Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

अलविदा मायकेल!

 

मायकेल जॅक्सनचं निधन झालं. वय ५० म्हणजे तसं फार नाही. मायकेल जॅक्सन हा पॉप संगीतातला दादा माणूस. त्याच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी सांगायचं तर ‘सेलेब्रिटी’ च्या समस्येनं तो ग्रासलेला होता. काही काळ शिखरावरून फेकला गेल्यानंतर तो पुन्हा ते स्टेटस मिळवण्याच्या प्रयत्नात होता त्याचं दडपण कदाचित त्याच्यावर आला असावं त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याने ड्रग्जचा ओव्हरडोस घेतल्याचंही बोललं जात आहे. त्याच्या घरात मरलिन मन्रोचा पुतळा आहे. हॉलिवूड स्टार चार्ली चॅप्लिनने ही मायावी चित्रपटसृष्टी सोडली व एकांतात गेला, त्याचा मायकेलने अभ्यास केला होता. योगायोग असा, की सेलिब्रिटी असलेल्या मायकेलवरही एकांतात जाण्याची वेळ आली. मायकेलचा विवाह एलव्हिस पर्सले यांच्या मुलीशी झाला होता. बाल कलाकार म्हणून त्याने जी चमक दाखवायला सुरुवात केली ती अखेपर्यंत कायम होती. परग्रहावरून आलेल्या एखाद्या माणसासारखं त्याचे व्यक्तिमत्त्व. रंगमंचावर अदाकारी सुरू असताना टाळ्यांचा ठेका थांबला तर तो अस्वस्थ व्हायचा. १९८० च्या दशकात त्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. बीट इट, बिली जीन, थ्रिलर या संगीत व्हिडिओंनी त्याला शिखरावर नेले. त्याच्या पिढीतील तो एक कलंदर नर्तक-संगीतकार होता. तांबडे जॅकेट, एक चमचमणारा ग्लोव्ह अशा पेहरावात रंगमंचावर थिरकताना तो स्वत:चे अस्तित्वच विसरत असे. त्याच्या मागेमागे थिरकत जाण्याच्या लकबीमुळे तो रसिकांचा लाडका मूनवॉकर ठरला. संगीताशिवायही अनेक गोष्टींचे त्याला वेड होते. त्यातूनच त्याने चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करून घेतली होती, त्यामुळे त्याचा चेहरा एखाद्या लँडस्केपसारखा दिसत होता. एकेकाळी ऐश्वर्यात लोळणारा हा अनभिषिक्त सम्राट त्याच्या अखेरच्या क्षणी मात्र कर्जाच्या सापळ्यात अडकला होता. त्याच्यावर चाळीस कोटी डॉलरचे कर्ज होते. १९९७ पासून त्याने कुठलाही दौरा केला नाही व २००१ नंतर नवीन संगीतरचना केली नाही. त्याच्या विचित्र वागण्यामुळे नंतर तो टॅब्लॉईडच्या गरमागरम चर्चाचा विषय ठरला. त्याने लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर होता पण या आरोपातून तो मुक्त झाला. नंतर पुन्हा कारकीर्द सुरू करण्याचे चंद्रबळ तो एकवटत होता खरा; पण त्यापूर्वीच त्याचा अंत झाला. लंडनमध्ये जुलैत त्याचे ५० कार्यक्रम होणार होते. त्या कार्यक्रमाची रंगीत तालीम तो करीत होता. सोनी म्युझिकचे माजी अध्यक्ष टॉमी मोटोला यांनी सांगितले, की तो एकेकाळी पॉप संगीताचा बादशहा होता पण आता तो कफल्लक होता. पॉप संगीतात सिनात्रा, एलविस, मायकेल ही त्रिमूर्ती गाजली. पण मायकेलच्या संगीताने वयाची बंधने तोडली, वंशाच्या मर्यादा ओलांडल्या व एका नव्या व्हिडिओ युगात सर्वाना तो घेऊन गेला. त्याच्याकडे बुद्धिमत्ता होती. व्यावसायिकता होती व समर्पणाची तयारी होती. एक चांगला एंटरटेनर म्हणून तो सर्वाना परिचित होता, त्यामुळेच जगावर त्याची मोहिनी कायम राहिली. मायकेल जॅक्सनचा जन्म २९ ऑगस्ट १९५८ रोजी गॅरी (इंडियाना) येथे झाला. त्याची आई कॅथरिन हिचा तो नऊ मुलांपैकी पाचवा. त्याच्यात काही तरी वेगळं आहे असं तिलाही वाटत होते. त्याचवेळी त्याचे पाय पाळण्यात दिसू लागले होते. त्याच्यातले गुण हेरून त्या माउलीने त्याला लोकगीतांचे शिक्षण दिले. त्याचे वडील जोसेफ हे क्रेन ऑपरेटर होते. त्यांनी एकदा मायकेलला बँड वाजवून दाखवला. गिटार वाजवून दाखवली, अशा प्रकारे तो घडत गेला. किंटरगार्टनमध्ये असल्यापासूनच तो नृत्यपथकाचे नेतृत्व करू लागला होता. १९६८ मध्ये एका कार्यक्रमात गायक ग्लॅडीज नाइट व पियानोवादक बिली टेलर यांनी त्याला पाहिले व त्याची शिफारस मोटाऊनचे संस्थापक बेरी गॉर्डी यांच्याकडे केली. मोटाऊन्सने त्याला कॅलिफोर्नियात आणले. ऑगस्ट १९६८ मध्ये तेथे त्याने बिव्हरली हिल्स क्लबमध्ये द डेझी हा अविस्मरणीय नृत्यसंगीताविष्कार सादर केला. मग त्याने मागे वळून पाहिले नाही. डिसेंबर १९६९ मध्ये ‘डायना रॉस प्रेझेंट्स द जॅक्सन-५’ हा त्याचा अल्बम आला तो हिट ठरला.
जॅक्सन एकदा म्हणाला होता, की माझे बालपण हरवले ते मला कधीच मिळाले नाही. एकदा तर ख्रिसमस होता पण मला तो साजरा करता आला नाही. कारण इतर मुले ज्या गंमतगोष्टी करतात, ते करण्यापूर्वीच मी प्रौढ झालो होतो. मायकेलचे वडील त्यांच्या मुलांना नेहमी मारायचे. एकही पदन्यास चुकलेला त्यांना खपत नसे, त्यांना सगळेच घाबरायचे अशी आठवण मायकेलने बीबीसीच्या मार्टिन बशीर यांना सांगितली होती. बसक्या नाकावरून वडील त्याची थट्टा करायचे. रंगमंचावर मात्र तो कुणाच्या बापाला भीक घालत नव्हता. त्याने न्यूजवीकला सांगितले होते, की मी नाचायला गायला लागलो, की रसिक पैशांचा पाऊस पाडायचे. इतके पैसे यायचे ते खिशात ठेवल्यावर पँट चढवता येत नसे. शेवटी पट्टय़ाने पँट सावरावी लागत असे. असा हा कोटय़धीश, अनभिषिक्त पॉप सम्राट कफल्लक अवस्थेत काळाच्या पडद्याआड गेला.
मॅडोनाला रडू आवरले नाही!
लॉस एंजेलिस : जगद्विख्यात पॉप स्टार मायकेल जॅक्सन याच्या निधनाचे वृत्त ऐकून पॉप गायिका मॅडोना हिला रडू कोसळले. जॅक्सन हा पॉप गायकी क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व होता. त्याच्या निधनाचे वृत्त ऐकून मला रडू आवरले नाही असे मॅडोनाने सांगितले.मॅडोनाने सांगितले की, मायकेल जॅक्सनची मी चाहती आहे. जॅक्सन आज आपल्यात नसला तरी त्याचे संगीत आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील.