Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

दहावीच्या परीक्षेत मार्काचा पाऊस
लातूर, २६ जून/वार्ताहर

दहावीच्या परीक्षेत संपूर्ण जिल्हाभर मार्काचा पाऊस झाल्यामुळे विद्यार्थी, पालक, संस्थाचालक या

 

सर्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या असल्या, तरी दहावीच्या परीक्षेतील पावसामुळे या विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेशाची पेरणी करता येणार आहे.
पंचवीस वर्षापूर्वी जिल्ह्य़ात ७५ टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड कौतुक होत असे. आता ही संख्या हजारांत असल्यामुळे यांचे कौतुक होत नाही. ‘लातूर पॅटर्न’मुळे ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हाभरात सातशेच्या आसपास संख्या आहे. पंचाण्णव टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळविणारे सुमारे २०० विद्यार्थी आहेत. राजर्षी शाहू महाविद्यालयात जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांचा अकरावीचा प्रवेश गेल्या वर्षी ९२.५४ टक्क्य़ांना बंद झाला होता.
या वर्षी गुणांची ही टक्केवारी चौऱ्याण्णवपर्यंत जाण्याची शक्यता आहे. शालेय पातळीवरील २० टक्के गुणांची सोय, शिवाय खेळासाठी २५ अधिकचे गुण या नव्या संकल्पनांमुळे गुणा वाढत आहेत. या यशामुळे पालक व विद्यार्थ्यांच्या स्वत:बद्दलच्या अपेक्षा वाढत आहेत.
दहावीतील मिळालेले यश हे बारावीपर्यंत टिकविण्यासाठी लातूर पॅटर्नच्या ‘भट्टी’ची सोय वर्षानुवर्षे उपलब्ध असल्यामुळे बारावीपर्यंत निकाल टिकतो, मात्र पुन्हा विद्यार्थ्यांची पंचाईत होऊ शकते. मंडळाच्या परीक्षेबरोबरच सीईटीच्या परीक्षेची तयारीही उत्तम करून घेतली जाते त्यामुळे लातूरकडे शिक्षणाचा ओढा आहे. राज्य मंडळाच्या परीक्षेत विद्यार्थी चांगले यश मिळवीत असले तरी केंद्रीय पातळीवरील अभ्यासक्रमाच्या धर्तीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत हे यश टिकत नाही. काही महाविद्यालयांत आता राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेतली जात आहे.
या वर्षी पहिल्यांदाच इंग्रजी व गणिताच्या परीक्षेच्या दिवशी सर्व परीक्षा केंद्रांवर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बैठे पथक नेमल्यामुळे विभागातील अन्य जिल्ह्य़ांच्या मानाने लातूरचा निकाल घसरला.ा निकाल घसरला असला तरी अपात्रांना पुढच्या वर्गात ढकलण्याचे पाप या वर्षी दर वर्षीपेक्षा कमी झाले असे म्हणायला वाव आहे.
परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध मोहीम
सामुदायिक कॉपीच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी लातूर परीक्षा मंडळ विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून १५ ऑगस्टपासून परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध मोहीम राबविणार आहे. राज्यात पहिला क्रमांक पटकाविण्याचा मान ज्या लातूर विभागाला मिळाला त्याच विभागास राज्यात सर्वाधिक परीक्षेतील गैरप्रकार करण्याचा कलंक लागला आहे. तो पुसण्यासाठी सर्वानीच एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. तरच परीक्षेत पडलेल्या मार्काचा पाऊस हा नैसर्गिक आहे, तो कृत्रिम नाही, याची खात्री वाटेल.