Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला
मुंबईत पहिलाच दमदार पाऊस
मुंबई, २६ जून / खास प्रतिनिधी

 

मुंबईत दोनच दिवसांपूर्वी दाखल झाल्यानंतर आता मान्सूनने जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. मुंबईत आज या हंगामातील पहिलाच दमदार पाऊस पडला, तसेच कोकणातही ठिकठिकाणी चांगला पाऊस झाला. राज्याच्या इतर भागात मात्र त्याचा विशेष जोर नव्हता. येत्या दोन दिवसांत कोकणात काही ठिकाणी मोठय़ा पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर राज्याच्या इतर भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मान्सून महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेशात तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओरिसातही आज पुढे सरकला. त्याची उत्तर सीमा आता गुजरातेत भूज, बदोडा, मध्य प्रदेशात खांडवा, महाराष्ट्रात नागपूर, ओरिसात बालासोर, सिक्कीममध्ये गंगटोक या शहरांपर्यंत आहे. महाराष्ट्रात गोंदिया व भंडारा जिल्ह्यांचा काही भाग वगळता त्याने संपूर्ण राज्य व्यापले आहे. अरबी समुद्रात किनारपट्टीलगत असलेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात मात्र हवामान अनुकूल नसल्याने राज्याच्या इतर भागात पावसाची तीव्रता फारशी नाही, असे पुणे वेधशाळेच्या संचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले. राज्यात आज सकाळपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नोंदवल्या गेलेला पाऊस पुढीलप्रमाणे (मिलिमीटरमध्ये)- मुंबई (कुलाबा) ८८.७, मुंबई (सांताक्रुझ) ९०.६, डहाणू ३१, रत्नागिरी ३५, महाबळेश्वर ३१, सातारा १. याशिवाय कोकणात काल मध्यरात्रीनंतर पहाटेसुद्धा पाऊस झाला. मुंबईत मान्सूनचे दोन दिवसांपूर्वी मान्सूनचे आगमन झाले असले तरी आज पहिल्यांदाच दमदार पाऊस पडला. शहरात पहाटे सरी पडत होत्या. त्यानंतर दिवसभरही त्यांचे बरसणे कायम होते. ठ