Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

ऑनलाइन प्रवेशाचा बोजवारा
मुंबई, २६ जून / प्रतिनिधी

 

अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा गाजावाजा करणारा शालेय शिक्षण विभाग आज पहिल्याच दिवशी तोंडघशी पडला. सकाळी जेमतेम तीन तास ऑनलाइन अर्ज सादरीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संकतेस्थळाचे तीनतेरा वाजले. या प्रकाराच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’च्या कार्यकर्त्यांनी एमकेसीएलच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. एवढे रामायण होऊनही प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार विद्यार्थ्यांनी दिवसअखेर आपले ऑनलाइन अर्ज यशस्वीपणे भरल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.
अर्ज सादरीकरण करण्याची प्रक्रियाच ठप्प झाल्याने विद्यार्थी-पालकांच्या तोंडचे पाणी पळाले. विविध महाविद्यालये तसेच शिवसेना, मनसे, भाजप अशा पक्ष-संघटनांनी सुरू केलेल्या केंद्रांवरील ऑनलाइन सेवाही ठप्प झाली. बराच प्रयत्न करूनही संकेतस्थळ सुरू होत नव्हते. संकेतस्थळ उघडले तर ‘लॉग इन आयडी’ व ‘पासवर्ड’ जनरेट होत नव्हता. किचकट अर्ज भरताना मध्येच ‘एरर’ येत होते. त्यामुळे ऑनलाइन अर्ज सादरीकरणाची प्रक्रिया ठप्प झाली अन् केंद्रांवर लांबलचक रांगा लागल्या. अशातच दिवसभर संततधार पाऊस असल्याने पालक व विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. ऑनलाइन प्रवेशाचा बोजवारा उडाल्याचे समजल्याने विद्यार्थ्यांनी एकच गलका केला. त्यामुळे अखेर विद्यार्थ्यांना उद्या अर्ज भरण्यासाठी येण्याच्या सूचना महाविद्यालयांमार्फत करण्यात आल्या.
ऑनलाइन प्रवेशाचा सावळागोंधळ झाल्याने एमकेसीएलच्या अधिकाऱ्यांची मात्र दाणादाण उडाली. ‘मेंटेनन्ससाठी संकेतस्थळ बंद ठेवले असून सायंकाळी चार वाजल्यानंतर ते पुन्हा सुरू होईल’ असा संदेश संकेतस्थळाच्या होमपेजवर देण्यात आला. परंतु, प्रत्यक्षात सायंकाळी पाचनंतरही हे संकेतस्थळ कासवगतीने सुरू होते. दरम्यान, शिक्षण विभागातील सूत्रांशी संपर्क साधला असता, अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अचानक वाढली. एका सेकंदाला सरासरी पाच अर्ज येऊ लागले. त्यामुळे सव्र्हरवर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून नवीन सव्र्हर जोडण्यासाठी तासभर संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. आज दिवसभरात ४८ हजार विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे अर्ज सादर केल्याचेही ते म्हणाले.

मनविसेची तोडफोड
ऑनलाइन प्रवेशाचा बोजवारा उडाल्यामुळे संतप्त झालेल्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’च्या कार्यकर्त्यांनी आज तंत्रशिक्षण संचालनालयाजवळ असलेल्या ‘एमकेसीएल’च्या कार्यालयात घुसून तुफान तोडफोड केली. कार्पोरेट स्टाईलच्या या कार्यालयाची मनविसेचे कार्यकर्त्यांनी दुर्दशा केली. काचेचा दरवाजा, कॉन्फरन्स रूममधील काचेची भिंत, फॅक्स मशीन, संगणक, फ्रंट डेस्क, फ्लॉवर पॉट यांची यथेच्छ तोडफोड केली. विशेष म्हणजे, अकरावी ऑनलाइनच्या प्रवेशावरून मनविसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. परंतु, प्रत्यक्षात मात्र या कार्यालयात तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे काम चालू होते. पण, हे कार्यालय एमकेसीएलचे असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी तुफान तोडफोड केली. या घटनेचा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार कृपाशंकर सिंह तसेच मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी निषेध व्यक्त केला आहे.