Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

सीबीआय अधिकाऱ्यांकडून लातूर-उस्मानाबादमध्ये पाहणी
उस्मानाबाद, २६ जून/वार्ताहर

पवन राजे हत्याकांडाच्या तपासासाठी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या दोन निवासस्थानांना टाळे

 

ठोकल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सी. बी. आय.) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल आरोपी पिंटू सिंगसमवेत लातूर आणि उस्मानाबादमध्ये काही स्थळांची पाहणी केली. हत्येपूर्वी दोनवेळा पवन राजेनिंबाळकर यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता. ते प्रयत्न अयशस्वी कसे ठरले, याची माहिही अधिकाऱ्यांनी घेतली.
आरोपी सतीश मंदाडेशी संबंधित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या आसवानी प्रकल्पातील कागदपत्रेही अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी पारसमल जैन याने दिलेल्या कबुलीजबाबात पवन राजेनिंबाळकर यांची हत्या करण्यापूर्वी त्यांचे गोवर्धनवाडी येथील घर, लातूरमधील निवासस्थान व शहरातील ‘ओमजय ट्रेडिंग कंपनी’चे शोरूम आदी ठिकाणास भेटी दिल्याची कबुली दिली होती. आरोपींनी लातूरच्या विश्रामगृहातही काही दिवस घालविले होते. त्या अनुषंगाने पिंटू सिंग याच्यासमवेत या सर्व स्थळांची सी. बी. आय.च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
निनावी पत्राची जोरदार चर्चा
डॉ. पद्मसिंह पाटील यांची प्रतिमा उजळ करण्याच्या उद्देशाने ढोकी परिसरात एक निनावी पत्रही मतदारांना पाठविण्यात आले आहे. बसस्थानकात आणि सार्वत्रिक ठिकाणी वितरित करण्यात आलेल्या पत्रात समाजसेवक अण्णा हजारे यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रांच्या प्रती पोस्टामार्फत काही जणांना पाठविण्यात आल्या आहेत. या पत्रान्वये डॉ. पद्मसिंह पाटील यांना झालेली अटक हा राजकीय कटाचा भाग असल्याचे सांगत तो रचण्यासाठी ‘लातूरकरांनी’ बळ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निनावी पत्राची चर्चाही आज तालुक्यात सुरू होती.