Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

औरंगाबाद पर्यटन विकास प्रश्नधिकरण स्थापणार
- विखे

औरंगाबाद, २६ जून/खास प्रतिनिधी

जिल्ह्य़ाचा विकास साधायचा असेल तर आगामी काळात पर्यटनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच औरंगाबाद पर्यटन विकास प्रश्नधिकरण स्थापण्याचा विचार संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज बोलून दाखविला. या प्रश्नधिकरणामुळे जिल्ह्य़ाच्या विकासासाठी केंद्राकडूनही निधी मिळू शकतो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक संपर्कमंत्री श्री. विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत हे प्रश्नधिकरण स्थापण्याचा ठराव घेण्यात आला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसांत प्रस्ताव सादर करून राज्य सरकारकडे देण्याची सूचना त्यांनी केली. हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल. पंढरपूर, शिर्डी या तीर्थक्षेत्रांची प्रश्नधिकरणे झाली आहेत. त्याच धर्तीवर हे प्रश्नधिकरण असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

‘इंद्रनीलचा असर सरेना’
साहित्य, संगीत, चित्र, शिल्प, फोटोग्राफी या साऱ्या सृजनाच्या व अभि-व्यक्तीच्या कला आहेत. प्रत्येक कलेचं वैशिष्टय़ वेगळं आणि तिचं आवाहनही निराळं. पण या साऱ्याहून सिनेमा श्रेष्ठ आहे. कारण वरील सर्व कलेचा सुयोग्य असा मेळ त्यात घातला जातो. त्याला ध्वनी व दृश्याची जोड देऊन ती अधिक संवादी होते. अर्थात मी हे जागतिक दर्जाच्या कलात्मक सिनेमाबद्दल बोलत आहे. ‘मॅजिक ऑफ सिनेमा’ अनुभवायाचा असेल, तर असे श्रेष्ठ कलात्मक सिनेमे पाहायला हवेत. भारतीय सत्यजित रे, गोपालकृष्णन, गिरीश कसारवल्लीपासून इराणच्या माजिदीपर्यंतचे अनेक नावे सिनेमाप्रेमी वाचकांना सहजतेनं स्मरतील.

‘सिब्बल यांची सूचना आदर्शवादी’
प्रदीप नणंदकर, लातूर, २६ जून

दहावीची मंडळाची परीक्षा नकोच, अशी सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी मांडली आहे. ती आदर्शवादातून आलेली असून त्याला व्यवहारवादाची जोड देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया ‘लातूर पॅटर्न’चे जनक डॉ. अनिरुद्ध जाधव यांनी आज व्यक्त केली.

सीबीआय अधिकाऱ्यांकडून लातूर-उस्मानाबादमध्ये पाहणी
उस्मानाबाद, २६ जून/वार्ताहर

पवन राजे हत्याकांडाच्या तपासासाठी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या दोन निवासस्थानांना टाळे ठोकल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सी. बी. आय.) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल आरोपी पिंटू सिंगसमवेत लातूर आणि उस्मानाबादमध्ये काही स्थळांची पाहणी केली. हत्येपूर्वी दोनवेळा पवन राजेनिंबाळकर यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता. ते प्रयत्न अयशस्वी कसे ठरले, याची माहिही अधिकाऱ्यांनी घेतली.

दहावीच्या परीक्षेत मार्काचा पाऊस
लातूर, २६ जून/वार्ताहर

दहावीच्या परीक्षेत संपूर्ण जिल्हाभर मार्काचा पाऊस झाल्यामुळे विद्यार्थी, पालक, संस्थाचालक या सर्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या असल्या, तरी दहावीच्या परीक्षेतील पावसामुळे या विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेशाची पेरणी करता येणार आहे.

माजलगावमध्ये ‘बंद’; चार बसगाडय़ांवर दगडफेकमाजलगावमध्ये ‘बंद’; चार बसगाडय़ांवर दगडफेक; मारामारीत जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू
बीड, २६ जून/वार्ताहर
माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथे झालेल्या सशस्त्र मारामारीतील जखमी सदाशिव देवराव साळवे यांचा काल रात्री मृत्यू झाला. उपचारात निष्काळजीपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करावे व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी माजलगावमध्ये दिवसभर ‘बंद’ पाळण्यात आला. चार एस. टी. बसगाडय़ांवर दगडफेक झाली. अनेक ठिकाणी टायर पेटवून रस्ते अडविण्यात आले. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या सोळापैकी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अपघातात महिला ठार
मानवत, २६ जून/वार्ताहर

रामनगरजवळील पुलावर मोटर धडकून एक महिला ठार झाली. रवी मंत्री (वय ३१) आपली पत्नी प्रिती (वय २६) आणि मुलगी राधिका (वय ५) यांच्यासह मोटारीने (क्र. एमएच-२२-डी-०२४५) माजलगावमार्गे परळीला जात होते. गंगामसला गावाच्या पुढे रामनगरजवळील पुलावर मोटर धडकली. यात प्रिती यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. औरंगाबादला उपचारासाठी नेताना त्यांचा मृत्यू झाला. या रवी यांच्या पायाला गंभीर इजा झाली असून राधिकाला किरकोळ मार लागला. ही घटना काल सकाळी १० च्या सुमारास घडली. रवी मंत्री हे मानवत येथील ‘मंत्री शोरूम’चे मालक रामप्रकाश मंत्री यांचे चिरंजीव आहेत.

रेल्वे इंजिनला धडकून एक ठार
मानवत, २६ जून/वार्ताहर
सांगली अर्बन बँकेतील कर्मचारी जयंत मनोहर मन्नुर (वय ४५, रा. सांगली) यांचा मानवत रस्त्याच्या क्रॉसिंगजवळ रेल्वे इंजिनला धडकल्याने मृत्यू झाला. काल सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. श्री. मन्नुर मूळचे सांगलीचे रहिवासी आहेत. मानवत शाखेत बार्शीहून बदली होती. सेलूकडून मानवत रस्त्याला येणाऱ्या रेल्वे इंजिनखाली श्री. मन्नुर रेल्वे फाटकाजवळील क्रॉसिंगजवळ धडकले व ५०-६० फूट फरफटत गेल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे पडल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

काळ्या बाजारात गहू नेणाऱ्यास अटक
निलंगा, २६ जून/वार्ताहर

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना तालुक्यातील कासारशिरसी येथे एकास अटक करण्यात आली. अमित सुनील बोळशेट्टे (वय २२, कासारशिरसी) असे आरोपीचे नाव आहे. कासारशिरसी येथे बुधवारी छापा घालून काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ५० पोती गहू पकडण्यात आला.

जुगार खेळणाऱ्यांना पकडले
नांदेड, २६ जून/वार्ताहर

झन्नामन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या १२ जणांविरुद्ध सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कौठा परिसरातल्या पाण्याच्या टाकीजवळ सिडको पोलीस ठाण्याच्या पथकाने तेथे छापा घातला. व जुगार खेळणाऱ्या १२ जणांना पकडले. त्यांच्याजवळील चार मोटारसायकल, ११ मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

कामगाराच्या मृत्यूप्रकरणात उद्योजकास अटक
जालना, २६ जून/वार्ताहर
औद्योगिक वसाहतीमधील एस. आर. जे. पित्ती या स्टील उद्योगातील कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी उद्योगाचे संचालक सुरेंद्र पित्ती आणि अन्य दोघांना काल अटक केली होती. त्यांची जामिनावर मुक्तता झाली. एस. आर. जे. पित्ती उद्योगातील कामगार जंगबहादूर पंडित (वय ३५) कारखान्यात जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुरेंद्र माकळे यांनी याप्रकरणी चौकशी केली.
कदीम जालना पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक पागोरे यांच्या फिर्यादीवरून कारखान्याचे संचालक सुरेंद्र पित्ती, मोहम्मद समी व अशोक शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लोखंड वितळविण्याच्या भट्टीजवळ योग्य सुरक्षा न ठेवल्याचा आरोप करण्यात आला.

समता दिंडीने सामाजिक न्यायदिनाचा प्रश्नरंभ
औरंगाबाद, २६ जून/खास प्रतिनिधी

समाज कल्याण विभाग व जय विश्वकर्मा सूर्योदय संस्थेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त शुक्रवारी सकाळी ८ वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महापौर विजया रहाटकर यांनी या दिंडीला हिरवा झेंडा दाखविला.

प्रशासकीय कार्यालयांअभावी नागरिकांची गैरसोय
हिंगोली, २६ जून/वार्ताहर
हिंगोली जिल्हानिर्मितीला १० वर्षे पूर्ण झाले; परंतु या जिल्ह्य़ाला आवश्यक जिल्हास्तरीय १० प्रशासकीय कार्यालय सुरू झाले नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. ही कार्यालये लवकर सुरु करवीत अशी मागणी नागरिक करीत आहेत. जिल्हानिर्मितीला १० वर्षाचा काळ लोटला आहे. मात्रना नागरिकांशी संबंधित १० कार्यालये अद्यापि सुरू झालेली नाहीत.
अनेक पदे रिक्त
महसूल विभागात विशेष भूसंपादन अधिकारी, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारीपद, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. याचप्रमाणे जिल्ह्य़ात सुमारे ११ नायब तहसीलदारांची पदे, तलाठी संवर्गातील सुमारे १४ पदे रिक्त आहेत. यामध्ये हिंगोली ११ व वसमत तीन यांचा समावेश आहे. सेनगाव व कळमनुरी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

पतसंस्थेच्या चालकाने फसविल्याची तक्रार
औरंगाबाद, २६ जून /प्रतिनिधी
पतसंस्थेत पिग्मी योजनेत जमा केलेले पैसे हडप करून अंजनीपुत्र सहकारी पतसंस्थेचा चालक महेश बाबुराव सोलापूरे याने काही जणांना फसविल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सुरेश गुलाबसिंग राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. अंजनीपुत्र संस्थेत राठोड आणि त्यांच्या काही मित्रांनी पिग्मी योजनेत नियमितपणे रक्कम जमा केली होती. राठोड यांचे ३१ हजार ७०५ रुपये जमा झाले होते. मात्र काही कालावधीनंतर ही रक्कम संस्थेत जमा न करता ती परस्पर हडप केल्याचे समोर आले. त्यानंतर राठोड यांनी पतसंस्थेकडे पैशांची मागणी केली असता तेथे ही रक्कम जमाच झाली नसल्याचे निदर्शनास आले. विचारणा केल्यावर सोलापुरे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर राठोड यांनी तक्रार दिली.

शिवसेनेचा उद्या मेळावा
औरंगाबाद, २६ जून/खास प्रतिनिधी
विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी शिवसेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात रविवारी (दि. २८) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे संपर्क नेते विश्वनाथ नेरूलकर, उपनेते खासदार चंद्रकांत खैरे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, सचिव अनिल देसाई आदी नेते उपस्थित राहणार आहेत. ते या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यास शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केले आहे.

गायरान जमिनींचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी मोर्चा
अंबाजोगाई, २६ जून/वार्ताहर

अंबाजोगाई व केज तालुक्यांतील ७० गावांच्या गायरान जमिनींबाबतचा प्रश्न सरकारने प्रलंबित ठेवला आहे. कारवाई करून तो तातडीने मार्गी लावावा यासाठी जमीन अधिकार आंदोलन व मानवी हक्क अभियान यांनी आज उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या दोन्ही तालुक्यांतील ३० गावांचे अतिक्रमण प्रस्ताव आणि ७० गावांचे गायरान जमीन मागणीचेही कायदेशीर प्रस्ताव १९७८ ते १९९० पर्यंत ठोस पुराव्यानिशी शासनाकडे सादर करण्यात आले आहेत. परंतु या दोन्ही तालुक्यांतील गायरानधारकांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. अतिक्रमित गायरान जमिनींचे पीक पंचनाम्याच्या नोंदी घ्याव्यात, सातबारा, ८-अ च्या उताऱ्यांचे तात्काळ वाटप करावे आदी मागण्यांचे निवेदन जमीन अधिकार आंदोलनाचे रमेश भिसे, मानवी हक्क मोहीमेचे एकनाथ आवाड, बाबा पोटभरे, विमल तरकसे आदींनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आषाढी महोत्सवाचे आयोजन
नांदेड, २६ जून/वार्ताहर

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आषाढी महोत्सवात पं. हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, उत्तरा केळकर, रवींद्र साठे उपस्थित राहणार असल्याचे संयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांनी सांगितले. कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सोमवारी (दि. २९) हा कार्यक्रम होणार आहे. दि. ३ जुलैपर्यंत चालणाऱ्या महोत्सवाची सुरुवात दिंडीने होणार आहे. यात अभिनेते मिलिंद गुणाजी, अरुण दाते सहभागी होतील. यानिमित्ताने उत्कृष्ट दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन मिलिंद गुणाजी यांच्या हस्ते व समारोप अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते होणार आहे.

भोकरदन तालुक्याचा ९० टक्के निकाल
भोकरदन, २६ जून/वार्ताहर

तालुक्यात दहावीच्या परीक्षेत ८९.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्यात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविण्याचा मान शहरातील न्यू हायस्कूल शाळेच्या अनुक्रमे प्रश्नची हजारे (९३.२३ टक्के), मयुरेश ठाकरे (९१.२३ टक्के) यांनी मिळविला. तालुक्यात एकूण ५२ शाळांमधून ४,३८२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३,९३४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८९.९० टक्के निकाल लागला. दुबारमधील ३१२ पैकी ११७ जण उत्तीर्ण झाले असून त्यांचा निकाल ५०.९१ टक्के लागला. शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल ८२.२९ टक्के, न्यू हायस्कूल ८५.८७ टक्के, प्रियदर्शनी कन्या हायस्कूल ८७.०९ टक्के, अलहुदा उर्दू हायस्कूल ९५.८ टक्के असा शाळानिहाय निकाल लागला.

राघव जोशी अंबाजोगाईमध्ये पहिला
अंबाजोगाई, २६ जून/वार्ताहर

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत खोलेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी राघव प्रकाश जोशी (९६.३० टक्के) गुण मिळवून शहरात पहिला आला. श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोळ योगेश्वरी कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी अंबिका उमाकांत देवगावकर इंग्रजी विषयात ९५ गुण मिळवून बोर्डात पहिली आली आहे. दहावीच्या परीक्षेत अंबाजोगाई तालुक्याचा निकाल ८१.०५ टक्के लागला आहे. अंबाजोगाई शहरातील जवळपास ५० विद्यार्थी ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण प्रश्नप्त करून उत्तीर्ण झाले आहेत. राघव प्रकाश जोशी (९६.३० टक्के, खोलेश्वर विद्यालय), भार्गव श्रीराम जोशी (९२.९२, खोलेश्वर विद्यालय), प्रदीप प्रल्हाद कावळे (९२.६१ टक्के, खोलेश्वर विद्यालय), कौशिक दिलीप सरदेशपांडे (९२ टक्के, खोलेश्वर विद्यालय) या गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत मुख्याध्यापक लक्ष्मीकांत नेलवाडकर, शालेय समितीचे अध्यक्ष ओमकेश दहीफळे यांनी केले आहे.

सोयगावमध्ये पावसाची दमदार हजेरी
सोयगाव, २६ जून/वार्ताहर

यंदाच्या पावसाळ्यातील पहिला दमदार पाऊस रात्री झाल्यामुळे शेतकरीवर्गात उत्साह पसरला आहे. मृग नक्षत्रात हलका पाऊस झाला. संध्याकाळी २० मिनिटे पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर मध्यरात्री पुन्हा सुरु झालेला पाऊस सुमारे एक तास सुरू होता.