Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मायकेल.. मेरी आवाजही पहचान हैं!
राज ठाकरे

 

मायकेल जॅक्सन याच्या आकस्मिक मृत्यूमुळे एक लिजंड गेला.. ग्रेट कलावंत गेला.. ज्या काळी मायकेल जॅक्सन जग गाजवत होता , जगातील करोडो चाहत्यांच्या हृदयाची धडकन बनला होता त्या ऐन बहराच्या काळात मायकेलचे भारतात, महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत येणे म्हणजे आश्चर्याच्या पलीकडचे होते. मायकेलचं गाणं आणि त्याच्या डान्सवर आपली जान कुर्बान करून टाकणाऱ्या जवाँ पिढीसाठी तर साक्षात मुंबईत देवच अवतरत होता.
शिवउद्योग सेनेसाठी काहीतरी कार्यक्रम करायचा असं जेव्हा मी ठरवत होतो तेव्हा ‘विझक्राफ्ट’ या कंपनीनेच मायकेल जॅक्सनला आणण्याची ऑफर दिली. विझक्राफ्टच्या या ऑफरला नकार देणं केवळ अशक्य होतं. मायकेल इथे येणार म्हणजे काय होणार हे मला त्यावेळीच माहीत होतं. मायकेलला इथे नाचवला अशी जी टीका माझ्यावर नंतर झाली त्याचं कारण म्हणजे तो काय चीज आहे हे या देशातील आम जनतेला कळण्याआधी मी त्याला इथे आणला होता..
विझक्राफ्टला मायकेल जॅक्सनने होकार दिला आणि मग जी काही धावपळ सुरु झाली ती शब्दांत सांगता येणार नाही. मायकेलची तीन विमानं आली होती. एका खास विमानात तो स्वत:, एकात त्याचे सर्व सहकारी आणि एका विमानात त्यांचं सामान. विमानतळावर तर ही गर्दी. त्यातही छायाचित्रकार असंख्य. त्याचं स्वागत मी खास मराठमोळ्या पद्धतीने करायचं ठरवलं होतं आणि ते झालंही धडाक्यात. आपल्या सुवासिनींनी त्याला ओवाळल्यानंतर ढोल, ताशांचा कडकडाट सुरु झाला आणि कुणाला कळण्याआधीच मायकेलची पावलं ढोलाच्या ठेक्यावर थिरकली. . कोटय़वधी तरुण तरुणी ज्याच्या नावाने एकांतात उसासे टाकत होत्या तो मायकेल छत्रपती शिवाजी विमानतळावर मराठमोळ्या लेझिमच्या तालावर नाचत होता.
दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष कार्यक्रमात तो काय धमाल उडवून देणार आहे याची झलकही देत होता.. त्यानंतर पुढच्याच काही मिनिटांत मायकेलने जे काही केले त्याने तर सुरक्षारक्षकांची तारांबळच उडवली. विमानतळाजवळ गरिबांच्या झोपडय़ा दिसल्यानंतर मायकेलने गाडी थांबवली आणि गरिबांशी संवाद साधायला तो झोपडय़ांत शिरला. मात्र सुरक्षारक्षकांमुळे मायकेलला एक - दोन मिनिटेच झोपडीवासियांशी मूक संवाद साधता आला.
मायकेलचा त्याच्या शो आधीचा मुंबईतील सर्वात मोठा कार्यक्रम होता तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांशी भेट. बाळासाहेब कोण आहेत, मायकेलच्या चाहत्यांप्रमाणे बाळासाहेबांचे किती लाखो अनुयायी आहेत, हे सारे त्याला कळावे म्हणून मी आधीच त्याला बाळासाहेबांबाबतच्या कॅसेट पाठवून दिल्या होत्या. मातोश्रीवर मायकेल आणि बाळासाहेबांची भेट अवघी वीस - पंचवीस मिनिटेच झाली . पण दोन विख्यात कलावंतांतील तो एकमेकांना जाणून घेण्याचा अत्यंत हृद्य काळ होता. मायकेलला भेट देण्यासाठी म्हणून मी खास चांदीची वीणा बनवून घेतली होती. ती मायकेलला बाळासाहेबांच्या हस्ते दिली तेव्हा मायकेलचे डोळे लकाकले. या साऱ्या गडबडीतही मायकेलने माझ्या एम्ब्रॉएडरी केलेल्या जाकिटचं खास कौतुक केलं. आणि जेव्हा मायकेल ‘मातोश्री’तून ‘ओबेरॉय हॉटेल’वर जायला निघाला तेव्हा पोलिसांनी त्याच्याबरोबर एक फोटो काढण्याचा आग्रह केला. मायकेलने त्याक्षणी काय केलं असेल ? तो फोटोसाठी चक्क मातोश्रीसमोरील फुटपाथवर खाली बसला.
मायकेल माणूस म्हणून किती मोठा होता हे जगाला माहित आहे. सामाजिक बांधिलकीतून, विश्वबंधुत्वाच्या कल्पनेतून त्याची गाणी जगासमोर आली. ज्याचं कलावंतपण जपून ठेवावं असा मायकेल होता. डोळे खिळवून ठेवणारे त्याचे शो, भव्यदिव्य रंगमचावरचा त्याचा तितकाच भव्यदिव्य झपाटा या साऱ्यापलीकडेही मायकेलला बरंच काही सांगायचं असावं, असं मला नेहमीच वाटतं.
त्याच्या बदललेल्या चेहऱ्याबद्दल बरंच बोललं गेल. त्याच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया झालेल्या असल्या तरी तो म्हणजे एक अनोखे युगच आहे. लता मंगेशकरांचे एक गाणे आहे. . नाम गुम जाएगा. चेहरा ये बदल जाएगा. मेरी आवाजही पहचान है.. या गाण्यातील शब्दांप्रमाणेच मायकेलचा आवाज त्याची पहचान बनून राहणार आहे.