Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘मूनवॉकर’ मायकेल जॅक्सन काळाच्या पडद्याआड
लॉसएंजेलिस, २६ जून/पीटीआय

 

‘पॉप संगीताचा बादशहा’ म्हणून संपूर्ण जगाला परिचित असलेल्या मायकेल जॅक्सन याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आपल्या संगीताने कोटय़वधी रसिकांवर चांदण्यांची पखरण करणाऱ्या या कलाकाराचे असे अकाली जाणे सर्वानाच चटका लावून गेले. त्याचे वय मृत्युसमयी अवघे पन्नास वर्षे होते. मायकेल जॅक्सनचा ‘धीस इज इट’ या मैफलीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपली कला रसिकांच्या चरणी रुजू करणार होता, पण त्याच्या काही आठवडे अगोदरच त्याने या जगाचा निरोप घेतला. त्याची जीवनशैली बरीच बिनधास्त होती, त्यामुळे तो ‘वॅको जॅको’ म्हणूनही ओळखला जात असे. सेक्स स्कँडल, प्लास्टिक सर्जरी अशा अनेक प्रकरणांमुळेही तो प्रसिद्धीच्या झोतात राहिला काल रात्री लॉसएंजेलिस येथील बेल एअर प्रासादात तो कोसळला. नंतर त्याला रोनाल्ड रीगन युसीएलए मेडिकल सेंटर येथे नेण्यात आले, परंतु तो वाचू शकला नाही. अग्निशमन दलाच्या पॅरामेडिकल पथकाने त्याला वेळीच वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. लॉसएंजल्स कोरोनर कार्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट फ्रेड कोरल यांनी सांगितले, की स्थानिक वेळेनुसार दुपारी २.२६ वाजता तर भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे २.५६ वाजता तो मरण पावल्याचे जाहीर करण्यात आले.