Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

माजलगावमध्ये ‘बंद’; चार बसगाडय़ांवर दगडफेकमाजलगावमध्ये ‘बंद’; चार बसगाडय़ांवर दगडफेक; मारामारीत जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू
बीड, २६ जून/वार्ताहर

माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथे झालेल्या सशस्त्र मारामारीतील जखमी सदाशिव देवराव साळवे यांचा काल रात्री मृत्यू झाला. उपचारात निष्काळजीपणा करणाऱ्या वैद्यकीय

 

अधिकाऱ्याला निलंबित करावे व आरोपींना अटक करावी या मागणीसाठी माजलगावमध्ये दिवसभर ‘बंद’ पाळण्यात आला. चार एस. टी. बसगाडय़ांवर दगडफेक झाली. अनेक ठिकाणी टायर पेटवून रस्ते अडविण्यात आले. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या सोळापैकी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
फुले पिंपळगाव येथे काल दुपारी उंबरे व साळवे गटांमध्ये मारामारी झाली. तलवारी व कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याने सदाशिव साळवे, प्रवीण साळवे, भिकचंद साळवे गंभीर जखमी झाले. त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना काल सायंकाळी सदाशिव साळवे (वय ६२) यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी रात्री उशिरा गावातील १६ जणांविरुद्ध खुनाचा व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घ्यायचा नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. माजलगाव येथे सकाळी ८ वाजल्यापासूनच कार्यकर्ते फिरून ‘शहर बंद’चे आवाहन करीत होते. चार एस. टी. बसवर दगडफेक करण्यात आली, तर रस्त्यावर टायर पेटवून रस्ते अडविण्यात आले.
पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार
फुले पिंपळगाव येथे आज सायंकाळी ४.३० वाजता सदाशिव साळवे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हाभरातील विविध पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. तेथे मोठा पोलीस बंदोबस्त होता.
बीड येथे रिपब्लिकन पक्षाचे पप्पू कागदे, मानवी हक्कचे एकनाथ आवाड, बाळासाहेब वाघमारे, बबन वडमारे, राजू जोगदंड, मनीषा तोकले, अशोक तोकले, दिलीप भोसले, अजय सवाई या विविध पक्षसंघटनांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. आरोपींना अटक करावी आणि उपचारात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक हुबेकर, पोलीस निरीक्षक कुरुमकर यांना निलंबित करावे, अशी आंदोलकांची मागणी होती. जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोहन कट्टे यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. डॉ. हुबेकर यांना निलंबित करण्याची कारवाई करण्याचे आश्वासन श्री. कट्टे यांनी दिले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षकांमार्फत चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची ग्वाही श्री. लखमी यांनी दिली.त्यानंतर शिष्टमंडळाने आंदोलन स्थगित केले.