Leading International Marathi News Daily

शनिवार, २७ जून २००९

(सविस्तर वृत्त)

भोकर तालुक्याच्या विकासाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष; विधानसभा निवडणुकीची तयारी
रामचंद्र मुसळे, भोकर, २६ जून

तालुक्याच्या रस्ते, पूल व विविध विकासकामांसाठी या वर्षीच्या अंदाजपत्रकात भरीव आर्थिक

 

तरतूद करण्यात आली आहे. या कामांच्या निविदा काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने चालू केल्याचे दिसते.
पुनर्रचित पूर्वीच्या भोकर मतदारसंघातील उमरी, धर्माबाद वगळून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुदखेड मतदारसंघातील अर्धापूर व मुदखेड हे दोन तालुके भोकर मतदारसंघाला जोडले गेले आहेत. विधानसभेची निवडणूक श्री. चव्हाण भोकर मतदारसंघातून लढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी पूर्ण तयारी चालू केली आहे. भोकर येथील बारीकसारीक बाबींकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्याचा गावनिहाय सर्वेक्षण अलीकडेच करण्यात आले. टंचाईग्रस्त गावात मंजूर विंधन विहिरींसाठी २०० फुटांपेक्षा अधिक खोल खोदण्यासाठी लागणारी रक्कम कारखान्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्य़ा, गरीब रुग्णांना डॉ. शंकरराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने मोफत औषधोपचार अशा माध्यमातून नागरिकांशी जवळीक निर्माण करण्यात प्रयत्न जोरदार सुरू आहेत.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या वर्षीच्या अंदाजपत्रकात मुदखेड-भोकर रस्ता (१ कोटी ३० लाख), तामसा-भोकर-उमरी (२ कोटी ५० लाख), सोमठाणा-किनीपाळज (१ कोटी २० लाख), भोकर-बटाळा-दिवशी (७० लाख), दिवशी-लगळूद (८५ लाख), लगळूद ते राज्य रस्ता (१ कोटी १० लाख), किनी-महागाव (६० लाख) यासह विविध रस्ते, फुलमोऱ्याच्या कामासाठी सुमारे १४ कोटींपेक्षा अधिक आर्थिक तरतूद झाली आहे. ही कामे विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कायदेशीर बाजू पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने कार्यकारी अभियंता पी. आर. कीर्ती, उपअभियंता पी. पी. देशपांडे यांच्यासह कर्मचारी कामाला लागले आहेत.
मतदारसंघाची पुनर्रचना होऊन साधारणत: वर्षभराचा कालावधी झाला, तेव्हापासून श्री. चव्हाण भोकर मतदारसंघातून उभे राहणार, अशी चर्चा होती. उद्योगमंत्री असतानाच त्यांनी भोकरला जिल्हास्तरीय युवक मेळावा घेतला. त्याच वेळी ते भोकरमधून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले होते. नंतर ते मुख्यमंत्री झाले अन् नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या. परवाच्या अर्थसंकल्पात भोकर, मुदखेड, अर्धापूर या तालुक्यांसाठी विविध विकासकामांसाठी सुमारे ६५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली; परंतु मुदखेड-अर्धापूर तालुक्याच्या तुलनेत फारच कमी म्हणजे १४ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे नागरिकांत चर्चा आहे. पूर्वीच्या भोकर मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनीही सुचविलेल्या कामांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.