Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

सवलती, उद्घाटने व आंदोलनांचा सपाटा!
विधानसभा निवडणुकीची तयारी साऱ्याच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने विविध समाज घटकांना सवलती देताना उद्घाटनांचा सपाटा लावला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे अर्थातच काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रिलायन्स कंपनीच्या दरवाढीचा मुंबई उपनगरवासीयांच्या जिव्हाळ्यचा प्रश्न शिवसेनेने लावून धरला आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुंबईकडे जास्त लक्ष केंद्रित केले आहे. मनसेनेही वीज दराच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वांद्रे-वरळी सागरी मार्गाचे मंगळवारी सोनियांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, २६ जून / खास प्रतिनिधी

विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या वांद्रे-वरळी सागरी मार्गाचे उद्घाटन पुढील मंगळवारी ३० जून रोजी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मतांसाठी या सागरी मार्गाचा उपयोग करून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. वांद्रे-वरळी सागरी मार्ग सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. या पुलाचे नियोजन करण्यात आले तेव्हा सागरी मार्गाचा खर्च ४०० कोटी रुपये होता. प्रत्यक्षात या पुलाकरिता १६०० कोटी रुपये खर्च झाला आहे. सागरी मार्गाचा ठेकेदार राजकीय उच्चपदस्थांचा जवळचा असल्याने त्याला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप झाला होता.

काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद पेटणार!
शशिकांत कोठेकर

ठाणे व मुंब्य्राची खाडी यांच्यामध्ये वसलेल्या कळवा-मुंब्रा या नवीन विधानसभा मतदारसंघावर दावा सांगण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत इच्छुकांची लढाई सुरू झाली असून या मतदारसंघात असलेली मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेता मुस्लिम समाजासाठी ही जागा सोडून देण्याची मागणी सुरू झाली आहे. ठाणे महापालिकेचा भाग असलेला खाडीपलिकडील कळवा-मुंब्य्राचा परिसर लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात येतो. आठ लाख लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघात कळवा परिसरात एक लाख २७ हजार मतदार असून मुंब्रा भागात एक लाख १५ हजार मतदार आहेत.

‘मराठवाडा भूषण’ मुंडेंची ‘तुतारी’ फुंकण्यास मेटे सज्ज!
संदीप प्रधान
मुंबई, २६ जून

‘वाजवा तुतारी हटवा वंजारी’ असा एसएमएस बीड लोकसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वी फिरत होता. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांना ती तुतारी कर्णकर्कश वाटली होती. आता निवडणुकीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर मुंडे विजयी झाल्यावर मराठवाडा लोकविकास मंचाचे अध्यक्ष व मराठा आरक्षणाचे खंदे पुरस्कर्ते विनायक मेटे त्याच गोपीनाथ मुंडे यांना ‘मराठवाडा भूषण पुरस्कार’ देऊन त्यांच्या सन्मानाची तुतारी फुंकण्याकरिता सज्ज झाले आहेत.

विलासरावांची ‘एकला चलो रे’ची भाषा बदलली
प्रफुल्ल पटेल यांचे शरसंधान
नागपूर, २६ जून / प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका मांडणारे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची भाषा काँग्रेसश्रेष्ठीच आघाडीचा निर्णय घेणार असल्यामुळे बदलली आहे, असा टोला लगावतानाच विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबतच राहण्याची आमची मनापासून तयारी आहे, असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आज स्पष्ट केले. प्रफुल्ल पटेल यांचे तीन दिवसांच्या भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आज नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आमगन झाल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. विलासराव देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढावे, असे विधान केले होते. यानंतर त्यांनी ते त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून सारवासारव केली. या मुद्यावर प्रतिक्रिया विचारली असता पटेल यांनी विलासरावांवर शरसंधान केले. विलासरावांना स्वबळावर लढण्याचे कितीही वाटत असले तरी काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठीच निर्णय घेत असल्याने त्यांची भाषा बदलली आहे, असे पटेल म्हणाले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी कायम राहणार असल्याचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे. यामुळे कोणत्याही स्थितीत काँग्रेसपासून राष्ट्रवादी वेगळा होणार नाही, असा विश्वासही प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. नागपुरातील महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पाचे काम रेंगाळले असल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी इन्कार केला. काम रेंगाळलेले आहे, असे वाटत नाही. मात्र, विमानतळ हस्तांतरण किंवा नवीन संयुक्त कंपनी स्थापन करण्यात येणाऱ्या अडचणी प्रकल्पाच्या प्रवर्तकांनी त्या निदर्शनास आणून दिल्यास तात्काळ दूर करण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.