Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘इंद्रनीलचा असर सरेना’
साहित्य, संगीत, चित्र, शिल्प, फोटोग्राफी या साऱ्या सृजनाच्या व अभि-व्यक्तीच्या कला आहेत. प्रत्येक कलेचं वैशिष्टय़ वेगळं आणि तिचं आवाहनही निराळं. पण या साऱ्याहून सिनेमा श्रेष्ठ आहे. कारण वरील सर्व कलेचा सुयोग्य असा मेळ त्यात घातला जातो. त्याला ध्वनी व दृश्याची जोड देऊन ती अधिक संवादी होते. अर्थात मी हे जागतिक दर्जाच्या कलात्मक सिनेमाबद्दल बोलत

 

आहे. ‘मॅजिक ऑफ सिनेमा’ अनुभवायाचा असेल, तर असे श्रेष्ठ कलात्मक सिनेमे पाहायला हवेत. भारतीय सत्यजित रे, गोपालकृष्णन, गिरीश कसारवल्लीपासून इराणच्या माजिदीपर्यंतचे अनेक नावे सिनेमाप्रेमी वाचकांना सहजतेनं स्मरतील.
आम्ही नुकताच कोल्हापूरला पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव केला. त्यात असे अनेक श्रेष्ठ दर्जाचे कलात्मक सिनेमे पहायला मिळाले आणि ‘मॅजिक ऑफ सिनेमा’ मनसोक्त अनुभवता आला.
ही सिनेमाची जादू कशी असते?
‘संवाद’च्या रसिक वाचकासाठी मी एका कोरियन सिनेमाच्या रसग्रहणाद्वारे ती घडविण्याचा शब्दाच्या माध्यमातून प्रयत्न करतो. अर्थात तो अपुरा असेल हेही आधीच स्पष्ट करतो.
हा कोरियन सिनेमा होता. ‘स्प्रिंग, समर, फॉल-अगेन स्प्रिंग’ या नावाचा. सिनेमामध्ये अवघे वीस ते पंचवीस संवाद असतील जेमतेम. पण ध्वनी व छायाच्या अपूर्व संगमातून एक श्रेष्ठ सार्वत्रिक जीवनानुभव अनुभवता येतो, त्याला तोड नाही!
एक तरंगतं बुद्ध मंदिर. एका निसर्गसुंदर बर्फाच्छादित सदाहरित डोंगराच्या पायथ्याला विस्तीर्ण तळ्यामध्ये हे लाकडी बुद्धमंदिर आहे. तिथं सेवेकरी म्हणून एक प्रश्नैढ बुद्ध भिक्षू आहे. सोबत एक बालभिक्षू. हा बाल अत्यंत खोडकर. नावेतून तलावात हिंडणं, मग जंगलात जाऊन खेळणं ही त्याची बाल सुलभ क्रीडा. त्याला थोडं हिंसक वळण लागतं. तो बेडूक, साप पकडून त्यांच्या शेपटांना दगड बांधतो व पाण्यात सोडतो. त्यांची तडफड पाहून तो आनंदतो. प्रश्नैढ भिक्षू ते पाहतो व दुसऱ्या दिवशी त्याच्या पाठीला एक वजनदार दगड बांधून तिथं पुन्हा पाठवतो. तेव्हा बाल भिक्षू मृत झालेला साप व बेडूक पाहतो. त्याला रडं कोसळतं. प्रश्नैढ भिक्षू त्याला माफ करतो, पण ‘जगा व जगू द्या’ आणि परपीडा करू नये, हा धडाही शिकवतो.
पुढे हा बाल भिक्षू तरुण होतो. त्यांच्या मंदिरात एक तरुण आजारी स्त्री उपचारासाठी येते. तिला पाहून तरुणाची वासना जागृत होते. तीही त्याला प्रतिसाद देते. प्रश्नैढ भिक्षू तिची रवानगी करतो व त्यालाही मंदिर सोडून जायचा आदेश देतो. तो शहरात तिच्या आशेनं जातो, पण तिचं तोवर लग्न झालेलं असतं. हा संतप्त, हताश होतो. अशाच एका विकलांग क्षणी परत येतो. बुद्धाला शरण जात शांत होतो. काही काळानं ती तरुणी तेथे येऊन मूल सोडून जाते. हा त्याला जवळ करतो व त्याच्यावर बौद्ध संस्कार करू लागतो.
वसंत, ग्रीष्म, हेमंत व पुन्हा वसंत अशा चार ऋतूंमध्ये त्या बाल भिक्षूचा प्रश्नैढ भिक्षूपर्यंतचा प्रवास अत्यंत संयतरितीने पण परिणामकारक दाखवला आहे, तो केवळ लाजबाब!
या सिनेमाची जादू आहे तिच्या छायाचित्रणात. कोरियातली एक नितांत सुंदर जागा. बर्फ, पाणी, डोंगर, जंगल, फुलणारी फुलं, हेमंतातील पानगळ होताना पानांचे बदलणारे रंग, बर्फानं गोठलेला तलाव आणि जुनाट बुद्ध मंदिर. तिथलं भक्तीमय वातावरण. हा सारा प्रदेश प्रेक्षणीय. चित्रपटातली एक एक ‘फ्रेम’ म्हणजे ‘पिक्चर पोस्टर कार्ड’. आपण अनेक हिंदी सिनेमात काश्मीर, उटी, स्वित्र्झलंडचा नितांत सुंदर निसर्ग पाहिला आहे. पण या सिनेमातला निसर्ग जेवढा सुंदर, डोळ्यांना सुखावणारा, तितकाच मानवी भावनांचं रोपण झालेला. म्हणून सिनेमाशी एकरूप.
त्याला जोडून ध्वनीचा परिणामकारक वापर. कॅमेऱ्याच्या लेन्समागे असणाऱ्या दिग्दर्शकाला काय दाखवायचं व सांगायचं आहे त्याचं पक्कं कलात्मक ज्ञान आहे. पण तरीही त्याला सिनेमा सुबोध करायचा नाहीय. प्रेक्षकांच्या अंतस्थ भावनांना तो साद घालू इच्छितो. प्रत्येकाला कदाचित त्यातून नवा जीवनानुभव गवसेल. नव्हे गवसतोच. कारण ‘राशोमन’ प्रत्येकाला जीवन सत्याचा एक तुकडा गवसतो. त्याच्यासाठी तो खरा व कदाचित पूर्णही असतो. अधिक सुजाण प्रेक्षक-वाचकांना एकापेक्षा अधिक सत्य गवसतील. जिनीअस कलावंताला त्याहून अधिक. या सिनेमाचा दिग्दर्शक असाच जिनिअस म्हणायला हवा!
मी सिनेमा पाहताना या ‘मॅजिक ऑफ सिनेमा’ मध्ये पूर्णत: गुंगून गेलो होतो. भान हरपून गेलो होतो. मला जीवनाचं एक रहस्य थोडसं कळत होतं, थोडसं गोंधळात पाडत होतं!
असा ‘मॅजिक ऑफ सिनेमा’ कशामुळे निर्माण होतो? एक तर मानवी जीवनाचं सूक्ष्म दर्शन घडविणारी कथा, तिचं सिनेमासाठी झालेलं पटकथेत रूपांतर आणि ती कमीतकमी शब्दात, नैसर्गिक अभिनयात मांडणारी कॅमेऱ्याची भाषा. छाया-प्रकाशाचा नेमका परिणामकारी मेळ. आणि अफलातून लोकेशन. तिचं सुंदर आणि कथेचा एक भाग झालेलं लोकेशन. ही कथा अन्यत्र कुठेच घडू शकली नसती असं वाटावं असं हे लोकेशन.
या साऱ्यांच्या सुवर्ण संगमातून ‘मॅजिक ऑफ सिनेमा’ प्रत्ययास येतो.
हा सिनेमा एक उदाहरण म्हणून पेश केला. सत्यजित रे ची ‘चारुलता’ किंवा इराणी दिग्दर्शक माजीदचे सर्वच सिनेमे घ्या. त्यातून हा ‘मॅजिक ऑफ सिनेमा’ पहायला मिळतो.
ज्याला या मॅजिकचा नाद लागतो, तो वाया जात नाही. उलट त्याचं जीवन अर्थगर्भ होतं. कारण तो एकाच जन्मात नाना जीवनानुभव व स्थळ, काळ, पात्रे अनुभवू शकतो.
मी कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा व अन्य पाहिलेल्या श्रेष्ठ सिनेमाच्या ‘मॅजिक’च्या प्रभावातच अजूनही आहे. कारण ‘इंद्रनीलाचा असर सरेना!