Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

औरंगाबाद पर्यटन विकास प्रश्नधिकरण स्थापणार - विखे
औरंगाबाद, २६ जून/खास प्रतिनिधी
जिल्ह्य़ाचा विकास साधायचा असेल तर आगामी काळात पर्यटनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच

 

औरंगाबाद पर्यटन विकास प्रश्नधिकरण स्थापण्याचा विचार संपर्कमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज बोलून दाखविला. या प्रश्नधिकरणामुळे जिल्ह्य़ाच्या विकासासाठी केंद्राकडूनही निधी मिळू शकतो, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक संपर्कमंत्री श्री. विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत हे प्रश्नधिकरण स्थापण्याचा ठराव घेण्यात आला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसांत प्रस्ताव सादर करून राज्य सरकारकडे देण्याची सूचना त्यांनी केली. हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला जाईल. पंढरपूर, शिर्डी या तीर्थक्षेत्रांची प्रश्नधिकरणे झाली आहेत. त्याच धर्तीवर हे प्रश्नधिकरण असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
जिल्ह्य़ातील तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमात नारायणगिरी महाराज यांचे सराला बेट आणि ज्ञानेश्वरमाउलींचे जन्मस्थान असलेले आपेगाव याचा समावेश करण्यात आला आहे. याच्या विकासासाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे श्री. विखे यांनी पत्रकारांना सांगितले.
औरंगाबादमध्ये ‘नॅशनल लॉ स्कूल’ सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. त्यासाठी औरंगाबाद-मुंबई महामार्गावरील करोडी येथे ५० एकर जागा लवकरच ताब्यात घेतली जाणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विधी व न्याय विभागही राधाकृष्ण विखे यांच्याकडे आहे.
औरंगाबाद खंडपीठातील न्यायदालन वातानुकूलित आहे. वकील संघांची दालने मात्र वातानुकूलित नाहीत. वकिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून ही दालनेही वातानुकूलित करण्याचा निर्णय श्री. विखे यांनी जाहीर केला. तसेच औरंगाबाद खंडपीठातील कागदपत्रांचे ‘डिजिटल रेकॉर्ड’ करण्यात येणार आहे. लवकरच यासाठी निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे. सर्व रेकॉर्ड ऑन लाईन उपलब्ध होऊ शकतात. औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात १२ जिल्ह्य़ांचा समावेश आहे. या जिल्ह्य़ांना याचा लाभ घेता येईल, असेही ते म्हणाले.
लघुउद्योजक आणि उद्योजकांबरोबरही संपर्कमंत्र्यांची बैठक झाली. शहरानजीकच्या औद्योगिक परिसरात पायाभूत सुविधांची अनास्था झाली आहे. रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. तसेच उद्योजकांचे जकात, विक्रीकर आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ या संदर्भातही काही प्रश्न आहेत. या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेतली जाईल, असेही श्री. विखे यांनी सांगितले. औरंगाबादमध्ये आणखी एक जिल्हा रुग्णालय स्थापन केले जाणार आहे. यासाठी चिकलठाणा किंवा वाळूज या दोन जागांचा पर्याय आहे. परंतु वाळूज हे ठिकाण मध्यवर्ती आहे. लवकरच यासाठीचा आराखडा तयार केला जाईल, असेही ते म्हणाले.