊर्मिला जाधव मृत्यूच्या चौकशीची कुटुंबीयांची मागणी
माळशिरस, २६ जून/वार्ताहर
ऊर्मिला जाधव हिचा मृत्यू संशयास्पद असून त्याची उच्चस्तरीय चौकशी होऊन सर्व संबंधितावर ताडीने कारवाई करावी अन्यथा सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा ऊर्मिला जाधवचे बंधू मारुती कळसुले यांनी दिला आहे.ऊर्मिला हिचे सन २००५ साली वाकी बाळासाहेब जाधव यांच्याशी लग्न झाले होते. मात्र लग्नापासूनच ऊर्मिलाचा माहेरून पैसे आणण्यासाठी छळ होत होता. १८ जून रोजी ऊर्मिला बेपत्ता झाली. त्यानंतर दुसरे दिवशी सकाळी तिचा मृतदेह विहिरीत सापडला. त्याबाबत मारुती कळसुले यांनी सांगोला पोलीस ठाण्यात ऊर्मिलाचे पती, सासू, सासरे, दीर व जाऊ आदींविरूद्ध लेखी तक्रार देऊनही पोलिसांनी सर्वाविरूद्ध कारवाई केली नाही.त्यामुळे या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अन्यथा उपोषणाची इशारा कळसुले यांनी दिला आहे.

अहल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आज आटपाडीत कार्यक्रम
आटपाडी, २६ जून/वार्ताहर

भारतीय धनगर सेनेच्या वतीने शनिवार दि. २७ जून रोजी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती धनगर सेनेचे सरचिटणीस श्रावण वाक्षे यांनी दिली. धनगर समाजबांधव, सर्व नेते व समविचारी पक्षांना एकत्र आणून राजकारणविरहित हेतूने समाजउन्नतीसाठी हा मेळावा घेण्यात येत आहे. शनिवारी दुपारी बारा वाजता आटपाडी बसस्थानकापासून मिरवणूक काढण्यात येणार असून, दुपारी दोन वाजता बचतधाम येथे प्रतिमापूजन व मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास भारतीय धनगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष मारुतीराव केसकर, रासपचे महादेव जानकर, आमदार प्रकाश शेंडगे, रमेश शेंडगे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आनंदराव देवकाते, गणपतराव देशमुख, सोलापूरच्या महापौर श्रीमती अरुणा वाकसे, बापू बिरू वाटेगावकर व हणमंतराव तामखडे आदी उपस्थित राहाणार आहेत.

सांगलीमध्ये तीन लाखांचे चंदन जप्त
सांगली, २६ जून / प्रतिनिधी

विशेष पोलिस पथकाने शिपूर येथे छापा टाकून कर्नाटकातून मिरजेत येणारे चंदन जप्त केले. या प्रकरणी श्रीमंत शिवाजी नाईक (वय ३५, रा. शिपूर, ता. मिरज) व व्यापारी संजय आत्माराम पाटोळे (वय ३३, रा. मायणी) यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरज तालुक्यातील शिपूर येथे राहणारा श्रीमंत नाईक हा कर्नाटकातून चंदन आणून ते मिरज येथे विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शिपूर येथे छापा टाकून श्रीमंत नाईक व व्यापारी संजय पाटोळे यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ४० किलो चंदन, एक सॅन्ट्रो कार (एमएच १०- ई ८३५९) व अन्य मुद्देमाल असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.