Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

खासगी वित्त संस्थेच्या कर्मचाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील तिघांना अटक
नांदेड, २६ जून/वार्ताहर

‘स्पंदन’ या खासगी वित्त संस्थेच्या कर्मचाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून तीन लाख रुपये

 

लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात नांदेड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख रुपये जप्त केले आहेत.
पोलीसप्रमुख सत्यनारायण चौधरी व अतिरिक्त पोलीसप्रमुख शहाजी उमाप यांनी सांगितले की, स्पंदन कंपनीचे कर्मचारी सत्यानंद तुम्मा हे उमरी परिसरातील वसुली करून भोकरला जात होते. प्रेम ऊर्फ परसराम पिराजी निखाते (वय २०, रा. मेंडका, ता. मुदखेड), बंडू ऊर्फ हरेद्र सीताराम निखाते (वय २२), उद्धव संभाजी बोदमवाड (वय २०, रा. मेंडका) व राजेश हिरामण लोणे (रा. मेंडका) या चौघांनी शस्त्राचा धाक दाखवून तीन लाख रुपये व मोबाईल पळविला.
अज्ञात आरोपींविरुद्ध उमरी पोलिसंनी गुन्हा दाखल केला होता. उद्धव बोदमवाड हा स्पंदन कंपनीचा कर्मचारी आहे. त्यानेच तुम्मा पैसे घेऊन जात असल्याची माहिती दिली. या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मुख्य आरोपी राजेश लोणे फरारी आहे. या तिघांकडून दोन लाख ११ हजार ४०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना २९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.