Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

‘सिब्बल यांची सूचना आदर्शवादी’
प्रदीप नणंदकर, लातूर, २६ जून

दहावीची मंडळाची परीक्षा नकोच, अशी सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल

 

यांनी मांडली आहे. ती आदर्शवादातून आलेली असून त्याला व्यवहारवादाची जोड देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया ‘लातूर पॅटर्न’चे जनक डॉ. अनिरुद्ध जाधव यांनी आज व्यक्त केली.
डॉ. जाधव म्हणाले, ‘‘दहावीची परीक्षाच रद्द करावी, अशी सूचना आजवर अनेक जणांनी अनेक वेळा केली आहे. परीक्षा विशिष्ट वेळेत घ्यायलाच हव्या. त्यातून गांभीर्य निर्माण होते. आपल्याकडे आठवी-नववीच्या परीक्षा शालेय पातळीवर घेतल्या जातात. त्याचा निकाल १०० टक्के असते. दहावीला १०० टक्के निकाल का लागत नाही? अकरावीला मंडळाची परीक्षा नसते; त्यामुळे अकरावीचा अभ्यासक्रम शिकविण्याची तसदी प्रश्नध्यापक घेत नाहीत आणि विद्यार्थीही ती परीक्षा गांभीर्याने घेत नाहीत. असे असतानाही अकरावीत १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात तर बारावीला ही गळती का असते? परीक्षा व्हायलाच हव्यात. देशभर एकाच मंडळाची परीक्षा ही सूचना मात्र योग्य आहे.’’
प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दिनेश पाटील म्हणाले, ‘‘परीक्षेला अवास्तव महत्त्व दिले जाते. ते योग्य नाही. आपल्याकडील परीक्षा नेमकी कशासाठी घेतली जाते, हे तपासले पाहिजे. सरसकट अन्य वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी परीक्षा असतात. सर्वागीण ज्ञानाची परीक्षा होत नाही. ती ठरावीक विषयाचीच राहते. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण प्रगतीची परीक्षा घेणारी यंत्रणा असायला हवी.
दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली तर पुढील शिक्षणासाठी प्रवेश पद्धती नेमकी कशी असेल? त्यासाठी पुन्हा प्रवेशपूर्व परीक्षेची तरतूद केली जाणार असेल तर पुन्हा प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करून घेण्याची संधी ज्यांना उपलब्ध आहे, अशांनाच प्रवेश मिळेल आणि शिक्षणाच्या सोयी वंचितांपर्यंत पोहोचणारच नाहीत.
सिब्बल यांच्या सूचना चांगल्या उद्देशातून असल्या तरी अंमलबजावणी पातळीवरील अडचणी दूर करण्याची यंत्रणा उभी केली पाहिजे. देशभरात त्यावर विचारमंथन होऊनच सर्वाच्या हिताचा निर्णय व्हायला पाहिजे.’’